VIDEO : नेपाळला हिंदु राष्ट्र करण्यासाठी भारताच्या साहाय्याची आवश्यकता ! – डॉ. भोलानाथ योगी, हिंदु विद्यापीठ, नेपाळ
नेपाळमध्ये ९५ टक्के हिंदू आहेत; परंतु पाश्चात्त्यांच्या प्रभावामुळे आता तेथे टोपीच्या ऐवजी ‘टाय’ला प्राधान्य दिले जात आहे. नोकरीच्या निमित्ताने पाश्चात्त्य देशांत गेल्यामुळे नेपाळमध्ये पाश्चात्त्यांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे हाताने भोजन करणार्यांना असभ्य समजले जाते. पाश्चात्त्यांचा प्रभाव वाढला असला, तरी नेपाळ अजूनही भारतीय संस्कृतीशी जोडला आहे. सद्य:स्थितीत नेपाळमधील १० सहस्र नागरिक भारतातील धार्मिक क्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी भारतात आले आहेत; परंतु हे सर्व हिंदू संघटित नाहीत. त्यामुळे नेपाळ साम्यवादी आणि नास्तिकतावादी यांचा अड्डा बनला आहे. नेपाळ सांस्कृतिकदृष्ट्या हिंदु राष्ट्रच आहे; परंतु राज्यघटने त्याला मान्यता देऊन ते हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे. नेपाळी घालत असलेली टोपी, हे हिमालयाचे प्रतीक आहे. नेपाळमधील चलनी नोटांवर भगवान गोरखनाथ यांचे चित्र आहे. नेपाळमध्ये आजही ख्रिस्ती ‘कॅलेंडर’ चालत नाही, तर तेथे हिंदु पंचांगाचा उपयोग केला जातो. नेपाळ हे धार्मिकदृष्ट्या हिंदु राष्ट्रच आहे. राज्यघटनात्मक हिंदु राष्ट्र होण्यासाठी आम्हाला भारताकडून साहायाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नेपाळ येथील हिंदु विद्यापिठाचे डॉ. भोलानाथ योगी यांनी केले. ते अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीच्या ‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ या सत्रातील ‘पाश्चात्त्यांच्या प्रभावामुळे नेपाळमधील हिंदु संस्कृतीची होत असलेली हानी’, याविषयावर बोलत होते.
भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी प्रत्येक गाव हिंदु राष्ट्र करणे आवश्यक ! – प्रकाश दास, अध्यक्ष, कोलकता, बंगाल
आपण जन्माने ‘हिंदू’ आहोत, कर्मानेही ‘हिंदू’ होणे आवश्यक आहे. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला ‘युद्धात हरलास, तर मला प्राप्त होशील आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य प्राप्त होईल’, असे सांगितले. शेवटी भगवंताने अर्जुनाला युद्ध करण्याचे आवाहन केले. हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठीही कर्म केले, तरच आपणाला भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य मिळेल. आपली संस्कृती एक आहे; परंतु अन्य हिंदूंवर अत्याचार होतो, तेव्हा हिंदू एकत्र येत नाहीत. बंगालमधील हिंदूंची स्थिती दयनीय आहे. आपण हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची घोषणा करतो; परंतु पाचव्या मजल्यावर चढण्यासाठी प्रथम पहिल्या मजल्यावर चढावे लागते. त्याप्रमाणे भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी प्रथम एक-एक गाव हिंदु राष्ट्र करणे आवश्यक आहे. ‘गायी कापणारे आणि गायीची पूजा करणारे एकत्र राहू शकत नाहीत’, हे आपण लक्षात घ्यायला हवे. हिंदू अन्यायाच्या विरोधात लढायला प्रारंभ करतील, तेव्हाच समाजाचा पाठिंबा मिळेल. आपणाला भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्याप्रमाणे कार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात जिजामाता निर्माण झाली, तरच छत्रपती शिवाजी महाराज घडतील. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जिजामाता निर्माण व्हायला हवी.
आपल्या भागात गेल्यावर राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी अधिकाधिक वेळ द्यावा !
अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातून आपल्या भागात गेल्यानंतर आपणाला राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी अधिकाधिक वेळ द्यायला हवा. आपली साधना आणि तपस्या राष्ट्र अन् धर्म यांसाठी द्यायला हवी, असे आवाहन श्री. प्रकाश दास यांनी केले.
भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या साहाय्याने नेपाळमध्ये १ मासात हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – श्री. शंकर खराल, केंद्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, विश्व हिंदु महासंघ, नेपाळ
नेपाळमध्ये पराक्रमी लोक असून ते सनातन परंपरावादी आहेत; मात्र ते बलहीन असल्यामुळे, तसेच राजकीय कुरघोडीमुळे नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र झाले. नेपाळ पुन्हा हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी ते प्रयत्न करत आहोत. तथापि नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यामध्ये ४ अडथळे आहेत. पहिला अडथळा अंतर्गत आहे. विविध हिंदु संप्रदाय संघटित नाहीत. त्यांना संघटित करणे आवश्यक आहे. दुसरा अडथळा बाह्य शक्तींचा आहे. चीन आणि अमेरिका नेपाळचा वापर करून स्वतःचा लाभ करून घेत आहेत. बाह्य आक्रमणापासून नेपाळला वाचवले पाहिजे. तिसरा अडथळा सैद्धांतिक आहे. यामध्ये साम्यवाद्यांनी नेपाळमधील हिंदु राष्ट्र नाहीसे करून नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र केले आहे. त्यामुळे नेपाळ येथे भौतिकतावादी विचार आणि बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. चौथा अडथळा व्यवहारिक आणि अस्पृश्यता हा आहे. नेपाळमधील अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे. नेपाळ येथे हिंदुत्वनिष्ठ खासदारांची संख्या वाढवून हिंदु राष्ट्र आणायला हवे. यासाठी दोन तृतीयांश इतक्या खासदारांची आवश्यकता आहे. वरील ४ अडथळे दूर करायचे असतील, तर भारतातील संतांनी नेपाळला साहाय्य केले पाहिजे. भारतातील संत, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ आणि समविचारी लोक यांना संघटित करून त्यांच्या साहाय्याने नेपाळ येथे हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी भारताने साथ द्यावी. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सनातन संपर्क अभियान चालू केले आहे. गुरुकुल अभियान सर्वांत अधिक चालू आहेत. भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय यांनी संघटितपणे साहाय्य केल्यास आम्ही १ मासात नेपाळ येथे हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतो, असे प्रतिपादन नेपाळ येथील विश्व हिंदु महासंघाचे केंद्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. शंकर खराल यांनी ‘नेपाळ येथे हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यात येणारे अडथळे’ या विषयावर बोलतांना केले.