अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना सर्व वस्तू आणि आजूबाजूचे वातावरण भगवंतमय झाल्याचे जाणवून वेगळेच भावविश्व अनुभवता येणे
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना घरी असतांना ४ प्रसंगांत सर्व वस्तू आणि आजूबाजूचे वातावरण भगवंतमय झाल्याची अनुभूती आली. ते ४ प्रसंग पुढे दिले आहेत.
१. ‘ऑनलाईन’ चर्चेत सहभागी होतांना ‘यातून मला भगवंताला अनुभवता येऊ दे’, अशी प्रार्थना होणे आणि ‘भ्रमणभाषच्या छायाचित्रकातून चैतन्याचा झोत येऊन सर्वकाही भगवंतमय झाले आहे’, असे अनुभवणे
मला ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. तेव्हा माझ्यासमोर भ्रमणभाषचा छायाचित्रक (कॅमेरा) होता. इतर ठिकाणांहून काही मान्यवर वक्ते या कार्यक्रमात सहभागी होणार होते. तेव्हा माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला भगवंताला अनुभवता येऊ दे.’ अशी प्रार्थना केल्यावर देवाच्या कृपेने भ्रमणभाषमधील छायाचित्रकातून एक प्रचंड चैतन्याचा झोत माझ्याकडे प्रक्षेपित झाला. तेव्हा ‘माझा भ्रमणभाष, कार्यक्रमात सहभागी झालेले अन्य मान्यवर, माझी आसंदी, सहसाधक श्री. इंदोलीकरकाका हे सर्व भगवंतमय झाले’, असे जाणवून माझा भाव जागृत झाला. ‘काहीच क्षणांनी मला या कार्यक्रमात बोलायचे आहे’, हे भान ठेवून मला स्वतःला सावरावे लागले.
२. ‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ आल्यावर ‘वहाणारा सोसाट्याचा वारा, पडणारा पाऊस आणि समुद्राच्या लाटा, हे म्हणजे भगवंत अन् ‘मी’च आहे’, असे अनुभवणे
५.६.२०२० या दिवशी मी देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे माझ्या घरी होतो. याच सुमारास ‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ समुद्रातून किनारपट्टीवर धडकणार होते. त्यामुळे सोसाट्याचा वारा सुटला होता आणि प्रचंड पाऊसही पडत होता. मी स्वयंपाकघरात दूध तापवत असतांना पाऊस आणि वारा यांची तीव्रता अनुभवत होतो. अकस्मात् मला जाणवले, ‘तो सोसाट्याचा वारा आणि आडवा-तिडवा झोडपून काढणारा पाऊस, म्हणजे भगवंत अन् ‘मी’च आहे.’ तेव्हा एका क्षणी ‘पाण्याची पुष्कळ मोठी लाट येऊन ती माझ्यावरून गेली’, असे मला जाणवले. तेव्हा ‘भगवंत काय ते करील’, असा विचार येऊन माझे मन स्थिर होते. पुढच्याच क्षणाला मला जाणवले, ‘मी मोठा मोठा होत पुष्कळ उंच होऊन तरंगत वर गेलो. ती उंचीही मीच होतो, ते पाणीही (लाटाही) मीच होतो आणि ते वादळही मीच होतो.’ हे सर्वकाही क्षणात घडले. ‘मीच व्यापक स्वरूपात त्या निसर्गाला अनुभवत आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला.
३. चुलीतील विस्तवावर पत्र्याने वारा घातल्यावर प्रथम निखारे फुलणे, नंतर ते मंद होणे आणि ‘ही क्रिया म्हणजे ‘विश्वाची ‘उत्पत्ती आणि लय’ यांची प्रक्रिया आहे’, असे जाणवणे
१२.६.२०२० या दिवशी सकाळी मी चुलीवर पाणी तापवत होतो. चुलीतील विस्तव विझत चालला होता; म्हणून मी त्यावर पत्र्याने वारा घालून निखारे फुलवत होतो. वारा लागल्यावर निखारे फुलत होते आणि पुन्हा काही वेळाने मंद होत होते. ही प्रक्रिया पहातांना माझे मन एकाग्र झाले आणि अकस्मात् मला जाणवले, ‘हेच ब्रह्मांड आहे. विश्वाची ‘उत्पत्ती आणि लय’ यांची हीच प्रक्रिया आहे. इथे वेगळे काहीच घडत नाही.’ हा बौद्धिक विचार नव्हता, तर ती मला व्यापून राहिलेली एक जाणीव होती.
४. तांत्रिक आणि वैज्ञानिक सूत्रे भ्रमणसंगणकावर वाचतांना ‘त्यांतील आकडे, शब्द अन् नकाशे, हे सर्व भगवंतच आहे’, असे जाणवणे
एक सेवा करतांना मी वैज्ञानिक भाषेतील काही अहवाल वाचत होतो. त्यात विधीविषयी (कायद्याविषयी) नसणारी काही तांत्रिक आणि वैज्ञानिक सूत्रे माझ्यासाठी नवीन होती. ती सूत्रे भ्रमणसंगणकावर वाचतांना ‘हे नवीनच शिकायला मिळाले’, असा विचार माझ्या मनात येऊन मला चांगले वाटले. पुढच्या क्षणाला मी त्या माहितीच्या विश्वात गेलो. ते आकडे, शब्द आणि नकाशे, हे सगळे माझ्याभोवती फिरू लागले. ते वेगळे होते आणि तरीही ते एकच होते. देवाच्या कृपेने ‘तेही ब्रह्मच आहेत, भगवंतच आहेत’, असे जाणवून माझा भाव जागृत झाला.
‘हे लिहितांना २ ओळींत लिहिले गेले; मात्र ती जाणीव वेगळीच होती’, असे मला वाटले.’
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई. (६.७.२०२०)
हनुमानाकडून मानस दृष्ट काढून घेतांना आलेल्या अनुभूती
सद्गुरु स्वाती खाडये यांनी एका सत्संगात दिवसातून ३ वेळा हनुमानाकडून मानस दृष्ट काढून घ्यायला सांगितली होती. त्या दिवसापासून वडील (श्री. शेखर चंद्रकांत इचलकरंजीकर), आई (सौ. मीनाक्षी शेखर इचलकरंजीकर) आणि मी एकत्र बसून तशी दृष्ट काढण्यास आरंभ केला. तेव्हा आम्हाला जाणवलेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पुढे दिले आहेत.’ – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.
१. श्री. शेखर चंद्रकांत इचलकरंजीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७६ वर्षे), देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.
१ अ. प्रार्थना केल्यावर हनुमंताकडून चैतन्याचा प्रचंड झोत येणे, आजूबाजूला राक्षसासारख्या आकृत्या दिसून काळा धूर दिसणे आणि त्यानंतर तो काळेपणा न्यून होत जाऊन हलके वाटणे : माझी मानस दृष्ट काढण्यासाठी हनुमंताला प्रार्थना केल्यावर त्याच्याकडून चैतन्याचा प्रचंड झोत माझ्याकडे आला. हनुमंताने माझ्या आज्ञाचक्राजवळ नारळ धरल्यावर मला आजूबाजूला राक्षसासारख्या आकृत्या दिसून काळा धूर दिसला. दृष्ट काढून झाल्यावर तो काळेपणा हळूहळू न्यून होत गेला आणि सूर्याचे कोवळे किरण पृथ्वीवर आल्यावर जसे प्रसन्न वातावरण असते, तसे मला जाणवले. त्या वेळी मला माझ्या शरिरात हलकेपणा जाणवला.
२. सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६८ वर्षे), देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.
२ अ. हनुमानाकडून मानस दृष्ट काढून घेतांना तो समोर दिसून आध्यात्मिक त्रास वाढणे आणि नंतर हलके वाटून ब्रह्मरंध्रावर चैतन्य जाणवणे : मी हनुमानाकडून मानस दृष्ट काढून घेण्यासाठी हनुमानाला प्रार्थना केली. तेव्हा मला साक्षात् हनुमान समोर दिसत होता. तो दृष्ट काढत असतांना माझा आध्यात्मिक त्रास वाढला. माझ्या पोटामध्ये कळा येऊन पोट दुखू लागले. हनुमंताने माझ्या पायांजवळ नारळ नेल्यावर माझे पाय थरथरत होते; पण नंतर मला हलके वाटून माझ्या ब्रह्मरंध्रावर चैतन्य जाणवले. त्यामुळे ‘याच स्थितीत रहावे’, असे मला वाटले. पहिले ४ – ५ दिवस हनुमंताकडून मानस दृष्ट काढून घेतांना तीव्र आध्यात्मिक त्रास जाणवला.
३. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.
३ अ. हनुमंताकडून मानस दृष्ट काढून घेतांना आध्यात्मिक त्रास वाढणे आणि ‘मनातील नकारात्मक विचार खेचून घे’, अशी प्रार्थना केल्यावर विचारांचे प्रमाण ९० टक्क्यांनी न्यून होणे : हनुमंताकडून मानस दृष्ट काढून घेतांना माझ्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण वाढले. ‘दृष्ट काढून झाल्यावरही त्रासदायक शक्ती हनुमंताकडे खेचली जात आहे’, असे मला जाणवले. माझ्या मनात काही विशिष्ट नकारात्मक विचार आल्यामुळे मला पुष्कळ प्रमाणात मानसिक त्रास होत होता. मला त्यावर मात करणे कठीण जात होते; म्हणून मी हनुमंताला प्रार्थना केली, ‘दृष्ट काढतांना माझे नकारात्मक विचारही खेचून घे.’ दृष्ट काढून झाल्यावर ‘त्या विचारांचे प्रमाण ९० टक्क्यांनी उणावले’, असे मला जाणवले.
३ आ. प्रत्यक्ष हनुमंताचे अस्तित्व जाणवल्यामुळे त्याच्याप्रती कृतज्ञता वाटून भावजागृती होणे : त्या वेळी मला प्रत्यक्ष हनुमंताचे अस्तित्व जाणवले. प्रत्यक्ष हनुमंताकडून मानस दृष्ट काढून घेत असल्याचे अनुभवल्यामुळे माझी भावजागृती झाली आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. पुढील ४ – ५ दिवस दृष्ट काढून घेतांना मला अशीच अनुभूती आली.
(सर्व सूत्रांचा दिनांक : ६.७.२०२०)
|