श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा !
हिंदु जनजागृती समितीचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर, १० जून (वार्ता.) – महाराष्ट्राची कुलस्वामीनी असणाऱ्या श्री तुळजाभवानीमातेचे मंदिर हे शासकीय नियंत्रणात असतांना तेथे वर्ष १९९१ ते वर्ष २००९ या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. न्यायालयाने या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीआयडीचा) चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितला होता. या ‘सीआयडी’च्या चौकशी अहवालानुसार दानपेटी लिलावात ८ कोटी ४५ लाख ९७ सहस्र रुपयांचा घोटाळा झालेला असून त्यात दोषी म्हणून ९ लिलावदार, ५ तहसीलदार, १ लेखापरीक्षक, १ धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी स्वीकारले.
या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री बालाजी गणपा, सागर चंदन केरी, लालकृष्ण दुमपेट्टी, साईनाथ चव्हाण, प्रथमेश कुंभार, केशव परळकर, आकाश दुद्गुंडी, बसवेश्वरे गुळगी, योगेश वेदपाठक, बालाजी ढोकळे, अशोक पात्रीकर, श्रीनिवास क्यामा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके, श्री. विनोद रसाळ आदी उपस्थित होते.