‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या तृतीय दिवसाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

१४.६.२०२२ या दिवशी गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थाना’मध्ये दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या तृतीय दिवशी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.


१. श्री. एम्. नागेश्वर राव, पूर्व महासंचालक, सी.बी.आय.

श्री. राम होनप

अ. श्री. राव बोलत असतांना वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांमुळे अधिवेशनाला उपस्थित असलेल्या काही धर्मप्रेमींवर त्रासदायक (काळे) आवरण आलेले दिसले. त्याच वेळी तेथे धर्मलहरी, म्हणजे ईश्वरी लहरी येऊन त्या श्रोत्यांवरील त्रासदायक आवरण नष्ट करत होत्या. सर्व राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी निःस्वार्थ वृत्तीने अधिवेशात सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांना ‘कुठलाही त्रास होऊ नये’, यासाठी ‘ईश्वर स्वतः त्यांची काळजी घेत आहे’, असे मला जाणवले.

आ. अधिवेशनाच्या ठिकाणी वाईट शक्तींमुळे दाब निर्माण झाला होता. त्या वेळी वातावरणात अकस्मात् चंदेरी रंगाचे दैवी कण प्रकट झाले. त्यातून तेजतत्त्वाची निर्मिती झाली आणि क्षणात् वातावरणातील दाब नष्ट झाला.

इ. श्री. राव यांनी ‘सरकारचे हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, तर दुसरीकडे सरकारने मुसलमानांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम हाती घेतले आहेत’, याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी सरकारने मुसलमानांच्या अडचणी सोडवण्यासाठी सिद्ध केलेले संकेतस्थळ प्रोजेक्टरवर दाखवले. ‘हा विषय श्रोत्यांना समजू नये’, यासाठी वाईट शक्ती वटवाघळाच्या रूपात फिरून त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण श्रोत्यांवर करत होत्या.

२. श्रीमती एस्थर धनराज, भाग्यनगर

अ. ‘ख्रिस्ती प्रचारक भारतात हिंदुविरोधी प्रसार कसे करत आहेत ?’ याविषयी श्रीमती एस्थर मार्गदर्शन करत होत्या. त्या वेळी सूक्ष्मातून मला सभेच्या ठिकाणी पांढऱ्या पोशाखात अनेक नन्स आलेल्या दिसल्या.

आ. श्रीमती एस्थर जगात ख्रिस्ती धर्माची दुःस्थिती सांगत होत्या. त्या वेळी ‘श्रोत्यांना या विषयाचे आकलन होऊ नये’, यासाठी पाताळांतून सूक्ष्मातील गुलाबी रंगाचे मायावी कण वर आले आणि ते सभेच्या ठिकाणी वातावरणात पसरले. त्यामुळे श्रोत्यांना ‘विषयाचे आकलन न होणे अथवा न सुचणे, विषयात मन एकाग्र न होणे, मनात अनावश्यक विचार येणे, विषयावर विश्वास न बसणे’, असे त्रास होत होते. या गुलाबी मायावी कणांचा वातावरणात काही मिनिटे परिणाम टिकून होता. त्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या
संतांकडून प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्याने तो परिणाम नष्ट झाला.

इ. हवेत असंख्य माशा घोंगावतांना दिसतात, त्याप्रमाणे वाईट शक्तींनी निर्माण केलेले काळ्या रंगाचे असंख्य कण श्रोत्यांभोवती फिरत होते. त्यामुळे श्रीमती एस्थर यांचा विषय चालू असतांना ‘श्रोत्यांकडून नकळत आपापसांत बोलणे अथवा भ्रमणभाष चालू करून त्यावर काहीतरी पहाण्याची इच्छा होणे’, अशा कृती होत होत्या. कालांतराने चैतन्याने काळ्या रंगाचे कण नष्ट व्हायचे; पण काही वेळाने असंख्य काळे कण वातावरणात परत निर्माण व्हायचे. असे सूक्ष्मातील युद्ध निरंतर चालू होते.

३. श्री. नीरज अत्री, अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा.

अ. श्री. अत्री बोलतांना त्यांच्या पाठीमागे मला सूक्ष्मातून ‘ॐ’ दिसला. त्यातून ‘श्री. अत्री यांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते’, असे मला जाणवले. यापूर्वी मला वक्त्यांच्या पाठीमागे विशिष्ट देवता दिसायच्या. या वेळी प्रथमच मला वक्त्याच्या पाठीमागे सूक्ष्मातून ‘ॐ’ दिसला.

आ. श्री. अत्री यांनी घरवापसीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात पूर्वी काही हिंदूंनी मुसलमान धर्मात प्रवेश केला होता. त्यांना परत हिंदु धर्मात आणण्याचे (घरवापसीचे) कार्य श्री. अत्री करत आहेत. त्यांच्या वाणीतून प्रक्षेपित होत असलेल्या धर्मतेजाने वातावरणातील वाईट शक्तींचा प्रभाव क्षीण झाला होता.

४. पू. (अधिवक्ता ) हरि शंकर जैन

अ. पू. जैन एका तपस्वी ऋषींप्रमाणे तेजस्वी दिसत होते.

आ. पू. जैन यांच्या वाणीतून प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्याने वातावरणात वाईट शक्तींमुळे निर्माण झालेला दाब न्यून झाला.

इ. पू. जैन यांच्या वाणीतून प्रसंगांनुरूप ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ यांचे प्रकटीकरण होत होते.

ई. पू. जैन मार्गदर्शन करतांना एका प्रसंगी हसले. त्या वेळी वातावरणात आनंदाच्या दैवी कणांचे प्रक्षेपण झाले. त्यामुळे वातावरणात उत्साह निर्माण झाला.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.६.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक