मंगळुरू येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. काशीनाथ प्रभु यांच्याकडून ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गुरुप्रसाद गौडा यांना शिकायला मिळालेली सूत्रे
१. नम्रता
श्री. काशीनाथ प्रभु (काशीनाथअण्णा) साधकांशी पुष्कळ नम्रतेने बोलतात. त्यांच्या बोलण्यामुळे साधकांना आधार वाटतो. साधक असो किंवा समाजातील व्यक्ती असो, ते सर्वांशी नम्रतापूर्वकच बोलतात.
२. विचारण्याची वृत्ती
खरेतर काशीनाथअण्णांना सेवेविषयी सर्व ठाऊक आहे आणि अनुभवही आहे, तरीही ते प्रत्येक कृती पू. रमानंदअण्णा (सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा) यांना विचारून करतात. त्यामुळे ती कृती योग्य आणि संतांना अपेक्षित अशी परिपूर्ण होते.
३. इतरांचा विचार करणे
साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासह ते साधकांचे आरोग्य आणि त्यांची स्थिती यांचा अभ्यास करून संतांना त्याचा आढावा देतात. त्यांना वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव आहे. त्यानुसार ते साधकांच्या आरोग्याची काळजीही घेतात.
४. तत्त्वनिष्ठता
साधकांकडून सेवेत काही चुका झाल्या, तर काशीनाथअण्णा प्रत्येक वेळी साधकांना त्या चुका तत्त्वनिष्ठतेने सांगतात.
५. अल्प अहं
काशीनाथअण्णा प्रत्येक प्रसंगात न्यूनता घेतात. सेवेत चुका झाल्यावर ‘मीच न्यून पडलो’, असा त्यांचा विचार असतो.
६. सेवेची तळमळ
अ. पू. रमानंदअण्णा काशीनाथअण्णांना सेवा सांगतात. तेव्हा त्यांचे लगेचच त्या सेवेविषयी चिंतन चालू होते. त्यानंतर काशीनाथअण्णा ते चिंतन लिहून पू. रमानंदअण्णा यांना दाखवून घेतात. त्यानंतर त्यानुसार ते कृती चालू करतात.
आ. त्यांच्याकडील सेवा ते दिवस-रात्र एक करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कुठलीही सेवा असो, ते ‘मला जमणार नाही’, असे सांगत नाहीत; तर ‘प्रयत्न करतो’, असे सांगतात. सर्व सेवांच्या संदर्भात काशीनाथअण्णांचा असाच प्रयत्न असतो.
इ. ‘काशीनाथअण्णा पू. रमानंदअण्णा यांचे आज्ञापालन करतात. पू. रमानंदअण्णा काशीनाथअण्णा यांना जी सेवा सांगतात, ती सेवा ते तळमळीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते साधकांचा पाठपुरावा घेतात, त्यांना सेवेची आठवण करून देतात आणि त्यांना त्या सेवेसाठी समयमर्यादा घालून देतात.
७. सेवेचा आढावा तत्परतेने देणे
काशीनाथअण्णा पू. रमानंदअण्णांना प्रत्येक सेवेचा तत्परतेने आढावा देतात. पू. रमानंदअण्णा प्रत्येक वेळी साधकांना सांगतात, ‘‘काशीनाथअण्णा सेवा झाल्यावर आढावा देतात, तसाच आढावा सर्वांनी देणे अपेक्षित आहे.’’
८. भाव
अ. मी काशीनाथअण्णांशी बोलतो, तेव्हा मला त्यांच्या बोलण्यात भाव जाणवतो.
आ. जेव्हा काशीनाथअण्णा संतांशी बोलतात, तेव्हा ते संतांसमोर नेहमी हात जोडूनच उभे रहातात. त्या वेळी ते भावावस्थेत असतात.
इ. सत्संगात पू. रमानंदअण्णा गुरुदेवांविषयी सांगतात. तेव्हा काशीनाथअण्णांची भावजागृती होते. ‘सर्वकाही गुरुदेव आणि संत करतात’, असे ते पुनःपुन्हा सांगतात. ‘गुरुदेवांनी आपल्यासाठी काय काय केले आहे ! आतापर्यंत त्यांनीच सर्वकाही केले आहे आणि यापुढेही तेच करणार आहेत’, असा भाव सतत त्यांच्या मनात असतो.
९. प्रार्थना
काशीनाथअण्णांमध्ये पुष्कळ सारे गुण आहेत; पण त्यांतून शिकण्यास आणि ते गुण कृतीत आणण्यास मी न्यून पडतो. मी गुरुदेवांना शरणागतभावाने प्रार्थना करतो, ‘काशीनाथअण्णांमध्ये असलेले गुण माझ्यातही निर्माण होण्यासाठी माझ्याकडून तळमळीने प्रयत्न होऊ दे.
– श्री. गुरुप्रसाद गौडा (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), मंगळुरू (९.४.२०२१)