तलावाचे पाणी शेवटपर्यंतच्या शेतकर्याला मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री
माळशिरस (जिल्हा सोलापूर) – तलावातील साठवण क्षमता वाढवण्यासमवेतच तलावावरील असलेल्या लहान बंधार्याचे पाणी शेवटपर्यंतच्या शेतकर्याला कसे मिळेल यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. माळशिरस तालुक्यातील कोळेगाव, सुळेवाडी, गारवाड येथील तलावांची पहाणी पाटील यांनी केली त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम, नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता संजय बोडके, तसेच संबंधित गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले की, माळशिरस तालुक्यातील २० ते २२ गावे दुष्काळी पट्ट्यातील असून ती गावे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्या गावांना शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता व्हावी. यासाठी तलावात अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन करून नीरा उजव्या कालव्याच्या पाण्याची उपलब्धता पाहून ते पाणी आणता येईल का ? याविषयी अभ्यास करून आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल.