शेतभूमीची हद्द कायम करण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच घेतांना भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीदार कह्यात !
इंदापूर (पुणे) – शेतभूमीची हद्द कायम करण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच घेतांना इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कह्यात घेतले. राजाराम शिंदे (वय ५४ वर्षे) असे या लाचखोर मोजणीदार कर्मचार्याचे नाव आहे. इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील शेतकर्याला भूमीची मोजणी आणि हद्द कायम करायची होती. त्याने भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर शासकीय शुल्कही भरले होते; मात्र नमूद क्षेत्राच्या मोजणीनंतर हद्द कायम करण्यासाठी शिंदे यांनी शेतकर्याच्या पुतण्याकडे पैसे देण्याची मागणी केली. याविषयी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्याने त्यांनी सापळा रचून शिंदे यास कह्यात घेतले. (भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था सुधारण्यासाठी धर्माधिष्ठित राज्य हवे. – संपादक)