पुणे जिल्ह्यातील १ सहस्र ३८५ अंगणवाड्या अंधारात !

 

पुणे – जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या १ सहस्र ३८५ अंगणवाड्यांमध्ये अद्यापही विजेची जोडणी नसल्याने अंगणवाड्या अंधारात आहेत, तर १ सहस्र २७ अंगणवाड्यांमध्ये पाण्याची जोडणीही नाही. वर्ष १९८५ पासून ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ कार्यान्वित असून ४ सहस्र ६६९ अंगणवाड्यांमधून लाभार्थ्यांना सेवा दिली जाते. बालके, गर्भवती महिला, किशोरवयीन मुली, स्तनदा माता यांसाठी विविध उपक्रमही राबवले जातात; मात्र या अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने त्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ही गोष्ट नजरेत आल्यानंतर जिल्ह्यातील अंगणवाड्यांना वीज आणि पाणी उपलब्ध करून देऊन उंची मापक पट्टी, डिजिटल वजन काटे, बाळाची उंची मोजण्याची पट्टी आदी उपकरणे १ जुलैपर्यंत उपलब्ध करून देणार असल्याचे महिला आणि बालक विभागाने सांगितले आहे.

याच समवेत जिल्ह्यातील ४२८ अंगणवाड्यांना सोलर बसवण्यात आले आहेत. १५ व्या वित्त आयोगातून मिळणार्‍या ४० सहस्र रुपयांच्या निधीतून २०३ अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ सहस्र ३८५ अंगणवाड्यांमध्ये विजेची जोडणी करण्यासाठी ग्रामपंचायतींना ३ सहस्र रुपयांचा निधी वर्ग केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन वीज वितरणाशी समन्वय साधत लवकरात लवकर वीजजोडणी करून घ्यावी, तसेच काही अडचण असल्यास महिला आणि बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.बी. गिरासे यांनी सांगितले आहे

संपादकीय भूमिका

अंगणवाड्यांमध्ये प्राथमिक सुविधाही कशा नाहीत ? शासनाने दिलेला निधी जातो कुठे ? असा प्रश्न सामान्यांना पडल्यास चूक काय ?