पाणीपुरवठ्याच्या नवीन कामाचा प्रस्ताव १५ जूनपूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पाठवा ! – संभाजीनगर खंडपीठ
संभाजीनगर – एकूण १ सहस्र ६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणी योजनेत जायकवाडी येथे पंप हाऊस उभारण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला १५ जूनपूर्वी पाठवावा. मंत्रालयाने त्यावर एक आठवड्यात निर्णय घ्यावा, असा आदेश संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि संदीपकुमार मोरे यांनी ७ जून या दिवशी दिला. पुढील सुनावणी २३ जून या दिवशी होईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ४० दिवस कामामध्ये गंभीरपणे प्रगती केली नाही, याविषयी न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त करतांना प्रत्येक बुधवारी सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. प्रसिद्ध होणार्या बातम्यांचीही नोंद घ्यावी, असेही खंडपिठाने म्हटले आहे.
या प्रकरणात खंडपिठाने अधिवक्ता सचिन देशमुख यांची न्यायालयीन मित्र (अमॅकस क्युरी) म्हणून नियुक्ती केली आहे. सिडकोतील श्रीहरि शिरोळे आणि इतर लोक यांनी अधिवक्ता अमित मुदखेडकर यांच्या वतीने ही याचिका प्रविष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे राज्य वन्यजीव मंडळाच्या प्रधान अधिकार्यांसह पर्यावरणमंत्र्यांच्या उपस्थितीत ६ जून या दिवशी बैठक घेतली. त्यात जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रात पाणीपुरवठा योजनेसाठी बांधण्यात येणार्या विहिर कामाच्या बांधकामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत, असे साहाय्यक सरकारी अधिवक्त्यांनी खंडपिठाच्या निदर्शनास आणून दिले.