वेंगुर्ला येथे फलटण येथून पळून आलेली अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या कह्यात, तर समवेतचा युवक पसार
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) – शहरातील निमुसगा येथे वाहनांची तपासणी करत असतांना पोलिसांनी फलटण, सातारा येथील अल्पवयीन मुलगी आणि युवक यांना दुचाकीवरून गोवा ते मालवण प्रवास करतांना कह्यात घेतले. हे दोघे १२ जून या दिवशी फलटण येथून पळून गोव्यात आले होते. (सध्या धर्मशिक्षणासह नैतिक मूल्यांचे शिक्षण देणारी व्यवस्था उद्ध्वस्त होऊ लागल्याने असे प्रकार वरचेवर घडत आहेत. सरकारच्या विकासाभिमुख कार्याला नीतीमूल्यांचा आधार नसल्यास समाजाची घसरण होते, हे अशा घटनांतून लक्षात येते. – संपादक)
निमुसगा येथे वाहतूक पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या युगुलाची दुचाकी थांबवून त्यांची आणि गाडीचे कागदपत्र यांची चौकशी करत होते. या वेळी अल्पवयीन मुलीसमवेतचा युवक तेथून पसार झाला. त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता तिने दोघेही फलटण येथील असून १२ जूनला पळून आल्याचे सांगितले. त्यानुसार वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी फलटण ग्रामीण भाग पोलिसांशी संपर्क करून चौकशी केली असता त्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणी त्या युवकावर गुन्हा नोंद असल्याचे समजले. या प्रकरणी पुढील कार्यवाही चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिकासध्या समाजात विविध माध्यमांतून दाखवल्या जाणार्या उच्छृंखलपणाचा हा दुष्परिणाम ! |