दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
१. शंखनाद
पुरोहितांनी शंखनाद केल्यावर शंखातून श्रीविष्णूची नादशक्ती वातावरणात कार्यरत झाली. त्यामुळे वातावरणातील दाब न्यून होऊन सर्वत्र चैतन्यदायी पिवळसर रंगाचा दैवी प्रकाश पसरला आणि पृथ्वीच्या वायूमंडलाकडे उच्चलोकातून देवतांच्या तत्त्वलहरी आकृष्ट होऊ लागल्या.
२. प्रार्थना
अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सर्वांनी प्रार्थना केल्यावर ईश्वराच्या निर्गुण शक्तीचा प्रवाह अधिवेशनाच्या ठिकाणी येऊ लागला. त्यामुळे अधिवेशनाच्या ठिकाणी दैवी शक्तीचे केंद्र निर्माण होऊन अधिवेशनाला उपस्थित असणार्या धर्माभिमान्यांच्या भोवती ईश्वरी कृपेचे संरक्षककवच निर्माण झाले.
३. दीपप्रज्वलन
जेव्हा कार्यक्रमस्थळी दीपप्रज्वलन करण्यात आले, तेव्हा समईच्या ज्योतीमध्ये सूर्यदेवतेचा तेजांश कार्यरत झाला आणि हे तेज समईच्या ज्योतींतून संपूर्ण आसमंतात प्रक्षेपित झाले.
४. वेदमंत्र
वेदमंत्रातील शांती मंत्रांमुळे कार्यक्रमस्थळी पुष्कळ प्रमाणात ईश्वराची तारक शक्ती आणि चैतन्य कार्यरत झाले. त्यामुळे कार्यक्रमस्थळाचे वातावरण प्रसन्न झाले आणि तेथे उपस्थित असणार्यांना शांतीची अनुभूती आली. यावरून वेदमंत्रांमधून किती मोठ्या प्रमाणात दैवी ऊर्जेचे प्रक्षेपण होते आणि सर्वांना किती उच्च स्तरीय अनुभूती येते हे लक्षात येते. यावरून हिंदु धर्मामध्ये कार्यक्रमाच्या आरंभी वेदमंत्रांचे उच्चारण करण्यास सांगण्यामागील कारण आणि त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येते.
५. संतांचा सन्मान करणे
जेव्हा संतांचा सन्मान चालू होता, तेव्हा व्यासपिठावर उपस्थित असणार्या संतांवर देवतांनी सूक्ष्मातून पुष्पवृष्टी केली. त्याचप्रमाणे संतांचा सन्मान झाल्यामुळे त्यांच्यातील अप्रकट अवस्थेत असलेले देवत्व प्रकट होऊन कार्यरत झाले. त्यामुळे संतांकडून प्रक्षेपित झालेली दैवी ऊर्जा आणि दैवी चैतन्य यांमुळे धर्मसेवा करणार्या हिंदुत्वनिष्ठांना दैवी पाठबळ अन् धर्मसेवा करत असतांना साधना करून संतपद प्राप्त करण्याची आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
६. ग्रंथांचे प्रकाशन करणे
‘हलाल’ विषयी जागृती निर्माण करणार्या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले, तेव्हा त्यातून ज्ञानशक्तीचे पिवळ्या रंगाचे किरण प्रक्षेपित झाले. त्यामुळे ‘हलाल’ची मान्यता प्राप्त करण्यासाठी अहिंदु करत असलेल्या षड्यंत्राविषयी समाजातील हिंदूंच्या मनात जागृती होण्यास आणि ‘हलाल’च्या मान्यतेला विरोध करण्यासाठी साहाय्य होणार आहे.
७. सद्गुरु सत्यवान कदम यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश वाचून दाखवणे
सद्गुरु सत्यवानदादांच्या चैतन्यदायी पश्यंती वाणीतून परात्पर गुरुदेवांचा संदेश ऐकल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असणार्या हिंदुत्वनिष्ठांच्या मनावर हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी धर्माचरण आणि साधना करण्याचे महत्त्व बिंबले. त्याचबरोबर समस्त हिंदुत्वनिष्ठांनी तळमळीने केलेल्या प्रयत्नांमुळे पृथ्वीवर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पातील शक्ती पूर्णपणे कार्यरत झाली. त्यामुळे काही वर्षांतच पृथ्वीवर प्रथम सूक्ष्म आणि नंतर स्थूल स्तरावर हिंदु राष्ट्र स्थापन होऊन परात्पर गुरुदेवांनी केलेला संकल्प सिद्ध होणार आहे.
८. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या संदेशाचे चलत्चित्र दाखवणे
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या माध्यमातून एका दैवी शक्तीने गोव्यात होणार्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाला शुभाशीर्वाद दिल्याचे जाणवले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून येणारे ५ ते १० टक्के अडथळे दूर झाले.
९. कोरोनाच्या कालावधीत दिवंगत झालेले साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी पुरोहितांनी श्रीदत्तगुरूंचे ‘घोरकष्टोद्धारण स्तोत्र’ भावपूर्णरित्या म्हटल्यामुळे त्यांना मृत्यूनंतरच्या जीवनात आध्यात्मिक ऊर्जा मिळणे
कोरोनाच्या कालावधीत मृत झालेले साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी श्रद्धांजली वहाण्यात आली. तेव्हा सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी श्रीदत्तगुरूंचे ‘घोरकष्टोद्धारण स्तोत्र’ भावपूर्णरित्या म्हटले. त्यामुळे मृत झालेल्या कर्महिंदूंच्या लिंगदेहाभोवती श्रीदत्त कृपेचे संरक्षककवच निर्माण होऊन त्यांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण झाले आणि त्यांना मृत्यूत्तर चांगली गती मिळाली. त्यामुळे दिवंगत साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मृत्यूनंतरच्या जीवनात धर्माचरण अन् साधना करण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा मिळाली.
१०. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या ठिकाणी भगव्या रंगाच्या धर्मसूर्याचे दर्शन झाले. सद्गुरु पिंगळेकाकांची वाणी पश्यंती असून ती नादमय न जाणवता देवतांच्या भाषेप्रमाणे प्रकाशभाषा असल्याचे जाणवले. याचे कारण त्यांच्यात धर्मतेजाचे प्राबल्य असल्याचे जाणवले. त्यांच्या वाणीमध्ये कार्यरत असलेल्या सूक्ष्मस्तरीय चैतन्यामुळे त्यांच्या वाणीचा परिणाम श्रोत्यांच्या अंत:करणावर होऊन श्रोत्यांच्या मनावर ‘धर्मसंस्थापनेच्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी स्वत:ची साधना वाढली पाहिजे’, हे सूत्र बिंबल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे सद्गुरु पिंगळेकाकांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनीच समस्त हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवर कशी पावले उचलायला हवीत याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून त्यांच्या मनावर हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे ध्येय बिंबवले.
११. अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी कार्यरत झालेल्या ईश्वरी तत्त्वातून प्रक्षेपित झालेल्या विविध घटकांचे प्रमाण आणि त्यांचा हिंदुत्वनिष्ठांवर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम
कृतज्ञता : ‘श्रीगुरूंच्या कृपेमुळे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सूक्ष्म स्तरावर घडलेल्या घटनांचे अवलोकन करता आले आणि त्यांच्यामागे दडलेला आध्यात्मिक कार्यकारणभाव उमजला’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)(सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०२२)
|