मुंबईत दुचाकीवरील दोघांना हेल्मेट सक्ती लागू !
एका दिवसात ६ सहस्र २७१ जणांवर कारवाई
मुंबई – मुंबई वाहतूक पोलिसांनी ९ जून या दिवशी शहरात शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणारे दुचाकीचालक आणि त्यांच्या मागे बसलेल्या व्यक्ती यांच्यावर कडक कारवाई केली आहे. ९ जून या दिवशी ६ सहस्र २७१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधीची एक पोस्ट मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्या ‘ट्विटर’वरून पोस्ट केली. मुंबई वाहतूक पोलिसांनी २५ मे या दिवशी एक अधिसूचना प्रसिद्ध करून दुचाकीस्वार आणि त्यांच्या मागे बसलेली व्यक्ती यांना शिरस्त्राण अनिवार्य केले होते. तसेच या आदेशांचे पालन करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार आता शिरस्त्राण न घालणाऱ्या दुचाकीस्वारांचा परवाना ३ मासांसाठी निलंबित करून त्यांना ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.