हिंदूंची परकियांनी बळकावलेली तीर्थक्षेत्रे परत मिळवण्यासाठी समर्पितभावाने प्रयत्न करणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन !
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा परिचय
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचा जन्म २७ मे १९५४ या दिवशी झाला. वर्ष १९७६ पासून ते वकिली करत आहेत. लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील न्यायालयापासून त्यांनी वकिलीला प्रारंभ केला आणि आता ते उच्च न्यायालय अन् सर्वाेच्च न्यायालय येथे वकिली करतात. अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९८६ या दिवशी झाला आहे. त्यांनी लहानपणापासूनच त्यांचे वडील सामाजिक पुनरुत्थानासाठी खटले लढत असल्याचे पाहिले आहे.
अधिवक्ता विष्णु शंकर जैन हे ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेचे प्रवक्ते असून अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी खटल्यापासून त्यांनी त्यांच्या वकिलीला प्रारंभ केला. श्रीरामजन्मभूमीविषयी अलाहाबाद उच्च न्यायालयाने वर्ष २०१० मध्ये दिलेल्या निकालाला पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी वर्ष २०११ मध्ये आव्हान दिले होते. या खटल्यात अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी त्यांच्या वडिलांना साहाय्य केले. सध्या हे पिता-पुत्र हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या भूमी परत मिळवण्याविषयीचे न्यायालयीन लढ्याचे कार्य करत आहेत.
श्रीकृष्णजन्मभूमी आणि ज्ञानवापी यांसह १०२ प्रकरणांत पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि त्यांचा मुलगा अधिवक्ता विष्णु शंकर जैन हे हिंदु पक्षाची बाजू मांडत आहेत. ज्ञानवापी परिसरात शिवलिंग आढळल्यापासून तरुण अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे नाव काशी विश्वेश्वराच्या भक्तांच्या घराघरात पोचले आहे. वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात अधिवक्ता विष्णु शंकर जैन आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे ‘श्री शृंगारगौरीदेवीची नित्य पूजा करण्याचा मूलभूत अधिकार मिळावा’, अशी मागणी करणाऱ्या ५ याचिकादार महिलांची येथील दिवाणी न्यायालयात बाजू मांडतांना एखाद्या ऋषिप्रमाणे दिसणारे आणखी एक अधिवक्ता न्यायालय आयुक्तांसमवेत दिसतात, ते म्हणजे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन हे आहेत.
वादग्रस्त वास्तू, त्याची वैधता आणि त्यांविषयी विविध न्यायालयांतील दावे यांविषयी पुष्कळ चर्चा होते; पण हे प्रकरण धैर्याने आणि समर्पितभावाने हाताळणाऱ्या या पिता-पुत्रांविषयी समाजात अधिक चर्चा होत नाही. त्यामुळे सहसा कुणी अंगीकारत नसलेला हा मार्ग चोखाळणाऱ्या पिता-पुत्रांविषयीची माहितीयुक्त लेख येथे देत आहोत.
१. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन लढा देत असलेले ऐतिहासिक खटले
सध्याच्या ज्ञानवापी मंदिराच्या व्यतिरिक्त अन्य १०२ प्रकरणांमध्ये पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन हिंदु पक्षाची बाजू मांडत आहेत. यातील सर्वांत जुने प्रकरण वर्ष १९९० मधील श्री रामजन्मभूमीचे आहे. आतापर्यंत बहुतांश प्रकरणांत त्यांचा विजय झाला आहे. या १०२ प्रकरणांमध्ये मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरण हे एक महत्त्वपूर्ण प्रकरण असून त्यात ते हिंदु पक्षाची बाजू मांडत आहेत.
कुतूबमिनार उभा असलेल्या परिसरात पूर्वी असलेली हिंदूंची आणि जैन पंथाची एकूण २७ मंदिरे मोगलांनी उद्ध्वस्त केल्याचे न्यायालयीन प्रकरण, या व्यतिरिक्त ताजमहाल येथे शिवमंदिर असल्याचे प्रकरण, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ (धार्मिक स्थळे कायदा १९९१), वक्फ कायदा १९९५ आणि त्यात वर्ष २०१३ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणा, सच्चर आयोगाची वैधता अन् आयोगाच्या अहवालावरून विविध शासनकर्त्यांनी केलेल्या तरतुदी या सर्व प्रकरणांमध्ये जैन पिता-पुत्र हिंदु पक्षाच्या बाजूने लढा देत आहेत. लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे ‘टिलेवाली मशीद’ नावाची एक वादग्रस्त वास्तू आहे. ती हिंदूंच्या श्रद्धेनुसार शेष गुहा आहे. ही वास्तू परत हिंदूंना मिळावी, यासाठी अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन खटला लढत आहेत.
एवढेच नाही, तर राज्यघटनेत सुधारणा करून त्यात घुसडलेले ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दांच्या वैधतेलाही त्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.
२. श्रीरामजन्मभूमीवरील रामललाची पूजा होण्यासाठी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी दिलेला लढा !
वादग्रस्त बाबरी ढाच्यात हिंदूंच्या मूर्ती आढळल्यानंतर वर्ष १९४९ मध्ये या ठिकाणी भक्तांची उपस्थिती असायची. वर्ष १९९२ मध्ये वादग्रस्त बाबरी ढाचा कारसेवकांनी तोडल्यावर या वादग्रस्त जागेला टाळे ठोकण्यात आले. ती सर्वांसाठी बंद करण्यात आली. ही वास्तू हिंदूंची आहे, हे पुढे-मागे सिद्ध करण्यासाठी लागणारे साक्षीपुरावे आणि त्या वास्तूतील हिंदूंची प्रत्यक्ष उपस्थिती यांसाठी या ठिकाणी रामललाची पूजा चालू ठेवणे आवश्यक होते. श्री रामजन्मभूमीवरील अधिकार सिद्ध करण्याच्या दृष्टीने या गोष्टींना न्यायालयात पुष्कळ महत्त्व आहे. या दृष्टीने रामललाचे दर्शन आणि पूजा चालू ठेवण्यासाठी न्यायालयाची अनुमती मिळवण्यासाठी याचिका प्रविष्ट करतांना पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना किती वैयक्तिक अडचणींना सामोरे जावे लागले याची साद्यंत माहिती अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी दिली.
२ अ. प्रभु श्रीराम ही राज्यघटनात्मक व्यक्ती असल्याचे न्यायालयात मांडणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन ! : अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘६ डिसेंबर १९९२ या दिवशी तथाकथित बाबरी मशीद पाडली गेली. याच दिवशी माझी आजी म्हणजे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या आईचे देहावसान झाले. माझ्या वडिलांच्या जीवनात तिचे पुष्कळ महत्त्व होते. तिनेच माझ्या वडिलांमधील हिंदुत्व जागृत केले होते. आजीच्या मृत्यूनंतरचे सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर क्षौर केलेल्या (डोक्यावरचे सर्व केस काढलेल्या) स्थितीत २० डिसेंबर १९९२ या दिवशी माझे वडील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर याचिका घेऊन उभे राहिले.
या याचिकेद्वारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी ‘प्रभु श्रीरामाचे दर्शन घेणे हा प्रत्येक हिंदूचा जन्मसिद्ध अधिकार आहे’, या सूत्रावर भर दिला. माझे वडील ही पहिली व्यक्ती आहे, ज्यांनी न्यायालयात मांडले की, ‘प्रभु श्रीराम ही राज्यघटनात्मक गोष्ट असून त्यांचे चित्र भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतींवरील पानांवर आहे. हिंदूंना त्यांच्या दर्शनापासून वंचित ठेवता येणार नाही.’’
२ आ. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी दिलेल्या लढ्यामुळे रामललाचे दर्शन सर्वांसाठी खुले करण्याचा उच्च न्यायालयाने निकाल देणे : अधिवक्ता विष्णु शंकर जैन पुढे म्हणाले, ‘‘माझे वडील न्यायालयात एकटेच जात आणि एकटेच येत. त्या काळी फारशा सुविधाही उपलब्ध नव्हत्या आणि आमचे कुटुंबही सर्वसाधारण कुटुंब होते. त्या काळी उच्च न्यायालय परिसरातही मोठी सुरक्षाव्यवस्था नव्हती. वडिलांना तर नेहमी मुसलमान समाजातील लोकांनी घेरलेले असायचे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत एक अधिवक्ता या नात्याने वडील केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीच्या आधारे न्यायालयात खटला लढवत होते आणि त्यांनी १ जानेवारी १९९३ या दिवशी ‘प्रभु श्रीराम ही राज्यघटनात्मक गोष्ट असून त्यांचे दर्शन घेण्यापासून कुणाला रोखता येणार नाही अन् त्यामुळे रामललाचे दर्शन सर्वांसाठी खुले करावे’, हा ऐतिहासिक निकाल मिळवला.
त्या दिवसापासून आजपर्यंत हिंदू प्रभु श्रीरामाचे दर्शन घेत आहेत. हे प्रकरण इतिहासाच्या पानांत गाडले गेले आणि त्याविषयी फारसे लोकांना ठाऊक नाही; पण हे प्रकरण पुष्कळ महत्त्वाचे होते.
३. हिंदूंच्या वास्तू परत मिळवणे आणि राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण यांसाठीचे जैन पिता-पुत्रांचे समर्पण !
अधिवक्ता विष्णु शंकर जैन जेव्हा वर्ष २०१३ मध्ये अधिवक्ता बनले, त्या वेळची एक घटनाही त्यांनी सांगितली, ज्यामुळे त्यांना समाजाच्या भल्यासाठी लढायला प्रेरणा मिळाली.
वर्ष २०१३ मध्ये मी देहली येथे अधिवक्ता म्हणून कार्यरत होतो, तेव्हा एकदा माझ्या वडिलांना (पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना) दम्याचा झटका आला. मी तात्काळ घरी गेलो. तेथे डॉक्टरांनी मला सांगितले की, वडील वाचण्याची शाश्वती पुष्कळ अल्प आहे. आमच्याकडे ‘व्हेंटिलेटर’ नाही आणि त्यामुळे पुढचे काहीच आम्ही सांगू शकत नाही. तुम्हाला जो योग्य वाटेल, तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्यांना ‘सेप्टिसेमिया’ (अर्थ : रक्तदोष) झाला आहे आणि त्यामुळे ‘ते वाचतील’, असे आम्हाला वाटत नाही. अशा प्रकारे ते मृत्यूच्या दारातच उभे होते आणि त्याही परिस्थितीत ते मला सांगत होते, ‘‘विष्णु टिलेवाली मशीद प्रकरणातील नोटीस पाठवण्यास विसरू नको. आपण समयमर्यादा पाळली नाही, तर प्रकरण फेटाळले जाऊ शकते.’’ त्यांचे त्या परिस्थितीतील हे शब्द ऐकून मी सुन्न झालो होतो. माझे वडील त्यांच्या हृदयात समाज, राष्ट्र आणि धर्म यांप्रती केवढी वचनबद्धता बाळगून होते !’’
त्यांनी अंगीकारलेल्या कार्याप्रतीच्या समर्पणभावा समवेतच अधिवक्ता विष्णु शंकर जैन त्यांची श्रद्धा असलेल्या सर्वच देवतांची त्यांच्या वडिलांप्रमाणेच भक्ती करतात. भगवान श्रीकृष्णाचे भक्त असलेले अधिवक्ता विष्णु शंकर जैन कधीच त्यांचे तपस्वी गुरु परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला विसरत नाहीत. त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांचे मनोबल नेहमीच उच्च रहाते.
४. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी निष्काम कर्म करणे
अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि त्यांचे वडील पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांची ही वचनबद्धता गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४७’ (अर्थ : ‘तुला कर्म करण्याचा अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी कधीही नाही; म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस, तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस.) या भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आहे.
(साभार : ‘ऑप इंडिया’चे संकेतस्थळ)