नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी अनुमती नाही !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुधारित याचिका केली होती; मात्र न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत मलिक यांना मतदान करता येणार नाही. मलिक यांच्या याचिकेवर सकारात्मक निर्णय आला असता, तर त्याचा आधार घेत अनिल देशमुख मतदानासाठी याचिका करणार होते; परंतु मलिक यांची पहिली याचिका फेटाळून लावण्यात आली अन् दुसऱ्या याचिकेच्या सुनावणीस नकार देण्यात आला. त्यामुळे देशमुख यांच्या आशा मालावल्या आहेत.
मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाची अनुमती नाकारल्यानंतर दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्यसभेतील विजयी उमेदवारांचा कोटा आता अल्प करण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला अनुमती न मिळाल्याने विजयी उमेदवारांचा कोटा ४१ इतका झाला आहे.
राज्यसभेसाठी २८५ आमदारांकडून मतदान !
मुंबई – राज्यसभेच्या ६ सहा जागांसाठी विधानभवन येथे मतदान झाले असून २८५ आमदारांनी मतदान केले आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आमदारांनाही रुग्णवाहिकेतून मतदानासाठी आणण्यात आले होते.
भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्याकडे, तर यशोमती ठाकूर यांनीही नाना पटोले यांच्याकडे मतपत्रिका दिली. त्यामुळे ‘जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे’, अशी मागणी करण्यात आली; पण निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली. निवडणूक आयोगाकडून मतमोजणी रोखण्यात आली. भाजपकडून धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पियुष गोयल हे रिंगणात आहेत. शिवसेनेकडून संजय पवार आणि संजय राऊत, तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल हे उमेदवार आहेत.