राज्यात दहावीचा निकाल ९६.९४ टक्के !
|
मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या; पण यंदा कोरोना आटोक्यात असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ‘ऑफलाईन’ पद्धतीने घेण्यात आल्या.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वांत अल्प लागला. यंदाही निकालात मुलीच पुढे आहेत. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे.
यंदा १५ लाख ६८ सहस्र ९७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी १५ लाख २१ सहस्र ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७९.०६ टक्के इतकी आहे.
राज्यातील १२ सहस्र २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. २९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. मार्च २०२० च्या तुलनेत या वेळचा निकाल १.६४ टक्के अधिक लागला आहे.
या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारून अधिकचे गुण मिळवण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यायची आहे, अशांसाठी लागोपाठ दोनवेळा होणार्या म्हणजे जुलै-ऑगस्ट २०२२ आणि मार्च २०२३ मध्ये होणार्या परीक्षेच्या वेळी पुन्हा परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे, अशांना २० ते २९ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ज्यांना पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांनी झेरॉक्स कॉपी मिळाल्यावर पुढील पाच दिवसांत ऑनलाईन अर्ज करावेत. त्यासाठी प्रतिविषय ३०० रुपये भरावे लागणार आहेत.