नगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गैरव्यवहार प्रकरणी ५ अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
तिघांना अटक !
नगर – जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१५-१६ मध्ये कोंभळी (ता. कर्जत) येथे संगनमताने खाटे दस्तऐवज सिद्ध करून ९ सहस्र ३२० रुपयांचा, तर चांदे खुर्द येथे ५८ सहस्र २४८ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वन विभागातील तत्कालिन ५ अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यामध्ये २ स्वतंत्र गुन्हे नोंद केले आहेत. यातील तिघांना अटक केल्यानंतर न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
भाजप-शिवसेनेच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले होते. वर्ष २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या अभियानामध्ये गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतर संशयित कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी चालू केली आहे. या प्रकरणी तत्कालिन साहाय्यक वनसंरक्षक (रोहियो व अतिक्रमण निर्मूलन) रमेश गोलेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर पाटील, वनरक्षक शेखर पाटोळे, वनपाल पल्लवी जगताप आणि बलभीम गांगुर्डे यांचा समावेश केला असून यातील शंकर पाटील, बलभीम गांगर्डे आणि शेखर पाटोळे यांना अटक करण्यात आली आहे.