सांगलीत महापालिकेची अनधिकृत फलकांवर कारवाई !
सांगलीत ४३, तर मिरज शहरात २२० फलक उतरवले !
सांगली, १० जून (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने विनाअनुमती आणि खासगी जागेत शुल्क न भरता उभारलेल्या फलकांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. या कारवाईत सांगलीत ४३, तर मिरज शहरात २२० फलक उतरवण्यात आले असून महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. (इतके अनधिकृत फलक उभे राहीपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का ? – संपादक) महापालिकेच्या क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, तसेच रस्त्यांवर राजकीय पक्ष, संघटना यांचे फलक, झेंडे, विज्ञापने, व्यावसायिक, दुकानदार यांनी त्यांच्या दर्शनी बाजूने महापालिकेची अनुमती न घेता हे फलक उभारले आहेत. या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने यापुढील कालावधीत रितसर शुल्क भरून फलक न लावल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी आयुक्तांनी दिली आहे.