निवडणूक पूर्व आणि मतदानोत्तर चाचण्यांवर बंदी घालण्याचा निवडणूक आयोगाचा केंद्राला प्रस्ताव
दोन जागांवरून निवडणूक लढवण्यावरही बंदी घालण्याची मागणी
नवी देहली – निवडणूक आयोग हा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्ष यांच्या संदर्भातील नियमांमध्ये मोठे पालट करण्याच्या सिद्धतेत आहे. आयोगाने कायदा मंत्रालयाला एकूण ६ प्रमुख प्रस्ताव पाठवले आहेत. या प्रस्तावांमध्ये निवडणुकीच्या अधिसूचनेच्या पहिल्या दिवसापासून ते मतदानाचे सर्व टप्पे होईपर्यंत निवडणूक पूर्व आणि मतदानोत्तर चाचण्या प्रसारित करण्यावर बंदी घालण्यात यावी, याचा प्रामुख्याने समावेश आहे. यासह दोन जागांवरून निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी, निवडणूक आयोगाला राजकीय पक्षांची नोंदणी रहित करण्याचे अधिकार मिळावेत, राजकीय पक्षांना २० सहस्र नव्हे, तर २ सहस्र रुपयांवरील सर्व देणग्या उघड करणे अनिवार्य करण्यात यावे, मतदान ओळखपत्र आधारकार्डशी जोडवे, वर्षातून ४ वेळा मतदारनोंदणी करण्यास मान्यता द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.