पावसाळ्यामध्ये पशूधनास होणारे विविध आजार आणि त्यांवरील उपचार !
पावसाळा चालू होताच वातावरणात वेगाने पालट होतात. त्यामुळे मानव, प्राणी आणि वनस्पती यांची प्रचंड हानी होते. या काळात पशू-पक्षी यांच्या जीवितरक्षणाची काळजी घेणे आवश्यक ठरते. पशू-पक्ष्यांचा गळका निवारा, चारा आणि खाद्य यांमधील पालट, जंत-गोचीड यांचा संसर्ग, कासेचे आजार, तसेच पिण्याच्या पाण्याची खालावलेली गुणवत्ता यांमुळे पशू-पक्ष्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. पशू-पक्ष्यांचे विविध वयोगट आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून वर्गीकृत गट यांनुसार होणार्या आजारांची वर्गवारी येथे देत आहोत. १० आणि ११ जून २०२२ या दिवशीच्या दैनिकात ‘दुभती जनावरे, शेतकामाची जनावरे आणि वासरे, कोंबडी, कबूतर, तसेच शेळ्या-मेंढ्या यांचे आजार’ यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/587006.html
४. कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांमधील आजार
४ इ. Ecoparasites (पिसू, गोचीड आणि माशा) : त्वचेवर पुरळ उठणे, ताप येणे, चावल्यामुळे जखमा होणे इत्यादी. उपचार : नियमितपणे खरारा करणे (मालिश करणे), केसांची योग्य निगा राखणे, कुत्रा आणि मांजर यांसाठीचा शँपू वापरणे, नारळाचे तेल त्वचेला लावणे, गोचिडांचा संसर्ग टाळणे इत्यादी.
४ ई. श्वसन मार्गाचे विकार : जिवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य जंतू यांमुळे श्वसन मार्गाचे आजार बळावतात.
लक्षणे : श्वसनास त्रास होणे, भूक मंदावणे, नाक गळणे, खोकला, अशक्तपणा इत्यादी.
प्रतिबंध : कोरडा निवारा, केस कोरडे ठेवणे, कुत्रा आणि मांजर यांना आर्द्रताविरहित जागेत ठेवणे.
४ उ. ‘Parvo virus’चा संसर्ग
लक्षणे : पोटफुगी, उलटी, अतिसार इत्यादी. या रोगामध्ये मृत्यूचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक असते.
प्रतिबंध : लसीकरण करणे
४ ऊ. आतड्यातील कृमी
लक्षणे : पोटफुगी, उलटी, अतिसार, केस गळणे, अशक्तपणा इत्यादी.
प्रतिबंध : प्रत्येक ३ मासांनी जंतनिर्मूलन करणे.
४ ए. कानाचे विकार : खाली लोंबते कान असणार्या कुत्र्यांमध्ये कानाचे विकार अधिक प्रमाणात दिसून येतात. अशा कुत्र्यांमध्ये त्यांचे कान सतत ओले रहातात.
लक्षणे : कानाची आतील त्वचा लाल होणे, कानात जखमा होणे, कान गळणे, कानात मळ साठणे इत्यादी
प्रतिबंध : प्रत्येकी ८ दिवसांनी कान स्वच्छ करणे.
५. पावसाळ्यामध्ये घोड्यांना होणारे आजार आणि विकार !
५ अ. सर्वसाधारण उपाययोजना : घोड्यांच्या कातडीची नियमित पडताळणी करणे, खरारा करणे, घोड्यांचा तबेला कोरडा ठेवणे, अती चिखल आणि साठलेले पाणी यांमध्ये घोड्यांना फिरायला न सोडणे, किटकांच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, साठवलेल्या पाण्यामध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ टाकून निर्जंतुक करणे आणि घोड्यांना नियमित अन् योग्य व्यायाम देणे. खुरांचे विकार, किटकांचा संसर्ग, कातडीचे विकार हे पावसाळ्यामध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात.
५ आ. Distemper (Strangles) : हा आजार Streptococcus equi या जिवाणूंमुळे होतो. लहान पिल्लांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो.
लक्षणे : ताप येणे, नाकातून स्राव वहाणे, कफ होणे, श्वसनास अडथळा येणे, खालच्या जबड्याच्या खालील लस ग्रंथींना सूज येते.
उपचार : सौम्य बाधित घोडे औषधाविना बरे होतात. अधिक बाधित घोड्यांना औषधोपचार करणे आवश्यक असते. तज्ञ पशूवैद्यकाकडून उपचार करून घ्यावा. या आजारात पेनिसिलीन किंवा म्पिसीलीन ही प्रतिजैविके अधिक प्रभावी ठरतात.
५ इ. खुरांचे आजार : घोड्यांमध्ये पायांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असते आणि पायांचे आरोग्य हे खुरांच्या आरोग्यावर अवलंबून असते.
५ इ १. नाल हरवणे : निसरट चिखलामुळे घोड्यांचे नाल निखळतात. पाय चिखलात रुतल्यामुळे घोडा त्याच्या मागील पायाने पुढील पायाचे नाल स्वतःचा तोल सावरण्यासाठी किंवा स्वतःला स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नात निखळून काढतो. तसेच गव्हाणीला लाथा मारणे, भूमीवर सतत पाय आपटणे या सवयींमुळे नाल निखळतात. यामुळे पुढे खुरांचे विकार बळावतात.
५ इ २. गळू होणे : चिखलात वाढणार्या जिवाणूंमुळे घोड्याच्या खुरांमध्ये जंतूचा संसर्ग होतो. यामुळे गळू होते आणि त्यामध्ये पू निर्माण होतो.
उपचार : पशूवैद्यांकडून गळूमधील पू काढणे आणि त्याची नियमित मलमपट्टी करणे.
५ इ ३. खुरांचा मऊपणा वाढणे : घोड्यांचा चिखलातील वारंवार वाढलेला वावर घोड्यांच्या खुरांचा तळ मऊ करतो. त्यामुळे खुरांच्या तळाला खरचटल्याच्या खुणा होतात आणि खूर मऊ होतात. तसेच खुरांमध्ये वेदना वाढतात. त्यामुळे घोडा लंगडतो.
उपचार : बालदीमध्ये बर्फाचे पाणी घेऊन त्यामध्ये खूर बुडवून ठेवावेत. तसेच अशा प्रकारे स्वच्छ केलेले खूर कोरड्या आणि टणक भूमीवर रहाण्यासाठी घोड्यांना तेथे बांधावे. घोड्यांना चिखलात जाण्यास प्रतिबंध करावा.
५ इ ४. Thrush : चिखलातील जिवाणू जेव्हा अधिक काळ खुरात रहातात, तेव्हा खुरातील मऊ भागाला जंतूंचा संसर्ग होऊन खूर खराब होतात आणि खुरांतून दुर्गंधीयुक्त गडद बुळबुळीत द्रव बाहेर पडतो.
उपचार : पशूवैद्याकडून जखमेची नियमित मलमपट्टी करून घेणे.
प्रतिबंध : प्रतिदिन नियमित रपेट करण्यापूर्वी आणि ती केल्यानंतर खूर स्वच्छ करावेत.
५ इ ५. White line disease (Hoof rot, yeast infection, cansdida & stall rot) : हा बुरशीजन्य आजार असून जिवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे खुरांची व्याधी वाढते. प्राणवायूविरहित जागेत स्वतःच्या वाढीसाठी जंतू खुरांच्या भित्तिकेत स्थिरावून स्वतःची अमर्याद वाढ करतात. यामुळे खुरांमध्ये जखम होऊन घोडा लंगडत रहातो.’ (समाप्त)
– पशूवैद्यक बाबूराव कडूकर, पशूचिकित्सा विज्ञान आणि पशूसंवर्धन पदवीधर, डी.फार्म, एम्.बी.ए., निवृत्त पशूवैद्यकीय अधिकारी, गडहिंग्लज, कोल्हापूर (४.६.२०२२)