आषाढी वारीसाठी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी यांना बूस्टर डोस सक्तीचा !
अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे निर्देश
सोलापूर, १७ जून (वार्ता.) – आषाढी वारीसाठी यंदा मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही, यात्रा कालावधीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे वारीसाठी नियुक्त शासकीय अधिकारी, खासगी अधिकारी, तसेच कर्मचारी यांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेऊनच यावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी आणि वारीचे ‘इन्सिडंट कमांडर’ संजीव जाधव यांनी दिले.
१. नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाविषयी श्री. जाधव बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शमा पवार, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह माढा, माळशिरस, पंढरपूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
२. सर्व वारकर्यांनी वारी कालावधीत कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळावेत, तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे. संशयित वारकरी ‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी ‘कोविड केअर सेंटर’ची निर्मिती करण्याच्या सूचनाही त्यांनी केली.