हिंदु राष्ट्राचा उद्घोष !
१. हिंदुपणाची व्यापक संकल्पना
मेरुतंत्र या धर्मग्रंथात ‘हीनं दूषयति इति हिन्दुः’ अशी हिंदु या शब्दाची व्याख्या केली आहे. याचा अर्थ, जो स्वतःतील हीन किंवा कनिष्ठ अशा रज-तम गुणांचा नाश करतो, तो हिंदु. अशी सात्त्विक आचरण असलेली व्यक्ती केवळ स्वतःपुरता संकुचित विचार करत नाही, तर विश्वकल्याणाचा विचार करते. इतिहासात याची अनेक उदाहरणे आहेत. ऋग्वेदामध्ये ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ।’ म्हणजे ‘अवघे विश्व आर्य म्हणजे सुसंस्कृत करू’, असे म्हटले आहे. ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना याच धर्तीवर असल्याने ही संकल्पना समजून घेतली, तर हिंदु राष्ट्राविषयी नाहक घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांचे आपोआपच निरसन होईल.
२. हिंदु राष्ट्राची आवश्यकता
वास्तविक भारत हे एक स्वयंभू हिंदु राष्ट्रच होते. वर्ष १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर फाळणी झाल्यावर मुसलमानांसाठी पाकिस्तान हा देश निर्माण झाला. त्याच वेळी उर्वरित हिंदुस्थान अर्थात् भारत हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवा होता; मात्र तसे झाले नाही. याउलट वर्ष १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात सर्व विरोधकांना कारागृहात डांबून घटनादुरुस्ती करून तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘सेक्युलर’ हा शब्द राज्यघटनेमध्ये घुसडला. या ‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाची अद्याप कोणतीही अधिकृत व्याख्या करण्यात आली नाही. याच ‘सेक्युलर’वादाच्या नावाखाली आतापर्यंत अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, तर हिंदूंचे दमनच होत आहे. जर घटनादुरुस्ती करून भारताला अन्यायकारक पद्धतीने ‘सेक्युलर’ देश घोषित केले जाऊ शकते, तर पुन्हा अशीच दुरुस्ती करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ असे का घोषित करता येऊ शकत नाही ?
३. हिंदूंवरील वाढते अत्याचार
आज केंद्रात सत्तापालट झाला असला, तरी हिंदूंवरील आघात थांबलेले नाहीत. अनेक मुसलमानेतर युवती ‘लव्ह जिहाद’च्या शिकार होत आहेत. कमलेश तिवारी, चंदन गुप्ता, हर्ष यांसारख्या हिंदुत्वनिष्ठांच्या राजरोसपणे हत्या होत आहेत. तमिळनाडूतील ‘लावण्या’सारख्या हिंदु युवती, महिला यांना ख्रिस्ती धर्मांतराच्या दबावामुळे जीव गमवावा लागत आहे. भारत आणि हिंदुत्व यांची अपकीर्ती करण्यासाठी ‘हिजाब’, ‘शेतकरी आंदोलन’ यांचा उपयोग केला जात आहे. ‘थूक जिहाद’, ‘नार्काेटिक जिहाद’ यांसारखे नवनवे जिहादचे मार्ग सिद्ध होत आहेत. ‘कॉमेडी’च्या नावाखाली हिंदु देवतांवर अश्लाघ्य टीका केली जात आहे. आज ३२ वर्षे उलटूनही जिहादी आतंकवादामुळे काश्मीरमधून विस्थापित झालेले काश्मिरी हिंदू काश्मीरमध्ये पुनर्स्थापित होऊ शकलेले नाहीत. कलम ३७० रहित केल्यामुळे काश्मिरी हिंदूंचा काश्मीरमध्ये परतण्याचा मार्ग काहीसा सुकर झाला असला, तरी तो अद्यापही सुरक्षित नाही, हे वास्तव आहे. हिंदूबहुल भारतात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हा एकमेव पर्याय आहे.
४. राष्ट्रावरील संकटे
आज भारतात ९ राज्यांमध्ये हिंदु अल्पसंख्य झाले आहेत. पंजाबमधून वेगळ्या खलिस्तानची, तर तमिळनाडूतही द्रविडीस्तानची मागणी होत आहे. केरळ, बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये हिंदु धर्म आणि राष्ट्र विरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आसाममध्ये लक्षावधींच्या संख्येने बांगलादेशी घुसखोर घुसले आहेत. ‘हलाल’ अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून एक समांतर इस्लामिक अर्थव्यवस्था उभी करण्याचे षड्यंत्र उघडकीस आले आहे. भारताचा प्राण असलेला सनातन धर्म राज्यव्यवस्थेतून लुप्त झाल्यानेच आज ही स्थिती निर्माण झाली आहे. याच कारणांसाठी हिंदवी स्वराज्याच्या धर्तीवर हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे.
५. भौतिक विकासासह आध्यात्मिक विकासही आवश्यक
आज विकासाच्या दृष्टीने देशाची पावले पडत आहेत; पण समाजव्यवस्था आणि राष्ट्ररचना आदर्श होण्यासाठी भौतिक विकासासह आध्यात्मिक विकासही आवश्यक असतो. कोरोनाच्या काळात वैज्ञानिक प्रगतीची मर्यादा सगळ्यांनी अनुभवली. त्यामुळे शाश्वत विकास साध्य करायचा असेल, तर अध्यात्म आणि सनातन धर्म यांच्या आश्रयाला येण्यावाचून पर्याय नाही. धर्माधिष्ठित राज्यांची आदर्श उदाहरणे आपल्याकडे अनेक आहेत, त्यामुळे हिंदु राष्ट्र कसे असेल ? याची झलक आपल्या इतिहासात पहायला मिळते. भौतिक विकास जरी झाला, तरी ज्या समाजासाठी आपण तो करत आहोत, तो समाजही उन्नत करण्यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत. आदर्श व्यक्तीमत्त्व साकारण्यासाठी अर्थात् आदर्श समाजरचनेसाठी म्हणजेच भौतिक विकासासह आध्यात्मिक विकास साधण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र येणे आवश्यक आहे. या दृष्टीने सांगोपांग चर्चा करण्यासाठी, दिशा देण्यासाठी आणि कृतीशील होण्यासाठीच ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे.
६. अधिवेशनाची फलश्रुती
या हिंदु राष्ट्राची संकल्पना जनमानसापर्यंत पोचवण्यामध्ये, हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटनांना हिंदु राष्ट्राच्या दिशेने कृतीप्रवण करण्यामध्ये, तसेच सनातन धर्मनिष्ठ हिंदूंचे व्यापक संघटन करण्यामध्ये गेली ९ वर्षे होत असणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा सिंहाचा वाटा आहे. आज ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा उद्घोष आज सर्वत्र होतांना दिसत आहे. ही एकप्रकारे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची फलश्रुती म्हणावी लागेल. आज भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करून खऱ्या अर्थाने भारताची महासत्तेकडे अर्थात् विश्वगुरुपदाकडे अमृतमय वाटचाल व्हावी, ही अपेक्षा !
– संकलक : श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती