‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या चतुर्थ दिवसाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण
‘१५.६.२०२२ या दिवशी गोवा येथील ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या चतुर्थ दिवशी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.
१. श्री. राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर, महाराष्ट्र.
अ. वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून श्रोत्यांचे रक्षण होण्यासाठी अधिवेशनाच्या ठिकाणी सूक्ष्मातून श्रीकृष्णाचे सोनेरी रंगाचे सुदर्शनचक्र फिरतांना दिसले.
आ. अधिवेशनाच्या ठिकाणी वाईट शक्तींनी पाताळांतून वर येऊन गटागटाने काळ्या नागांचे रूप धारण केले आणि काही क्षणांतच त्या अधिवेशनाच्या ठिकाणी सर्वत्र पसरलेल्या दिसल्या. त्यामुळे वातावरणात त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण होऊ लागेल. नाग थोड्या वेळाने चैतन्यामुळे नष्ट झाले.
इ. सभेच्या ठिकाणी वरून खाली निळ्या रंगाचे चकमदार दैवी कण आलेले दिसायचे. त्यामुळे वातावरणातील सत्त्वगुण वाढायचा. त्यातून त्रासदायक शक्ती न्यून झाल्याने वातावरण हलके बनायचे.
२. श्री. अर्जुन संपथ, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी, तमिळनाडू.
अ. रामनाथ देवस्थान परिसराच्या बाहेर काही अतृप्त आत्मे दिसले. देवस्थान परिसरात चैतन्य असल्याने आणि अतृप्त आत्म्यांची शक्ती अल्प पडत असल्याने त्यांना अधिवेशनाच्या ठिकाणी पोचता येत नव्हते. त्यामुळे ते दूर अंतरावरून ‘अधिवेशनात काय चालले आहे ?’, हे पहात होते. काही अतृप्त आत्मे तेथे थांबून होते, तर काही अन्यत्र निघून गेले.
आ. श्री. संपथ हे तमिळनाडूमधील हिंदूंच्या गंभीर समस्यांच्या संदर्भात सांगत होते. हा विषय समजायला कठीण होता; परंतु ते सांगत असतांना त्यांचे ईश्वराशी अनुसंधान होते. त्यामुळे हा विषय ऐकतांना कुठलाही त्रास न होता माझ्या मनाला ईश्वरी आनंद मिळत होता.
३. श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.
अ. श्री. शिंदे यांनी मार्गदर्शनात ‘हलाल जिहाद’ हा विषय सांगण्यास आरंभ केला. त्यांनी हलालच्या माध्यमातून मुसलमान करत असलेल्या आर्थिक षड्यंत्राचे विश्लेषण केले. तेव्हा वाईट शक्तींची मोठी आक्रमणे सभेच्या ठिकाणी होऊ लागली. त्यामुळे वातावरणात पुष्कळ दाब निर्माण झाला.
आ. ‘हा विषय सर्वांपर्यंत पोचू नये’, यासाठी वाईट शक्ती मोठमोठ्याने किंचाळत असल्याचा आवाज मला ऐकू येत होता.
इ. एक वाईट शक्तीचे जनावराच्या तोंडाप्रमाणे तोंड होते. तिने सभेवर सूक्ष्मातून जोराने आक्रमण केले; परंतु तेथे भगवान शिवाचे त्रिशूळ अकस्मात् आले आणि ती वाईट शक्ती नष्ट झाली. त्यानंतर तिचा सूक्ष्मदेह पाताळांतील काही वाईट शक्तींनी खाली, म्हणजे पाताळात नेला.
ई. सभेच्या मध्यभागी सूर्याप्रमाणे तेजस्वी गोल आकारात ईश्वरी शक्तीचे अस्तित्व जाणवत होते. त्यातून ईश्वरी शक्तीचे वातावरणात प्रक्षेपण होत होते. त्यामुळे त्या वेळी सभेच्या ठिकाणी वाईट शक्तीचे अस्तित्व शून्य झाले होते.
४. श्री. प्रशांत संबरगी, चित्रपट वितरक, कर्नाटक.
श्री. संबरगी बोलत असतांना सभेच्या ठिकाणी अनेक वेळा विद्युत्यंत्रणा खंडित होत होती. त्यामुळे त्यांना विषय मांडता येत नव्हता. त्या वेळी या प्रसंगाला उद्देशून एक वाईट शक्ती कुत्सितपणे हसली; कारण वाईट शक्तीला विषयात अडथळे येत असल्याचा आनंद झाला होता.
५. अधिवक्त्या (श्रीमती) रचना नायडू, छत्तीसगड.
अ. अधिवक्त्या (श्रीमती) नायडू बोलतांना काही क्षण माझे डोळे बंद होते, तेव्हा मला सूक्ष्मातून एक देवी व्यासपिठावर पुष्पवृष्टी करतांना दिसली. ही देवी मला ओळखता आली नाही. मी डोळे उघडून ती देवी व्यासपिठावर ‘नेमकी कुणावर पुष्पवृष्टी करत आहे ?’ हे पाहिले, तेव्हा ती देवी ‘व्यासपिठावर बसलेल्या पू. रमानंद गौडा यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहे’, असे मला दृश्य दिसले. पुष्पवृष्टीच्या माध्यमातून देवी पू. गौडा यांना आशीर्वाद देत होती.
आ. या सत्राच्या वेळी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सूक्ष्मातून उपस्थिती जाणवत होती.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०२२)
|