पाठ्यपुस्तकांत भारताच्या तेजस्वी इतिहासाचा समावेश करण्याचा ठराव हिंदु राष्ट्र संसदेत एकमताने संमत !
हिंदु राष्ट्र संसदेत हिंदु शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्यावर चर्चा !
रामनाथी, १७ जून (वार्ता.) – गोवा येथे चालू असलेल्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील हिंदु राष्ट्र संसदेत ‘पाठ्यपुस्तकात भारताच्या तेजस्वी इतिहासाचा समावेश करावा’, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला. संसदेतील बहुसंख्य सदस्यांनी भारताचा इतिहास घडवणारे संत, राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा समावेश पाठ्यपुस्तकात करण्याची मागणी केली. १६ जून या दिवशी ‘वर्तमान स्थितीमध्ये हिंदु शिक्षणपद्धतीचा अवलंब कसा करावा ?’ या विषयावर झालेल्या हिंदु राष्ट्र संसदेत सभापती मंडळाने हा प्रस्ताव बहुमताने संमत केला. या वेळी सभापती म्हणून पंचकुला, हरियाणा येथील विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री, उपसभापती म्हणून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि सचिव म्हणून हिंदु जनजागृती समितीचे पूर्वाेत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी कामकाज पाहिले.
‘केंद्रशासन ज्या विचारांचे असेल, त्याला अनुकूल पाठ्यक्रम निश्चित केला जातो. सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये ‘शिक्षणाचे भगवेकरण’ हा शब्दप्रयोग रूढ करून करून अपकीर्ती केली जात आहे. त्यामुळे ‘शिक्षणपद्धतीमध्ये हिंदु शिक्षणनीतीचा अवलंब व्हावा’, यावर चर्चा व्हायला हवी’, असे सांगून सभापती श्री. नीरज अत्री यांनी संसदेत चर्चेला प्रारंभ केला.
सदस्यांचे प्रस्ताव
१. श्री. सत्येंद्र द्विवेदी, संचालक, रुद्रप्रयाग विद्यामंदिर, प्रयागराज, उत्तरप्रदेश – शिक्षक विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. शिक्षकांनी शिकवलेल्या विषयांतील ८० टक्के विषय विद्यार्थ्यांना आकलन झाला नाही, तर त्या शिक्षकाला वेतन देण्यात येऊ नये.
२. श्री. राजू श्रीवास्तव, उत्तरप्रदेश – अभ्यासक्रम निश्चित करणार्या शिक्षण मंडळामध्ये संतांचा सहभाग असावा !
३. श्री. अभय देवीदास भंडारी, महाराष्ट्र – शाळांमध्ये मन एकाग्र कसे होईल ? याचे शिक्षण शाळांमध्ये देण्यात यावे. उच्च शिक्षण घेतलेले नीतीमान, नम्र, आज्ञाधारक, चारित्र्यवान असतील, तरच त्यांचे शिक्षण ग्राह्य धरावे. शिक्षकांची नियुक्ती करतांना ते शुद्ध चारित्र्याचे आहेत का, यावरून त्यांचे मूल्यमापन करण्यात यावे.
४. श्री. उमेश सोनार, जळगाव, महाराष्ट्र – मोगलांनी हिंदूंवर जे अत्याचार केले, त्यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमामध्ये शिकवला जायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कशा प्रकारे अफझलखानाचा वध केला, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, हा हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास युवा पिढीला शिकवायला हवा.
सभापती नीरज अत्री यांनी संमत केलेले प्रस्ताव !
१. पूर्वजांनी केलेल्या चुका सुधारणे आणि त्यांचा पराक्रम शिकणे, हे इतिहास शिकवण्यामागील उद्देश आहेत.
२. बहुसंख्य विद्यार्थी हिंदु असल्याने शाळांमध्ये इंग्रजी सण साजरे होऊ नयेत. मुख्य सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकवले जावे.
३. मानसिक एकाग्रता आणि सर्वांगीण विकास यांसाठी शाळांमध्ये ‘योग शिक्षण’ दिले जावे. भगवद्गीतेचा पाठ्यपुस्तकात समावेश करावा.
४. भारताचा सत्य इतिहास शिकवला जायला हवा. जर्मनीमध्ये यहुदींनी केलेल्या अत्याचारांचा इतिहास शिकवला जातो. त्याच धर्तीवर भारतावर इस्लामी आणि ख्रिस्ती यांनी केलेल्या अत्याचारांचा इतिहास शिकवला जावा.
५. जर्मनी, फ्रान्स, इस्रायल या देशांमध्ये मातृभाषेत शिक्षण दिले जाते. त्याचा संबंधित देशांना सकारात्मक लाभ झाला आहे. मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांचा अधिक विकास होतो, त्याआधारे भारताला पुन्हा विश्वात स्थान निर्माण करता येईल.
भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी धर्माधारित शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, उपसभापती, हिंदु राष्ट्र संसद
मनुष्य म्हणून जन्माला आलो असतांना ‘मनुष्यजन्माचे ध्येय काय आहे ?’ हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. ते समजून न घेतल्यामुळे आपल्यामध्ये आंतरिक अशांती निर्माण होते. ‘आनंदप्राप्ती’ हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. यासाठी सुख आणि दु:ख यांमागील कारणे मनुष्याला समजून सांगितली पाहिजेत. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेतून घडणार्या विद्यार्थ्यांच्यात व्यसनाधीनता आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. जीवनात आत्मबल निर्माण करण्यासाठी शिक्षणात धर्माची आवश्यकता आहे. धर्म आणि अधात्म इंग्रजी माध्यमाद्वारे परिपूर्णरित्या शिकवले जाऊ शकत नाही. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये ‘वसुवैध कुटुंबम्’ ही संकल्पना आहे. भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी धर्माधारित शिक्षणव्यवस्थेची आवश्यकता आहे.
उपसभापती सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मांडलेली अन्य सूत्रे…
१. ‘मनाविरुद्ध घडलेल्या घटनांचा सामना करण्याची शक्ती निर्माण करणारे शिक्षण तेच खरे शिक्षण होय.’ सध्याच्या शिक्षणपद्धतीत मनुष्याच्या दु:खामागील कारण शिकवले जात नसल्याने युवा पिढीतील व्यसनाधीनता आणि आत्महत्या यांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकाच्या मनातील अशांती थांबवण्यासाठी शिक्षणव्यवस्था धर्माशी जोडणे आवश्यक आहे.
२. सध्याच्या युवा पिढीला स्वत:ची वस्तू अन्यांना द्यावीशी वाटत नाही. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत स्पर्धा वाढली आहे. स्पर्धा मनुष्यामध्ये द्वेष आणि ईर्ष्या निर्माण करते. हिंदु राष्ट्राची संकल्पना ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ असे शिक्षण देणारी आहे. विनाशाकडे जाणार्या समाजाला पुन्हा विश्वव्यापी बनवण्यासाठी शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला हवेत.
उपसभापतींनी मांडल्या शिक्षणपद्धतीमधील त्रुटी !
शैक्षणिक संस्थांमध्ये किती निधी मिळतो, यावरून शिक्षकाची नियुक्ती केली जाते. अशा प्रकारे शिक्षकांची नियुक्ती होत असेल, तर ते विद्यार्थ्यांचे चारित्र्य कसे घडवणार ? संस्थेसाठी निधी कसा मिळेल, यावरून शिक्षकाची नियुक्ती केली जाते. त्यामुळे संस्कार करणार्यांचे चरित्र कसे असणार ? विद्यार्थ्यांना शिकवतांना संबंधित शिक्षकाने विषयाची पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. शिक्षकांचे मूल्यमापन करण्याची सध्याच्या शिक्षणपद्धतीत व्यवस्था नाही. वर्तमान शिक्षणपद्धतीमधील या त्रुटी आहेत, असल्याचे उपसभापती सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी म्हटले.
भारतात भारतीय शिक्षणपद्धती असणे, हे शिक्षणाचे भगवेकरण नव्हे ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सदस्य, विशेष संसदीय समिती, हिंदु राष्ट्र संसद
भारतातील शिक्षणपद्धत ही भारतीयच असावी. शिक्षण आपल्या भाषेत असावे. मातृभाषेतील शिक्षण विद्यार्थी त्वरित ग्रहण करतात; मात्र इंग्रजी असेल, तर विद्यार्थी घोकमपट्टी करतात. रशिया, फ्रान्स, जर्मनी, इटली येथे येथील मातृभाषेत शिक्षण दिले जाते. इस्रायलनेही मातृभाषेत शिक्षण चालू केले आहे. भारतात भारतीय शिक्षणपद्धत असणे, हे शिक्षणाचे भगवेकरण नव्हे.
अमेरिकेतील ‘अंगठाछाप’ भारतात येऊन इंग्रजी बोलला, तर तो ज्ञानी झाला का ?
‘इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे, ती ज्ञानभाषा नाही. इंग्रजी बोललो म्हणजे ज्ञानी नाही. इंग्रजीने आम्ही ग्रासलेलो आहोत. आपण आपल्या मातृभाषेत शिकवायला हवे. इंग्रजीत शिक्षण देऊन आपण विद्यार्थ्यांना मातृभाषेपासून दूर करतो. अमेरिकेतील अंगठाछाप भारतात येऊन इंग्रजी बोलला, म्हणून तो ज्ञानी झाला का ?’, असा प्रश्न उमेश शर्मा यांनी उपस्थित केला.
… तर कुणाची निर्मिती करणारी शिक्षणपद्धत आपण अनुसरणार आहोत ? – श्री. दुर्गेश परूळेकर, सदस्य, विशेष संसदीय समिती
‘शिक्षणव्यवस्था ही मानव निर्माण करणारी असावी’, असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे. मानव निर्माण करणारी नसेल, तर कुणाची निर्मिती करणारे शिक्षणपद्धत आपण अनुसरणार आहोत ? भारतीय संस्कृतीचा समावेश हे शिक्षणाचे भगवेकरण नाही. त्यामुळे मानव निर्माण करणार्या भारतीय संस्कृतीचा शिक्षणपद्धतीत समावेश करणे, म्हणजे शिक्षणाचे भगवेकरण नाही.
देशाच्या संसदेने भगवद्गीता शिकवण्याचा ठराव करावा ! – श्री. रमेश शिंदे
‘सर्वाेच्च न्यायालयाने गीता हा ‘राष्ट्रीय ग्रंथ’ म्हणून मानण्यास नकार दिला असल्याने भगवद्गीतेचा समावेश शिक्षणात करणे अयोग्य आहे’, असा प्रस्ताव एका सदस्यांनी दिल्यावर त्याचे खंडण करतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले, शाहाबानो खटल्यात मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी संसदेने तो निर्णय पालटला. बहुसंख्य हिंदूंना जर भगवद्गीतेतून शिक्षण मिळणे आवश्यक वाटते, तर देशाच्या संसदेने तसा ठराव केला पाहिजे.
विरोधी पक्षातील एका सदस्याने ‘‘भगवतगीता, रामायण, महाभारत शिकवून शिक्षणाचे भगवेकरण करू नये, तसेच सध्याच्या निधर्मी शिक्षणव्यवस्थेतूनच प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी सिद्ध होतात. त्यामुळे वेगळी शिक्षणपद्धत स्वीकारण्यात येऊ नये’, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाचे खंडण करतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘आर्य हे भारतीय नाहीत, तर ते विदेशी होते आणि मुगल स्वदेशी होते’, अशा प्रकारचे चुकीचे शिक्षण दिले जाते. ज्या शिक्षणात ‘भगतसिंग आतंकवादी होते’, ‘महाराणा प्रताप पदभ्रष्ट होते’, असे शिक्षण देण्यात येते, अशा प्रकारच्या ‘एन.सी.इ.आर.टी.’चे शिक्षण देण्याचा प्रस्ताव योग्य नाही. अशी अनुचित शिक्षणपद्धती आपण स्वीकारू नये.’’