गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमीष दाखवून सेवानिवृत्त शास्त्रज्ञाची फसवणूक !
पुणे – गुंतवणुकीवर ज्यादा परताव्याचे आमीष दाखवून उच्चशिक्षित दांपत्याने सेवानिवृत्त शास्त्रज्ञाची १ कोटी ५६ लाख ५२ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात जितेंद्र शेडगे आणि प्रीती शेडगे यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा अन् फसवणूक या कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. जितेंद्र शेडगे यांना कह्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शेडगे दांपत्याने ‘पुणे सिटी डील्स डॉट कॉम’ या नावाचे संकेतस्थळ चालू केले होते. या संकेतस्थळाच्या माध्यमातून मोबाईल रिचार्ज, वीजदेयक भरल्यास सूट देण्यात येत होती. त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये त्यांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याची योजना चालू केली होती. तक्रारदारांनी गुंतवलेल्या रकमेवर त्यांनी परतावा दिला नसल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज प्रविष्ट केला. आणखी कुणाची फसवणूक झाल्यास नागरिकांनी सायबर पोलीस ठाण्यात (शिवाजीनगर पोलीस मुख्यालय) तक्रार द्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.