पुण्यात पंजाब पोलिसांकडून सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची चौकशी !
पुणे – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी सौरव महाकाल याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची देहली आणि मुंबई येथील पथकाकडून कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता पंजाब पोलिसांकडूनही त्याची चौकशी चालू झाली आहे. देहलीतील गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीने मुसेवालाची हत्या केल्याचे अन्वेषणात उघड झाले असून याच बिष्णोई टोळीने सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. सौरव महाकाल उपाख्य सिद्धेश कांबळे हा लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आहे का ? या संदर्भातील अन्वेषण पंजाब पोलिसांकडून केले जात आहे.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधव आणि सौरव महाकाल हे संशयित आरोपी आहेत. ग्रामीण पोलिसांच्या अटकेनंतर सौरव महाकालने सलीम आणि सलमान खान त्यांच्या धमकी पत्राविषयीच्या चौकशीत अनेक खुलासे केले आहेत. महाकालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बिष्णोईचा सहकारी विक्रम बराडने ३ लोकांच्या माध्यमातून हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोचवले. सलमान खानला दिलेल्या धमकीनंतर बॉलिवूडमधील बड्या कलाकारांकडून खंडणी वसूल करता येईल, अशी महाकालने पोलिसांनी केलेल्या चौकशीत ‘कबुली’ दिल्याची माहिती मिळाली आहे.