अन्नधान्याची नासाडी टाळा !
संपादकीय
‘जगभरात अन्नपदार्थांची नासाडी करण्यात भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे’, असे मत ‘संयुक्त राष्ट्र’ आणि ‘ऑर्गनायझेशन फॉर ॲग्रिकल्चर’ यांनी व्यक्त केले आहे. आपल्या देशाचे नाव अशा गोष्टीत पुढे येणे, हे ऐकूनच चीड येते. अर्थात् वास्तव स्वीकारून त्यात पालट करण्यासाठी प्रत्येक भारतियाने प्रयत्न करायला हवेत. भारतात प्रतिवर्षी २ सहस्र १०० कोटी किलो गहू वाया जातो. हे प्रमाण म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये प्रतिवर्षी उत्पादित होणाऱ्या गव्हाइतके आहे. मुंबईतही ६९ लाख किलो खाद्यपदार्थ प्रतिदिन कचऱ्यात फेकले जातात. भारतियांनी इतक्या प्रचंड प्रमाणात अन्न वाया घालवले, तर अन्नपूर्णादेवतेची अवकृपाच होईल ! ही नासाडी अशीच होत राहिली, तर वर्ष २०५० पर्यंत सद्यःस्थितीपेक्षा तिप्पट लोकांवर उपासमारीची वेळ ओढावेल !
गव्हाची नासाडी ही काही आता लक्षात आलेली घटना नव्हे, तर जेव्हा शरद पवार कृषीमंत्री होते, तेव्हापासूनच ती होत होती. त्या काळात लाखो टन गहू सरकारी गोदामांमध्ये सडला, का तर धान्य ठेवण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध करून दिलेली नव्हती. ‘याला शरद पवार यांचा अन्न आणि नागरी पुरवठा विभाग उत्तरदायी आहे’, अशी जोरदार टीका त्या वेळी करण्यात आली. कृषीमंत्र्यांच्याच राज्यात असे झाल्याने अशी टीका होणे साहजिकच आहे. भारतीय संस्कृतीची शिकवण आहे, ‘अन्न वाया घालवल्यास पाप लागते.’ खरेतर भारतात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होऊनही इतका गहू सडणे, हे संतापजनक आणि लाजिरवाणे आहे. ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ राज्य करूनही काँग्रेससारख्या पक्षाला कृषी व्यवस्थापन करता आलेले नाही. परिणामी भारत ‘सुजलाम् सुफलाम्’ असूनही अपेक्षित इतकी आर्थिक प्रगती झाली नाही. त्यामुळे शेतकरी गरीबच राहिले किंवा आत्महत्या करू लागले आणि श्रीमंत आणखी धनाढ्य झाले. भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. असे असतांना अन्नपदार्थांच्या होणाऱ्या नासाडीला प्रशासन आणि आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते सर्वस्वी कारणीभूत आहेत. जनतेला शिस्त न लावल्याचाही हा परिणाम आहे. धान्य साठवण्यासाठीची व्यवस्था केली न जाणे, गोदामांची अनुपलब्धता असणे, उंदीर आणि घुशी यांच्याकडून धान्य फस्त केले जात असतांनाही त्यावर उपाययोजना न काढणे, नियोजनाचा अभाव, तसेच धान्य विक्रीचे धोरण न ठरवणे ही अन् अशी अनेक कारणे नासाडीला कारणीभूत आहेत. यावरून लक्षात येते की, ‘अन्न हे पूर्णब्रह्म ।’ ही संकल्पनाच आज मागे पडत आहे. तिला पुनर्संजीवनी द्यायला हवी. प्रत्येक जिवाच्या पालनपोषणासाठी भूमाता तिच्या उदरातून अन्नधान्याचा साठा अविरत पुरवत असते. तिच्या या कृपेची जाण ठेवून प्रत्येक भारतियाने ‘अन्न वाया घालवायचे नाही’, हा निश्चय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करायला हवा. हेच खरे राष्ट्रकर्तव्य ठरेल !