सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार विज्ञापनांची सेवा करणाऱ्या कर्नाटक राज्यातील साधकांना सेवेतील ध्येय पूर्ण होण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा (रमानंदअण्णा) यांनी कर्नाटक राज्यातील साधकांना ‘विज्ञापनांची सेवा चांगल्या प्रकारे कशी करू शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनानंतर साधकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. कोरोनाच्या महामारीमुळे बिकट झालेल्या स्थितीमुळे आणि विस्कटलेल्या जनजीवनामुळे कोणालाही बाहेर जाता येत नव्हते. असे असूनही घरात राहून सतत सत्मध्ये रहाण्याच्या तळमळीमुळे साधकांनी विज्ञापनांची सेवा पूर्ण केली. जे ध्येय ठेवले होते, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘तळमळ आणि श्रद्धापूर्वक प्रयत्न केल्यास श्री गुरूंची कृपा आणि गुरुतत्त्व कसे कार्यरत होते ?’, याची प्रत्यक्ष अनुभूती या सेवेमुळे साधकांनी घेतली. १०.६.२०२२ या दिवशी आपण पू. रमानंदअण्णा यांच्या मार्गदर्शनानुसार साधकांनी प्रयत्न केल्यावर त्यांना आलेल्या अनुभूतीचां काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/586815.html
६. पू. रमानंदअण्णांनी भावप्रयोगाच्या वेळी डोळ्यांसमोर येणाऱ्या जिज्ञासूंची सूची करायला सांगणे आणि त्याप्रमाणे त्या जिज्ञासूंना संपर्क केल्यावर त्यांनी चांगला प्रतिसाद देणे
या पूर्वी विज्ञापन घेण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी प्रतिसाद मिळत नव्हता; म्हणून ‘विज्ञापनांची सेवा करू नये’, असे आम्हाला वाटत असे. पू. रमानंदअण्णांनी भावप्रयोगाच्या वेळी आम्हाला ‘विज्ञापने घेण्यासाठी कोणत्या जिज्ञासूचे डोळ्यांसमोर नाव येते ?’, हे पहायला सांगितले होते. तसे केल्यावर ज्या ज्या व्यक्ती आमच्या डोळ्यांसमोर आल्या, त्यांच्याकडे आम्ही विज्ञापने मागितली. तेव्हा आम्हाला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. संतांचे मार्गदर्शन आणि गुरुकृपा यांमुळे आम्हाला आमच्यातील स्वभावदोष दूर करून विज्ञापन मिळवण्याच्या सेवेची संधी मिळाली. या सेवेमुळे आमची श्रद्धाही वाढली. यातून ‘संतांच्या वाणीत किती चैतन्य असते !’, हे आमच्या लक्षात आले आणि ‘जेव्हा गुरुदेवांचा संकल्प असतो, तेव्हा तेच करवून घेतात’, हे लक्षात आले.’ – सौ. अर्पणा भट, सौ. अश्विनी नागराज, सौ. शशिकला, सौ. वनजा, सौ. संगीता शेणॉय आणि सौ. लक्ष्मी पै, मंगळुरू, दक्षिण कन्नड, कर्नाटक अन् सौ. चेतना शंकर, कुणीगल, तुमकूर, कर्नाटक.
७. विज्ञापनांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पू. अण्णांनी आयोजित केलेला कृतज्ञता सत्संग !
७ अ. कृतज्ञता सत्संगात सर्व साधकांनी भाव आणि आनंद यांची अनुभूती घेणे : विज्ञापनांची सेवा पूर्ण झाल्यानंतर सर्व साधकांना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. त्या वेळी पू. रमानंदअण्णांनी ज्या साधकांनी विज्ञापनाची सेवा केली, त्या सर्व साधकांना एकत्रित करून कृतज्ञता सत्संगाचे आयोजन केले. या सत्संगात प्रारंभी साधकांनी ‘विज्ञापनांच्या सेवेसाठी कसे प्रयत्न केले ? त्यांना काय काय अनुभवायला मिळाले ? काय शिकायला मिळाले ?’, हे आनंदाने आणि उत्साहाने सांगितले. हा सत्संग भावाच्या स्तरावर झाला. त्या वेळी ‘सत्संगातील सहभागी साधक पृथ्वीवर नाहीत, तर देवलोकातच आहेत’, अशी अविस्मरणीय अनुभूती सर्वांनी घेतली. सर्व साधक स्वतःचे अस्तित्व विसरून भावविश्वात मग्न होऊन सत्संग अनुभवत होते. ‘हा सत्संग किती सुंदर आणि आनंददायी आहे !’, याचे शब्दांत वर्णन करू शकत नाही’, असे साधकांनी सांगितले.
साधक त्यांच्या अनुभूती आणि प्रयत्न सांगत असतांना भावावस्थेत होते. त्यामुळे त्यांना बोलताही येत नव्हते. प्रत्येक साधकाचे प्रयत्न ऐकल्यावर बाकीचे साधक भाव आणि आनंद यांची अनुभूती घेत होते. संपूर्ण वातावरण भावमय होऊन त्याचा साधकांवरही चांगला परिणाम होत होता.
७ आ. पू. रमानंदअण्णा यांनी सत्संगात गुरुदेव आणि साधक यांच्याप्रती व्यक्त केलेली भावपूर्ण कृतज्ञता ! : साधकांचे प्रयत्न, अनुभव आणि अनुभूती ऐकल्यानंतर पू. अण्णांनी साधक अन् गुरुदेव यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त केली. त्यातून आम्हाला त्यांची प्रीती अनुभवायला आली. पू. अण्णांनी ‘मी काहीच केले नाही’, असे सांगून सारे कर्तृत्व गुरुचरणी अर्पण केले आणि गुरुचरणांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी पू. अण्णा म्हणाले, ‘‘विज्ञापनांची सेवा करतांना सर्वांनी संपूर्ण दायित्व घेतले, नेतृत्व घेतले आणि क्षमतेचा पूर्ण वापर केला. दळणवळण बंदीसारखी परिस्थिती असूनही सर्वांनी आज्ञापालन करून आपले ध्येय पूर्ण केले !
‘गुरुदेवा, तुम्ही सुख द्या किंवा दुःख द्या; पण आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. आपत्काळ असो वा संपत्काळ असो, आम्ही घरी असो, आम्हाला समष्टीत जाऊन सेवा करण्याची संधी मिळो किंवा न मिळो; पण आमच्या श्वासातून गुरुसेवाच व्हायला हवी !’, असे आपण म्हणतो. त्यानुसार आज तुम्ही सर्व साधकांनी प्रयत्न करून दाखवले. सर्व साधकांप्रती मी कशी कृतज्ञता व्यक्त करू ? आपत्काळात भगवंताच्या आधाराने अडचणींवर मात करून सर्वांनी आज्ञापालन केले; म्हणून कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता !
सर्वांप्रती कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ।
कोणताही विचार मनात न ठेवता परिश्रम घेऊन प्रयत्न केले ।
यासाठी सर्वांप्रती कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ।। १ ।।
तुमच्याकडे किती क्षमता आणि कौशल्य आहे ।
पण मीच ते ओळखण्यास अल्प पडलो ।
पण आता तुम्ही ते गुरुकार्यात वापरले ।
यासाठी सर्वांप्रती कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ।। २ ।।
आता संकटकाळातही गुरुकार्याची हानी व्हायला नको ।
गुरुकार्य माझेच आहे, असे उत्तरदायित्व स्वतःवर घेऊन ।
चिकाटीने, संघटितपणे प्रयत्न केले ।
म्हणून सर्वांप्रती कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ।। ३ ।।
अनिष्ट शक्तींचा त्रास होत असतांनाही त्याविरुद्ध लढाऊ वृत्तीने लढून ।
आपत्काळ आहे, हे विसरून तळमळीने, भावाने आणि श्रद्धेने वेळेत सेवा पूर्ण केली ।
मारुतीसारखी दास्यभक्ती ठेवून सर्वांनी शरणागतीने प्रयत्न केले ।
ते सत्य आहे, असे मला वाटतच नव्हते; पण तुम्ही ते करून दाखवले, मीच त्यात अल्प पडलो ।
यासाठी सर्वांप्रती कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ।। ४ ।।
भक्तवत्सल गुरुदेवा, तुम्ही आम्हाला दिलेले साधक किती अमूल्य आहेत ।
आता लक्षात आले की, साधक तन, मन, धन आणि प्राण यांचा त्याग करण्यासही सिद्ध आहेत ।
तुमची कृपा संपादन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले ।
असे साधकपरिवार तुम्ही आम्हाला दिले ।
यासाठी तुमच्या चरणी अनंत कोटीशः कृतज्ञता ।। ५ ।।
गुरुदेवा, ‘यापुढेही येणाऱ्या काळात आम्हा सर्व साधकांना अशी सेवा करण्याचे भाग्य द्या. याच जन्मी आम्हाला तुमच्या चरणी समर्पित करवून घ्या !’, अशी आपल्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे.’’
७ इ. पू. अण्णांच्या आर्त प्रार्थना आणि कृतज्ञता यांमुळे साधकांना द्वापरयुगातील गोपींच्या उत्कट भावाची अनुभूती येणे : या कृतज्ञतेत ‘पू. अण्णांचे शब्दांतील त्यांची प्रीती, आनंद आणि अतूट श्रद्धा’, या सर्वांचा समुच्चय होता. त्यांच्यातील उत्कट भावाचा परिणाम संपूर्ण वातावरणावर झाला होता. ज्याप्रमाणे द्वापरयुगात श्रीकृष्णाची बासरी ऐकून गोपी स्वतःला विसरल्या होत्या, त्याप्रमाणे या सत्संगात सर्व साधकांनी या उत्कट भावाचा अनुभव घेतला. या संपूर्ण सत्संगात गुरुदेवांचे अस्तित्व आरंभीपासून शेवटपर्यंत अनुभवण्यास मिळाले. ‘ही भावाची स्थिती किती आनंददायी आहे !’, असे वाटून ‘या स्थितीतून बाहेर येऊच नये’, असे वाटत होते.
७ ई. ‘या सत्संगातून साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून झाले’, असे साधकांनी सांगितले.
८. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘या घनघोर आपत्काळात आणि इतक्या रज-तमात्मक वातावरणात आम्हा सर्व साधकांना अशी वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती देऊन साधकांची काळजी घेणाऱ्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. ‘हे गुरुदेवा, ‘हे शब्दातीत कृतज्ञतापुष्प तुमच्या चरणी अर्पण होऊ दे. आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना होऊ दे. सर्व साधक जीव तुमच्या श्री चरणी लवकरात लवकर पुष्परूपात समर्पित व्हावेत’, अशी आर्ततेने प्रार्थना आहे.
(समाप्त)
– श्री. काशीनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सौ. मंजुळा रमानंद गौडा (पू. रमानंद गौडा यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सौ. पौर्णिमा प्रभु, कर्नाटक
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |