सायबर आक्रमण !
संपादकीय
भारताने अस्तित्वासाठी संरक्षण नीतीत आमूलाग्र पालट करण्याची आवश्यकता !
नूपुर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाचे प्रकरण थांबण्याचे नावच घेत नाही. याविषयी प्रतिदिन काही ना काही नवी प्रकरणे घडत आहेत. भारतातील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी संकेतस्थळांवर गत काही दिवस सायबर आक्रमणे होत आहेत. ‘डॅ्रगन फोर्स मलेशिया’ नावाच्या हॅकर्स गटाने ही आक्रमणे केली आहेत. ७० भारतीय संकेतस्थळांवर ही आक्रमणे झाली असून ‘हॅक’ करण्यात आलेल्या संकेतस्थळांवर ‘आम्ही शांत बसणार नाही’, अशी धमकी देण्यात आली आहे. भारतीय बँकांच्या संकेतस्थळावर आक्रमणे करून तेथील महत्त्वाची माहिती चोरण्याचाही प्रयत्न झाला आहे, तर काही संकेतस्थळांचे कार्य बंद पाडण्यात आले आहे. भारतातील सायबर तज्ञांनी ‘आता अशा प्रकारच्या आक्रमणांविषयी सिद्धता करावी लागेल’, असे सांगितले आहे.
भारतातील एका व्यक्तीने श्रद्धास्थानाचा तथाकथित अवमान केल्यावरून १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला मंदिरे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणे, त्यांच्या बँका, विविध क्षेत्रे यांवर सायबर आक्रमण करणे आदी घटनांतून ते ‘आक्रमणामुळे भारतातील हिंदूंचीच हानी होईल’, असे मानतात; पण ‘येथील मुसलमानांनाही त्यांच्या आक्रमणामुळे त्रास होईल’, असा ते विचार करत नाहीत. याचे कारण ‘भारत हा हिंदूंचाच देश आहे’, असे ते मानतात आणि येथील मुसलमानही त्यांना जवळचे वाटत नाहीत, असे समजता येईल. ही गोष्ट अन्य देशांत इस्लामविरोधी काहीतरी घडल्यावर भारतात मोर्चे काढून दंगल घडवणार्या धर्मांधांनी लक्षात घ्यायला हवी.
इस्लामी गटांकडून आक्रमणे
नूपुर शर्मा यांच्या प्रकरणी रस्त्यावर उतरून, विखारी भाषणे करुन, वृत्तवाहिन्या आणि सामाजिक माध्यमे यांतून निषेध करण्यात आला. आता हे सायबर आक्रमणाचे आणखी एक माध्यम विरोधकांनी निवडले आहे. खरेतर तथाकथित अवमानाच्या निषेधाच्या नावाखाली बँका आणि अन्य संबंधित संकेतस्थळे यांवरील माहितीची चोरी करण्याचाच प्रयत्न झाला आहे. सायबर आक्रमणे तशी नवीन गोष्ट नाही. एरव्ही सायबर चोरांनी बँकांची संकेतस्थळे ‘हॅक’ करून तेथील सांकेतिक शब्द (पासवर्ड) पालटून पैसे स्वत:च्या खात्यात जमा करण्याचे प्रकार केले आहेत; मात्र आताची आक्रमणे विशिष्ट उद्देश ठेवून करण्यात आली आहेत. नूपुर शर्मा यांचे प्रकरण ज्या दिवशी घडले, त्याच्या दुसर्याच दिवशी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरले. १५ हून अधिक इस्लामी देशांनी (ज्यांतील काही देशांचे जगाच्या नकाशावरही विशेष अस्तित्व नाही.) धमक्या दिल्या. त्यांचा संघटितपणा तेव्हा पहायला मिळाला, तसा आताही मलेशिया या मुसलमानबहुल देशातील हॅकर्सच्या संघटनेकडून पहायला मिळाला. यातही त्यांनी भारतीय संकेतस्थळांवर आक्रमणे करण्याचे केलेले आवाहन हे अतीच झाले म्हणायचे. अन्य एका ‘हॅकर’ गटानेही आक्रमणे केली आहेत. यातून भारतियांची हानी करण्याचा इस्लामी देशांचा हा पद्धतशीर प्रयत्नच म्हणावा लागेल. आक्रमणे झालेली संकेतस्थळे पुन्हा पूर्ववत् करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर चालू करण्यात आले असले, तरी ‘हॅकर्स’ना अथवा मलेशियाला जरब बसेल, अशी कारवाई झालेली नाही.
प्रत्युत्तर हवेच !
सध्याचे युग हे इंटरनेटचे असल्याने जवळजवळ ९० टक्क्यांहून अधिक व्यवहार हे त्याच माध्यमातून केले जातात. त्यात सामान्य माणसापासून ते मंत्री, त्यांचे सचिव तसेच देशाच्या गोपनीय माहितीशी संबंधित व्यक्ती येथपर्यंत त्याचा वापर करतात. सर्वच माहिती संवेदनशील असल्याने ती गहाळ होणे जोखमीचे आहे. सर्व माहिती सुरक्षित रहाण्याची सरकार काळजी घेत असले, तरी तेवढे पुरेसे नाही. आपल्याकडे ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ कार्यरत आहे. सायबर आक्रमणांचे विश्लेषण आणि सुरक्षेच्या संबंधी उपाययोजना ही संस्था करते. भारतावर आतंकवादी आक्रमणे झाल्यानंतर २ वेळा भारताने पाकची सीमा ओलांडून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. त्याचा चांगला परिणाम काही काळतरी मिळाला. भारत आक्रमक नीती अवलंबून ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देत आहे, हे पाकसह जगाला कळले. त्यामुळे काही कालावधीसाठी आक्रमणे थांबली होती. सायबर आक्रमणे करून भारताची अंतर्गत व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न इस्लामी देशांनी केला आहे. यापूर्वी इस्रायली संकेतस्थळांवर अशी आक्रमणे करून तेथून इस्रायली आस्थापनांची माहिती, पारपत्रांची माहिती, अन्य महत्त्वाचे गुप्तशब्द मिळवून ते प्रसारित केले होते. त्यामुळे भारतीय संकेतस्थळांवरील आक्रमण सहजतेने न घेता पुष्कळ गांभीर्याने घ्यायला हवे. गुप्त शासकीय पाठिंब्याने कार्यरत ‘हॅकर्स’ गट भारतातही अधिक संख्येत निर्माण होणे आवश्यक आहे. भारतावर ज्या देशातील हॅकर्सकडून आक्रमणे होतील, तेवढ्याच क्षमतेची ‘सायबर सर्जिकल स्ट्राईक’ भारताकडून होणे अपेक्षित आहे. तेव्हाच त्याला पायबंद बसेल. भारताकडे संगणकीय तज्ञांची संख्या अधिक आहे. जगातील अनेक प्रसिद्ध संगणकीय प्रणालींच्या आस्थापनाचे प्रमुख भारतीयच आहेत. भारतातूनच अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली’त भारतीय संगणक अभियंते नोकरीसाठी जातात. जगाने आपल्याला जे तंत्रज्ञान नाकारले, ते आपण देशातच बनवले आहे. त्यामुळे या क्षेत्रात मागे रहाण्याची आवश्यकता नाही.
‘भविष्यातील युद्ध हे प्रत्यक्ष लढण्यापेक्षा तंत्रज्ञानाने लढले जाईल’, असे सांगितले जाते. हे तंत्रज्ञान आपण निश्चितपणे आत्मसात करू शकतो आणि आशियामध्ये भारताचा दरारा निर्माण करू शकतो. नूपुर शर्मा यांच्या विधानानंतर इस्लामी देशांकडून एकत्रित झालेला विरोध हे एक आव्हान म्हणून पाहून त्या दृष्टीने रणनीती आखणे आवश्यक आहे. इस्लामी देशांनी भारताला प्रत्यक्ष टीका, वस्तूंवर बहिष्कार, तेथील धर्मगुरूंच्या माध्यमातून चिथावणीखोर विधाने आणि आता सायबर आक्रमणे अशा सर्वच दृष्टीने अडचणीत आणले. ‘आक्रमण हाच संरक्षणाचा सर्वाेत्तम मार्ग आहे’, हे ध्यानात घेऊन भारताने नवीन आक्रमक रणनीती आखावी, ही अपेक्षा !