नकारात्मकतेचे चक्रव्यूह !
अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असणार्या व्यक्तींच्या (साधक आणि समाजातील व्यक्ती दोघांच्याही) मनात जन्मतःच तीव्र नकारात्मकता असते किंवा काहींच्या मनात ती काही विशिष्ट प्रक्रिया किंवा अनुभव यांविषयी असते. ‘ज्यांच्यामध्ये तीव्र नकारात्मकता असते, त्यांच्या मनाची नैसर्गिक प्रक्रिया काय असते ?’, याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. तीव्र नकारात्मकता असणार्यांचे मन नकारात्मकतेला गोंजारत असणे
तीव्र नकारात्मकता असणार्यांचे मन त्या नकारात्मकतेला गोंजारत असते. काही वाईट प्रसंग घडल्यावर त्या व्यक्तीचे मन त्या नकारात्मकतेला मिठीच मारून बसते. तिला वाटते, ‘हे आपले दु:ख किंवा नकारात्मकता आपल्याला पुरेशी आहे. नवीन नकारात्मकता येईल, असे प्रसंगच नकोत. त्या व्यक्तीचे मन एखाद्या गुहेतच जाऊन बसल्यासारखे असते. अशा व्यक्ती करमणूक म्हणूनही दुःखी भावना असलेली गाणी किंवा चित्रपट पहातात. ‘माझ्याकडे आधीच असलेले दुःख पुरेसे आहे. मला नवीन दुःख नको’, अशा आशयाच्या गझल किंवा कविताही आपल्याला पहायला मिळतात.
२. नकारात्मकता असलेली व्यक्ती स्वतःतील गुणांकडे लक्ष न देता नकारात्मकतेला कवटाळून बसत असल्यामुळे तिला स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवणे कठीण होणे
अशा व्यक्तीसाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यातही ‘नकारात्मकता’ हाच मोठा अडथळा असतो. ‘आपल्यात पुष्कळ स्वभावदोष आहेत’, या जाणिवेने तिच्या मनात पुन्हा नकारात्मकता येऊन तिचे मन खचून जाते. त्यामुळे ती स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवायला सिद्धच होत नाही. तिला तिच्यातील गुणांची जाणीव असते आणि तिला त्यांचे कौतुकही वाटत असते; परंतु नकारात्मकतेने तिचे मन त्या गुणांकडे लक्ष देत नाही. तिचे मन तिला फसवते.
३. नकारात्मक विचार असणार्यांना नकारात्मक आणि सकारात्मक प्रसंगांतील भेद न कळल्यामुळे त्यांना सकारात्मकतेतील आनंद अनुभवता न येणे
तीव्र नकारात्मकता असणार्या व्यक्तीला ‘जगाकडे सकारात्मकतेने कसे पहावे ?’, हे ठाऊकच नसते. तिला ही प्रक्रियाच ज्ञात नसते. त्यामुळे तिला ती अनुभवताच येत नाही. ‘तीव्र नकारात्मकता असणार्याने काही सकारात्मकतेचे प्रसंग अनुभवणे आणि तिला नकारात्मकता अन् सकारात्मकता यांतील भेद कळणे’, ही भगवंताची मोठी कृपाच मानली पाहिजे; कारण आंधळ्यांना जग दिसत नाही, तसेच नकारात्मक विचार असणार्यांना सकारात्मकतेतील आनंदच कळत नाही. ही प्रक्रिया ज्याला समजली, त्यालाच त्यातून बाहेर पडणे सोपे जाईल, अन्यथा तो मनाने बांधलेल्या नकारात्मकतेच्या चक्रव्यूहातच फिरत राहील.
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई. (२८.५.२०२२)