काही बेशिस्त भाविकांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात टाकल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या !

काही भाविकांनी मंदिराच्या परिसरात टाकलेल्या बाटल्या

कोल्हापूर, ९ जून (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात काही भाविकांकडून बेशिस्तीचा प्रकार उघडकीस आला आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांना ऊन लागू नये; म्हणून मंडप टाकलेला आहे. या मंडपावर भाविकांनी पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या टाकलेल्या आढळून आल्या. मंदिराच्या सेवकांना या बाटल्या काठीने काढाव्या लागल्या. (मंदिराच्या  परिसरात सात्त्विकता टिकवणे हे भाविकांचेही कर्तव्य आहे, हे समजण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यातून अधोरेखित
होते ! – संपादक)

या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाइकवाडे म्हणाले, ‘‘हा प्रकार ‘टुरिस्ट’ (पर्यटक) म्हणून येणाऱ्या भाविकांकडून झाला आहे. अन्य गावांवरून काही आस्थापने मंदिर पर्यटनासाठी भाविकांना घेऊन येतात. गाडीतून उतरल्यावर त्यांना पाण्याच्या बाटल्या देण्यात येतात. ते भाविक पाणी पिऊन झाल्यावर या बाटल्या मंदिराच्या परिसरात फेकून देतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. असा प्रकार स्थानिक भाविकांकडून घडत नाही.’’ (मंडपाच्या छतावर बाटल्या नेऊन कुणी टाकल्या याचा शोध घेऊन त्यांना शासन करायला हवे ! – संपादक)