वर्ष २१०० पर्यंत भारताच्या लोकसंख्येत होणार २९ कोटींची घट !

एलसिव्हर (युनायटेड किंगडम) – नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार पृथ्वीची एकूण लोकसंख्या वर्ष २०६४ पर्यंत ९७० कोटी या कमाल मर्यादेपर्यंत पोचेल. त्यानंतर वर्ष २१०० पर्यंत ती न्यून होऊन ८७९ कोटी हा आकडा गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिक असलेल्या ‘लॅन्सेट मेडिकल जर्नल’ने प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार या शतकाच्या शेवटापर्यंत भारताच्या लोकसंख्येत २९ कोटींची घट होण्याची शक्यता आहे.

लोकसंख्येत घट होण्यामागील कारणे

वाढत्या शहरीकरणा समवेतच महिलांमध्ये शिक्षित होण्याचे प्रमाण वाढल्याने जन्मदर नियंत्रित होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. मुलांचे जन्म नियंत्रित करण्याची वाढलेली साधने, हेही यामागील एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. वर्ष १९६० मध्ये जगातील प्रत्येक महिला सरासरी ५.२ मुलांना जन्म देत असे. आता तेच प्रमाण २.४ मुले इतके आहे. वर्ष २१०० पर्यंत ही सरासरी १.६६ पर्यंत खाली येईल.

(चित्रावर क्लिक करा)

युरोप आणि अमेरिका यांची लोकसंख्या घटणार, तर अफ्रिकेत लोकसंख्या वाढीची चिन्हे

युरोपप्रमाणेच आशिया आणि दक्षिण अमेरिकेत लोकसंख्याघट चालू झाली आहे. ती आगामी काळात अधिक घटेल, असा अंदाज या अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. अफ्रिकेत मात्र लोकसंख्या वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.