वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रशासनाने सर्व हिंदुविरोधी कायदे रहित करावेत ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय
हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या तृतीय दिनी ‘हिंदू सुरक्षा’ या उद्बोधन सत्रात प्रतिपादन
रामनाथी, १४ जून (वार्ता.) – देशात कृषी कायदा, नागरिकत्व सुधारणा कायदा यांच्या विरोधात आंदोलने होऊ शकतात, तर हिंदुत्वासाठी आंदोलन का होऊ शकत नाही ? हिंदुत्वासाठी देशाला हलवून टाकले पाहिजे. ‘हिंदुहितासाठी काम करणारेच देशात राज्य करू शकतील’, हे हिंदूंनी दाखवून दिले पाहिजे. ‘देशात कोणते कायदे असायला हवेत’, हे हिंदूंनी ठरवायला हवे. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने सर्व हिंदुविरोधी कायदे रहित करावेत, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांनी केले. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या तृतीय दिनी ‘हिंदू सुरक्षा’ या उद्बोधन सत्रात ‘हिंदु राष्ट्राचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपली कर्तव्ये’ या विषयावर ते बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर मुंबई (महाराष्ट्र) येथील ‘आफ्टरनून वॉईस’ या वृत्तपत्राच्या प्रमुख संपादिका डॉ. वैदेही ताम्हण, हरियाणा येथील भाजपच्या महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या सदस्या श्रीमती नंदा डगला, महाराष्ट्रातील ठाणे येथील हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश परूळकर आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे उपस्थित होते.
या वेळी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले,
१. अयोध्येतील श्रीराममंदिराचा पाया, हा धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा पाया आहे. श्रीरामाचे भव्य मंदिर २ वर्षांत पूर्ण होईल, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्यही पुढे जाईल.
२. ख्रिस्ती आणि मुसलनान यांनी कह्यात घेतलेली मंदिरे आपणाला पुन्हा घ्यायची आहेत. ताजमहल हा तेजोमहालय आहे. शहाजहान याने जयसिंह याच्याकडून ताजमहाल घेतला. ताजमहाल हा तेजोमहालय असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.
३. १६ मे २०२२ या दिवशी कथित ज्ञानवापी मशिदीच्या वजूखान्यात (नमाजाच्या आधी हात-पाय धुण्याचे ठिकाण) शिवलिंग प्रकट झाले. भगवान शिव प्रकट झाले, तो क्षण अवस्मरणीय होता. भगवान शिवाच्या मागे शक्ती आहे. ज्ञानवापीमध्ये प्रकट झालेले महादेव हिंदु राष्ट्राच्या स्थापनाचे आवाहन करत आहेत.
ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या शाळांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा !
अन्य कुणामध्ये करण्याआधी प्रथम हिंदूंमध्येच जागृती करणे आवश्यक आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या शाळांतील ९८ टक्के विद्यार्थी हे हिंदू आहेत. केजीपासून ख्रिस्ती शाळांमध्ये जाणार्या हिंदूंच्या मुलांवर कोणते संस्कार होणार ? हिंदु पालकच स्वत:च्या पाल्यांवर केक कापणे, हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नाचणे आदी गोष्टी शिकवत आहेत. याविषयी हिंदूंनीच आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या शाळांवर हिंदूंनी बहिष्कार टाकायला हवा. |
भारतात ईशनिंदेच्या विरोधात कायदा व्हायला हवा !
प्रत्येक देशाची एक संस्कृती आणि सभ्यता असते. भारताची सभ्यता आणि संस्कृती लाखो वर्षांपूर्वीची आहे. श्रीराम, श्रीकृष्ण, शीव आणि शक्ती यांचे अस्तित्व या देशाच्या कणाकणांत आहे. या देशाचे ते आत्मा आहेत. भारतभूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा आदर करावाच लागेल.