पावसाळ्यात समुद्रात २६ वेळा मोठे उधाण येणार ! – प्रादेशिक बंदर विभाग, सिंधुदुर्ग
मासेमार आणि नागरिक यांना समुद्रात न जाण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग – पावसाळ्यात अनेक वेळा समुद्राला मोठी भरती (उधाण) येते. काही वेळा उधाण आलेले असतांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडू लागला, तर समुद्रकिनार्यासह खाडी किनार्यावरील वस्त्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. यावर्षी पावसाळ्यात समुद्रामध्ये २६ वेळा मोठी भरती (उधाण) येणार आहे. या काळात मासेमारांनी, तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, अशी चेतावणी प्रादेशिक बंदर विभागाने दिल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती साहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांनी सांगितले आहे.
मोठी भरती येण्याचे दिवस
१. जूनमध्ये १४ ते १८ हे सलग ५ दिवस आणि ३० जून
२. जुलैमध्ये १३ ते १७ आणि ३० अन् ३१ जुलै
३. ऑगस्टमध्ये ११ ते १५ आणि २९ आणि ३० ऑगस्ट
४. सप्टेंबरमध्ये ९ ते १३
या मोठ्या भरतीच्या दिवसात २ मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तसेच समुद्र आणि खाडी यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. त्यामुळे सावधानता म्हणून नागरिकांनी या काळात दक्ष राहून जीवित आणि वित्त हानी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी कुठेही तुंबणार नाही, याची काळजी घ्यावी. पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी वस्तीस असलेल्या लोकांनी तात्पुरते अन्यत्र स्थलांतरित व्हावे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना सर्व ते साहाय्य करण्यासाठी प्रशासन सज्ज असतेच; पण आपणही योग्य ती काळजी घेणे अन् स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणार्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.