सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये मिळणाऱ्या साधनारूपी संस्कारांच्या बळावर आदर्शत्वाच्या दृष्टीने घडणारे युवा साधक आणि साधिका !
‘भारतीय संस्कृती ही संस्कारांवर आधारलेली आहे. त्यामुळे जीवनाच्या वाटचालीत संस्कारांची शिदोरी पुष्कळ महत्त्वाची ठरते; पण सध्याच्या कलियुगात नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाल्याने संस्कारमूल्येही संपुष्टात आली आहेत. याचा परिणाम सध्याच्या युवा पिढीवर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे ‘त्यांचे भवितव्य धोक्यात आहे’, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. आता ‘ही जीवनमूल्ये आणि संस्कार मिळणार तरी कुठे ? त्या दृष्टीने युवा वर्गाला कोण दिशा देईल ?’, याचे उत्तर म्हणजे सनातन संस्थेचे आश्रम !
सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये, तसेच राष्ट्ररक्षण आणि धर्मप्रसार या कार्यांत अनेक युवक-युवती दायित्व घेऊन सेवारत आहेत. सनातन संस्थेचे आश्रम म्हणजे साधक युवक-युवती यांना घडवण्याची शाळाच आहे. सध्याच्या समाजाची आश्रमाकडे पहाण्याची मानसिकता वेगळी असली, तरी सनातनच्या आश्रमांमध्ये युवा पिढीवर केले जाणारे संस्कार आणि त्यांच्याकडून करवून घेतल्या जाणाऱ्या कृती, यांमुळे ते सर्वच स्तरांवर सक्षम होत आहेत. ‘सनातनच्या आश्रमांमध्ये युवा साधक आणि साधिका कशा प्रकारे घडतात ?’, याविषयीचे शब्दचित्रण येथे केले आहे. त्यातून सर्वांनाच दिशा मिळेल.
संकलक : श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१. युवा साधकांनी वयोवृद्ध आणि आजारी साधक यांची सेवा प्रेमाने अन् आपलेपणाने करणे
सनातनच्या आश्रमांमध्ये सर्व वयोगटांतील साधक रहातात. वयोवृद्ध किंवा आजारी साधक, तसेच तीव्र शारीरिक त्रास असणारे साधक यांना युवा साधक बहुतांश कृतींमध्ये साहाय्य करतात, उदा. त्यांचे कपडे धुणे आणि त्यांच्या कपड्यांना इस्त्री करणे, त्यांना प्रसाद-महाप्रसाद वाढून देणे, त्यांना भोजनगृहात पटलावर बसून जेवण्यास प्राधान्य देऊन स्वतः सतरंजी घालून खाली जेवायला बसणे, संबंधितांच्या खोलीची स्वच्छता करणे, त्यांना दैनंदिन कामांमध्ये साहाय्य करणे इत्यादी. अंथरुणाला खिळून असणाऱ्या वयोवृद्धांचीही सर्व प्रकारची सेवा करण्यात युवा साधकांचा पुढाकार असतो. खरे पहाता वयोवृद्ध किंवा आजारी साधकांचे युवा साधकांशी व्यावहारिक असे कोणतेही नाते नसते, तरीसुद्धा केवळ साधना म्हणून आणि ‘साधक’ या नात्याने ते त्यांची कोणत्याही प्रकारची सेवा आनंदाने करतात. ‘वयाने मोठे असणारे, तसेच वृद्ध साधक यांच्याशी कसे वागायचे ?’, याचा संस्कार आपोआपच आश्रमातील युवा साधकांमध्ये निर्माण होतो. तसेच त्यांची इतरांचा विचार करण्याची वृत्ती वाढते. साधनेच्या रुजलेल्या संस्कारांतूनच या सेवाभावाची प्रचीती येते.
१ अ. सद्यस्थितीत समाजात घरातील वयोवृद्ध व्यक्ती किंवा आजारी नातलग यांची आत्मीयतेने आणि प्रेमाने काळजी घेतली न जाणे : सध्या समाजात पाहिले, तर कुणीही घरातील वयोवृद्ध व्यक्ती किंवा आजारी नातलग यांची आत्मीयतेने किंवा प्रेमाने काळजी घेत नाहीत. एकतर वृद्धाश्रमाचा टोकाचा आणि प्रेम संपुष्टात आणणारा पर्याय निवडला जातो, नाहीतर घरी एखादा नोकर किंवा कामाला बाई ठेवून आजारी किंवा वृद्ध यांची काळजी घेतली जाते. यात प्रेमाचा ओलावा कुठे येणार ? त्यामुळे दिसून येते, ती केवळ कृत्रिमता ! असे करूनही त्यांच्या समवेत होणारे वादविवाद निराळेच ! समाजातील नातेसंबंधांत दिसून न येणारे ममत्व हे केवळ सनातनच्या आश्रमांमध्येच दिसून येते. हा साधनेचा परिणाम आहे.
२. युवा साधकांनी आश्रमात शारीरिक श्रमाच्या सेवा आनंदाने करणे आणि त्याचा लाभ त्यांना घरी गेल्यावरही होणे
आश्रमात शारीरिक श्रमाच्या सेवा पुष्कळ प्रमाणात उपलब्ध असतात. युवा साधकांचा त्यातही विशेषत्वाने सहभाग असतो. प्रत्येकाला आपण सेवा करत असलेल्या ठिकाणची प्रतिदिनची स्वच्छता विभागून दिलेली असते. त्या समवेत आश्रमातील अन्य ठिकाणच्या स्वच्छतेच्या सेवाही युवा साधक करत असतात. सेवांमध्ये आवड-निवड न जोपासता अगदी केर काढण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंतच्या सर्व सेवा युवा साधकांकडून केल्या जातात. ‘सनातनचा प्रत्येक साधक हा स्वयंपूर्ण असायला हवा’, हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन असल्याने साधक त्यांचे आज्ञापालन करतात. छोट्या छोट्या कृती करायची सवय असल्याने अन्य ठिकाणी किंवा काही कालावधीसाठी घरी गेल्यावरही कुणालाच अडचण न येता लाभच होतो. घरी गेलेले काही युवा साधक आपापल्या कुटुंबियांना आश्रमाप्रमाणे काही खाद्यपदार्थ बनवून खाऊ घालतात. सेवा करण्यातून मिळणारा आनंद त्यांना अशा विविध स्तरांवर व्यापक करत असतो.
३. सद्यस्थितीत समाजातील बहुतांश तरुण मुले-मुली मनोरंजनात वेळ घालवत असतांना आश्रमातील युवा साधकांच्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी त्यांनी दिवसभरातील सेवा आणि साधना यांचे नियोजन करणे
आश्रमात पूर्णवेळ सेवारत असल्याने प्रतिदिनच्या वैयक्तिक कृती, सेवा आणि व्यष्टी साधना वेळेत पूर्ण व्हावी अन् साधकांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा, या उद्देशाने दिवसभरातील वेळेचे नियोजन केले जाते. दायित्व असलेले साधक ते नियोजन पडताळून त्यात आवश्यक ते पालट सांगतात. यातून ‘वेळेचा काटेकोर वापर कसा करावा ?’, हे साधक शिकतो. सद्यस्थितीत समाजात वावरणारी बहुतांश तरुण मुले-मुली भ्रमणभाष, चित्रपट, मनोरंजन, फिरायला जाणे इत्यादींमध्ये वेळ घालवतात. राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणे दूरच; पण स्वतःचेही सुनियोजन न केल्यामुळे सध्याची तरुणाई वाया जात आहे. याउलट आश्रमातील युवा साधकांना सेवा आणि साधना करण्यासाठी २४ घंटेही अपुरे पडत आहेत. त्यांच्या मनात मायेतील गोष्टींचा विचारही येत नाही. त्यांच्या वेळेचा सदुपयोग होऊन तो सत्कारणीही लागत आहे, म्हणजेच ‘त्यांचे जीवन सार्थकी लागत आहे’, असे म्हणता येईल.
४. अल्पाहार किंवा स्वयंपाक सिद्ध करण्यास शिकून स्वयंपूर्ण होणे
आश्रमात साधकसंख्या अधिक असल्याने सर्वांसाठी सकाळी अल्पाहार आणि चहा अन् कशाय (धने-जिरे पूड घालून बनवलेले पेय) सिद्ध करावे लागते. युवा साधक जाणकार साधकांच्या साहाय्याने हे सर्व शिकून घेतात. काही युवा साधक शेकडोंच्या संख्येतील साधकांसाठी स्वयंपाक बनवणेही शिकून घेतात. त्यातील बारकावे आत्मसात करतात आणि नंतर दायित्व घेऊन अल्पाहार अथवा स्वयंपाक करणे या सेवा करतात. साधक अल्पाहार अथवा स्वयंपाक करतांना अखंड नामजप करत असल्याने ते बनवत असलेले पदार्थ सात्त्विक होतात. असे सात्त्विक आणि चैतन्य असलेले पदार्थ खाण्याचा परिणाम सर्व साधकांची साधना चांगली होण्यावर होतो.
काही वेळा बाहेरगावी नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त रहावे लागल्यास तरुण-तरुणींना स्वयंपाक करावाच लागतो; पण काही घरांमध्ये घरी आई असेल, तर तरुण-तरुणी स्वयंपाकघरात पाऊलही ठेवत नाहीत. खायचे तर आईच्या हातचे, नाही तर उपाहारगृहातून मागवायचे. यांमध्ये त्यांची दोन प्रकारे हानी होते. एक तर स्वयंपाकाचे कौशल्य आणि स्वयंपूर्णता हे गुण आत्मसात करण्यापासून पिढी वंचित रहाते आणि उपाहारगृहातून मागवल्याने त्यावर होणारे संस्कार खाणाऱ्यावर होऊन त्यांना खाण्याचा अपेक्षित लाभ होत नाही. अपवादात्मक स्थितीत काही तरुणाई स्वयंपाक करून आनंद मिळवतांनाही आढळते. आश्रमातील बहुतांश युवा साधक हे अल्पाहार आणि स्वयंपाक यांत निपुण होणे, ही अन्नपूर्णादेवीची कृपाच आहे !
५. खाद्यपदार्थांच्या संदर्भात युवा साधक मोह किंवा अपेक्षा न ठेवता ते पदार्थ ग्रहण करत असल्याने त्यांनी त्यागातील आनंद अनुभवणे
आश्रमात सणासुदीला किंवा काही कारणास्तव विशेष पदार्थ अथवा गोड पदार्थ बनवला जातो. साधकांची संख्या अधिक असल्याने तो पदार्थ सर्वांना पुरणे आवश्यक असते. यासाठी काही वेळा पदार्थाच्या समोर ‘एक डाव घेणे’ किंवा ‘एक तुकडा घेणे’ अशा स्वरूपाची पाटी लावली जाते. युवा साधक त्या पदार्थाविषयी कोणताही मोह किंवा अपेक्षा न ठेवता सांगितलेल्या प्रमाणात तो ग्रहण करतात. प्रसंगी सहसाधकाच्या आवडीचा एखादा पदार्थ असेल, तर काही जण तो स्वतः न घेता (त्याग करून) त्याला देतात. तरुणांसाठी आवडत्या खाद्यपदार्थांचा त्याग करणे खरेतर अवघड असते; पण तो करून ते त्यातील आनंद मिळवत आहेत, हे विशेष आहे.
बाहेरील तरुणाई पाहिली, तर ‘खाण्यासाठी जन्म आपुला’ अशी त्यांची मानसिकता झालेली आढळते. ‘आज कोणता पदार्थ खाऊया ?’, ‘उद्या कोणत्या उपाहारगृहात जाऊन कोणत्या पदार्थांवर ताव मारूया ?’, असेच विचार बरेच जण करत असतात. खाण्या-पिण्याची आवड-नावड मोठ्या प्रमाणात जोपासत त्यावरच पैशांची उधळपट्टी केली जाते.
६. प्रांजळपणे चुका सांगणे आणि सर्वांप्रती आदर राखणे
‘आपल्याला ईश्वरापर्यंत जायचे असेल, तर त्याच्यासारखे परिपूर्ण व्हायला हवे’, यासाठी सनातन संस्थेत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवली जाते. त्याअंतर्गत युवा साधक स्वतःकडून सेवा आणि व्यष्टी साधना करतांना झालेल्या चुका प्रांजळपणे सांगतात. त्यामागील विचारप्रक्रिया आणि त्या वेळी ‘स्वभावदोष अन् अहं यांचा कोणता पैलू प्रकट झाला होता ?’, याचेही विश्लेषण करून सांगतात. या वेळी त्यांच्या बोलण्यात नम्रता आणि मृदूता जाणवते.
व्यावहारिक जगात अरेरावीने वागणारे, मोठ्यांचा आदर न करणारे, खोटे बोलणारे युवाच अधिक प्रमाणात आढळतात. त्यांच्यावर ना संस्कार असतात, ना त्यांना कुणाचा आदर असतो, ना ते कुणाला महत्त्व देतात; पण त्यांच्या तुलनेत सनातनच्या आश्रमांतील आणि धर्मप्रसाराचे कार्य करणाऱ्या युवा साधकांचे वर्तन निश्चितच आदर्शवत् आहे.
आश्रमात वावरतांना समवयस्क किंवा वयाने थोड्या मोठ्या असणाऱ्या साधकांचा उल्लेख करतांना ‘ताई’, ‘दादा’ असा आदरार्थी केला जातो. इतरांप्रतीचा आदरभाव सनातन संस्कृतीने आपल्याला दिलेलाच आहे. तो समोर ठेवून आश्रमातील युवा वर्ग आचरण करत आहे.
७. राष्ट्र-धर्म कार्यातील युवांचे भरीव योगदान !
सध्याचे युवा नोकरी-धंदा, अर्थार्जन यांसाठी देश-विदेशात किंवा काही जण दूरच्या राज्यांत जातात. याउलट सनातन संस्थेत कार्यरत असणारे युवा हे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याच्या तळमळीमुळे प्रेरित होऊन देशातील दूरच्या राज्यांमध्ये जातात आणि तेथील परिस्थिती आत्मसात करून झोकून देऊन कार्य करतात. यात कोणताही स्वार्थ दडलेला नसतो. सनातन संस्थेचा कोणताही युवा साधक हा निःस्वार्थी आहे. सध्याच्या काळात हे वैशिष्ट्यपूर्णच आहे.
८. भ्रमणभाषचा वापर केवळ सेवा आणि साधना यांसाठी करणे
युवा साधकांकडून भ्रमणभाषचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी केला जातो. त्यामध्ये आपापल्या सेवांचे नियोजन करणे, ऑनलाईन सत्संग ऐकणे, सत्संगाच्या लिंक इतरांना ‘शेअर’ करणे, व्यष्टी आढावे देणे-घेणे किंवा एखादी महत्त्वाची सेवा किंवा साधनेची सूत्रे लक्षात येण्यासाठी गजर (अलार्म) लावणे इत्यादी. प्रत्येकाच्या भ्रमणभाषची ‘रिंग टोन’ही सात्त्विक असते. आश्रमातील साधक चित्रपट किंवा व्हिडिओ पहाणे यांमध्ये अनावश्यक वेळ वाया घालवत नाहीत. या गोष्टी समाजातील युवांमध्ये दुरान्वयेही आढळून येणार नाहीत. म्हणूनच बाहेर सर्वत्र मोहमायेचा प्रचंड पगडा असूनही त्याकडे आकृष्ट न होता ‘साधना’ हे सर्वस्व मानणारी सनातनची युवा पिढी सद्गुरु, संत, हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांच्याकडून कौतुकास पात्र ठरते.
९. सेवांच्या माध्यमातून व्यावहारिकदृष्ट्या घडणे
युवा साधक स्वतःच्या विविध सेवांमध्ये कौशल्य प्राप्त करतात. मुद्रितशोधन, पानांची संरचना (फॉरमॅटिंग) करणे, ग्रंथसंकलन, ध्वनीचित्रीकरण, संकेतस्थळ विकसित करणे इत्यादी सेवांमध्ये अल्प कालावधीत निपुणता प्राप्त करतात. हे सर्व करतांना ते केवळ साधनेच्या दृष्टीनेच नव्हे, तर व्यावहारिकदृष्ट्याही घडतात. पूर्णवेळ सेवा करणाऱ्या काही युवा साधकांची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे अचानक नोकरी करावी लागल्यास तेथेही आतापर्यंत आत्मसात् केलेल्या गुणांच्या बळावर चुणूक दाखवली जाते.
१०. पाल्यांचे आदर्श वर्तन
आश्रमातील किशोरवयीन आणि बालसाधक यांच्याकडून काही चुका झाल्यास त्यांचे पालक संबंधित साधकांकडे नेऊन त्यांना कान पकडून क्षमायाचना करण्यास सांगतात. त्यामुळे चूक झाल्यावर क्षमा मागण्याचा संस्कार त्यांच्यावर नकळतपणे होतो.
प्रार्थना
युवा साधकांच्या दृष्टीने त्यांच्या साधनारूपी वाटचालीत आश्रमजीवनाचा बहुमोलाचा वाटा आहे. आश्रमात राहून प्रतिदिन मिळणारी साधनेची शिकवण व्यक्तीमत्त्व विकासातही तितकीच लाभदायक ठरते. ‘हा लेख वाचून समाजाच्या मनात असलेली आश्रमाविषयीची अयोग्य प्रतिमा दूर होऊन त्यांना साधनेचे महत्त्व कळावे आणि अधिकाधिक युवा पिढी साधनामार्गाला लागून तिने जीवनोद्धार करून घ्यावा’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.६.२०२२)