सर्वांवर निरपेक्ष प्रीती करणारे आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ असणारे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७० वर्षे) !
सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मला (कु. अनुराधा जाधव यांना) जळगाव सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली. या कालावधीत मला सद्गुरु बाबांची (सद्गुरु नंदकुमार जाधव यांची) जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. वेळेचे पालन करणे
सेवाकेंद्रात कोणताही सण किंवा उत्सव साजरा करतांना सर्व जण आरतीसाठी एकत्रित यायचे. तेव्हा सद्गुरु बाबाही वेळेच्या आधी तेथे आलेले असायचे. प्रसारातील सेवा असो किंवा वैयक्तिक काम असो, सद्गुरु बाबा प्रत्येक वेळी तेथे जाण्यासाठी वेळेच्या आधी १० मिनिटे सिद्ध असायचे.
२. प्रेमभाव
आई (सौ. सुनंदा जाधव, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) जळगावला असतांना तिच्यावर एक वैद्यकीय उपचार चालू केला होता. ‘त्यासाठी काय काय लागेल आणि पथ्याच्या वेळा’, हे सर्व सद्गुरु बाबांनी स्वतः समजून घेतले.
३. इतरांना साहाय्य करणे
अ. आरंभी काही दिवस ते स्वतः आईला साहाय्य करत. ते सेवेत कितीही व्यस्त असले, तरी ते स्वतःहून आईला पथ्याच्या वेळांची आठवण करून देत असत.
आ. मला सेवा करतांना भ्रमणसंगणक (लॅपटॉप) किंवा माहितीजालाच्या (इंटरनेटच्या) संदर्भात अडचण आल्यास सद्गुरु बाबा स्वतः ती अडचण सोडवण्यासाठी साहाय्य करत.
४. सर्वांशी मिळूनमिसळून आणि मोकळेपणाने वागणे
सद्गुरु बाबा प्रत्येकाशी त्याच्या स्थितीला जाऊन मिळूनमिसळून वागतात, उदा. लहान मुलांशी खेळणे, वयस्करांची आदराने विचारपूस करणे इत्यादी. सर्वांशी मनमोकळेपणाने वागल्यामुळे सर्व साधकही त्यांच्याशी पुष्कळ मोकळेपणाने बोलतात.
५. सद्गुरु बाबा प्रत्येक साधकाला आपलेच वाटतात. त्यांचा सर्वांना पुष्कळ आधार वाटतो.
६. शिकण्याची वृत्ती
अ. सद्गुरु बाबा अध्यात्मप्रसाराची सेवा करतात. ही सेवा करतांना अन्य जिल्ह्यांतील साधकांनी साधनेच्या दृष्टीने काही चांगले प्रयत्न केले, तर ते त्याविषयी लगेच विचारून घेतात.
आ. एकदा सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांसाठी ‘नामजपादी उपाय सत्संग’ चालू केला. तेव्हा त्याचा ‘सर्वांना पुष्कळ लाभ होत आहे’, हे त्यांनी सांगितले. त्या वेळी सद्गुरु बाबांनी लगेच ‘सद्गुरु स्वातीताई सत्संग कसा घेतात आणि सत्संगात काय काय घेतात ?’, ही सर्व सूत्रे लिहून घेतली. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी जिल्ह्यातील सर्वांसाठी ‘नामजपादी उपाय सत्संग’ चालू केला. असे अन्य अनेक सेवांच्या संदर्भातही लक्षात येते.
७. अहं अल्प असणे
कोणाला काही विचारतांना किंवा कोणाकडून काही समजून घेतांना सद्गुरु बाबांमध्ये अहं जाणवत नाही. ते निर्मळतेने आणि शिकण्याच्या स्थितीत राहून विचारतात.
८. सेवेचे अभ्यासपूर्ण नियोजन करणे
सद्गुरु बाबा जळगाव आणि इतर काही जिल्ह्यांचे धर्मप्रचारक आहेत. त्यांच्याकडे ‘प्रसाराच्या अंतर्गत अनेक सूत्रांचे नियोजन करण्याची सेवा असते. सद्गुरु बाबा त्या सेवांचे चांगले नियोजन करतात. त्याच समवेत त्यांच्याकडे कोरोना महामारीच्या वेळी लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीपासून ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा आहे. या सेवेसाठी त्यांनी प्रतिदिनचे नियोजन केले आहे. त्यामध्ये संहितेचा (‘स्क्रिप्ट’चा) अभ्यास आणि बोलीभाषेत वाक्यरचना करणे इत्यादींचा समावेश आहे. ‘प्रत्यक्षात चित्रीकरण करणे आणि ते व्यवस्थित होईपर्यंत पुन्हा करणे’, यांसाठी ते प्रतिदिन २ – ३ घंटे वेळ द्यायचे. बाहेरून ये-जा करणाऱ्या गाड्यांचा किंवा अन्य आवाज, यांमुळे चित्रीकरणात अडथळे यायला नकोत; म्हणून हे चित्रीकरण सकाळी ७ ते ८ या वेळेत असायचे.
९. गुरुकार्याची तळमळ
सद्गुरु बाबा पहाटे उठून नामजप करून आणि त्यांचे वैयक्तिक आवरून सेवेसाठी सिद्ध असायचे. रात्री झोपायला कितीही उशीर झाला, तरी ते नियोजित वेळेतच उठतात. त्या वेळी दिवसभर सेवा चालू असायच्या, तरी ते विश्रांती घेत नसत. यावरून त्यांची गुरुकार्याची तळमळ शिकायला मिळते, तसेच ‘नियोजनबद्ध सेवा करून साधना आणि वेळ यांची फलनिष्पत्ती कशी वाढवायची ?’, हेही मला शिकता आले. काही वेळा त्यांचे अन्य जिल्ह्यांत मार्गदर्शनासाठी जाण्याचे नियोजन असेल, तर ते तेवढ्या दिवसांच्या सत्संगाचे चित्रीकरण आधी पूर्ण करून मगच तेथे जायचे.
१०. भाव
ते आठवड्यातून एकदा ‘गुरुमहिमा सत्संग’ घेतात. त्यात ते शेवटी गुरुदेवांवर श्रद्धा वाढण्यासाठी सूत्रे सांगतात. ती सूत्रे ऐकतांना त्यांच्यातील भावामुळे सर्व साधक गुरुभक्तीत डुंबून जातात.
११. साधकांसह धर्मप्रेमींच्या मनात सद्गुरु बाबांविषयी पुष्कळ आदर आणि उत्कट भाव असणे
११ अ. एका धर्मप्रेमींची सद्गुरु बाबांशी अकस्मात् भेट झाल्यावर त्यांचा भाव जागृत होणे : एकदा आम्ही जळगाव सेवाकेंद्रामधून गाडी बाहेर काढत असतांना समोर मार्गावरून एक धर्मप्रेमी जात होते. तेव्हा त्यांनी सद्गुरु बाबांना पाहिले. ते पुढे गेले होते; पण लगेच परत मागे आले आणि ते सद्गुरु बाबांना भेटले. त्या वेळी त्यांचा भाव जागृत झाला होता, तसेच त्यांच्यामध्ये नम्रताही जाणवत होती. त्यांची आणि सद्गुरु बाबांची पुष्कळ दिवसांनी भेट झाली होती. दळणवळण बंदी असल्याने कोणाला भेटता येत नव्हते. त्यांना अकस्मात् सद्गुरु बाबा दिसले. त्यामुळे ते भावविश्वात गेले.
११ आ. सद्गुरु बाबा एका धर्मप्रेमींच्या दुकानात गेल्यावर ‘सद्गुरूंचे चरण माझ्या दुकानाला लागले’, असे वाटून त्यांचा भाव जागृत होणे आणि त्यांना पुष्कळ आनंद होणे : एकदा आम्ही वैयक्तिक खरेदीसाठी बाजारामध्ये गेलो होतो. तेव्हा सद्गुरु बाबा दुकानाबाहेर आसंदीत बसले होते. त्या भागातील एक धर्मप्रेमी तेथून जात असतांना त्यांना कापूर आणि अत्तर यांचा सुगंध आला; म्हणून त्यांनी आजूबाजूला पाहिले. तेव्हा त्यांना सद्गुरु बाबा दिसले. ते लगेच सद्गुरु बाबांना त्यांच्या दुकानात घेऊन गेले. आम्ही तेथे असेपर्यंत ते धर्मप्रेमी भावावस्थेत होते. सद्गुरूंचे चरण माझ्या दुकानाला लागले; म्हणून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सद्गुरु सर्वांवरच प्रीती करतात; म्हणून ते सर्वांना हवेहवेसे वाटतात.
१२. सद्गुरु बाबांमधील चैतन्यामुळे प्राण्यांनाही त्यांचा सहवास हवाहवासा वाटणे
सद्गुरु बाबा केवळ लहान मुले, साधक आणि वाचक यांनाच नाही, तर प्राण्यांनाही हवेहवेसे वाटतात. सेवाकेंद्रात ‘हिरा’ नावाचा श्वान आहे. सद्गुरु बाबा साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी निघाले की, तो श्वान ‘सद्गुरु बाबांनी त्याला घेऊन जावे’, यासाठी इकडून तिकडे फिरत रहायचा. जेव्हा त्याला समजायचे, ‘मला नेत नाही’, तेव्हा तो लहानसे तोंड करून रुसून बसल्यासारखा करायचा. जेव्हा सद्गुरु बाबा सेवाकेंद्रात परत यायचे, तेव्हा तो आनंदाने उड्या मारत त्यांच्या जवळ जायचा. त्यालाही ‘त्यांच्यातील चैतन्य जाणवायचे’, असे मला वाटते.
१३. गुरुदेवांची शिकवण स्वतःच्या आचरणात आणून इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करणे
आमच्या एक नातेवाईक ८ वर्षांपासून काही कारणांमुळे आमच्याशी बोलत नव्हत्या. आम्ही ८ वर्षांनी एका कार्यक्रमामध्ये भेटलो, तरीही त्या आमच्याशी बोलल्या नाही. सद्गुरु बाबांनी आम्हाला आधीच सांगून ठेवले होते, ‘‘त्या आपल्याला आज भेटणार, तर आपण स्वतःहून त्यांच्याशी बोलून आपला अहं न्यून करूया. गुरुदेवांची शिकवण कृतीत आणूया.’’ त्यांनी स्वतःहून त्या नातेवाइकांची विचारपूस केली; पण त्या काहीच न बोलता तेथून निघून गेल्या. तेव्हा ‘बाबा संत आहेत. त्यांनी (नातेवाइकांनी) असे करायला नको होते. इतक्या वर्षांनी भेटलो, तर बोलायला हवे’, असा विचार माझ्या मनात येऊन गेला; पण सद्गुरु बाबांना त्याचे काहीच वाटले नाही. ते म्हणाले, ‘‘आपण प्रयत्न केला. यातून अहं-निर्मूलन होऊन आपली साधना झाली.’ ते ‘समोरचा कसा वागतो ? त्यामुळे आपल्या मनाची स्थिती कशी होते ?’, हेच देव शिकवत आहे’, या आनंदातच होते.
१४. सद्गुरु बाबा सेवाकेंद्रात असतांना जाणवलेली सूत्रे
अ. जेव्हा सद्गुरु बाबा जळगाव सेवाकेंद्रात असतात, तेव्हा एक वेगळेच चैतन्य जाणवते. जेव्हा ते इतर जिल्ह्यांत मार्गदर्शनासाठी बाहेर जायचे, तेव्हा सेवाकेंद्र रिकामे वाटायचे.
आ. सेवाकेंद्रात एक फुलपाखरू सतत असायचे. कधी सद्गुरु बाबांच्या खोलीत, कधी ध्यानमंदिरात, तर कधी सभागृहात ते दिवस-रात्र असायचे. जणू ‘ते सेवाकेंद्रातील चैतन्य ग्रहण करत आहे’, असे मला जाणवायचे.
१५. अनुभूती
सद्गुरु बाबांशी बोलल्यावर मनावरील ताण दूर होऊन सकारात्मकतेत वाढ होणे
जेव्हा जेव्हा माझ्या मनाचा संघर्ष होतो, तेव्हा त्यांच्याशी बोलल्यावर माझ्या मनावरील ताण दूर होऊन मनाची सकारात्मकता पुष्कळ वाढते. मला ‘मी आणखी चांगले प्रयत्न करायला हवेत’, ही प्रेरणाही मिळते.
‘हे गुरुदेवा, ‘तुम्ही मला असे प्रीतीस्वरूप आणि वात्सल्यस्वरूप सद्गुरु बाबा दिले’, त्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. हे गुरुदेवा, ‘सद्गुरु बाबांचे सर्व गुण माझ्यातही यावेत’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.
– कु. अनुराधा जाधव (मुलगी), फोंडा, गोवा. (२९.५.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |