पावसाळ्यामध्ये पशूधनास होणारे विविध आजार आणि त्यांवरील उपचार !

‘पावसाळा हा आनंददायी ऋतू आहे; पण पावसाळा चालू होताच वातावरणात वेगाने पालट होतात. त्यामुळे मानव, प्राणी आणि वनस्पती यांची प्रचंड हानी होते. मानवी जीवन निर्धोक होण्यासाठी जशी काळजी घेतली जाते, तशी पशू-पक्षी यांच्याही जीवितरक्षणाची काळजी घेणे आवश्यक ठरते. वातावरणात वाढलेला गारवा, दूषित पाणी आणि कामाचा ताण यांमुळे पशूधनाची उत्पादनक्षमता खालावते अन् अधिक हानी होते.

पशू-पक्ष्यांचा गळका निवारा, चारा आणि खाद्य यांमधील पालट, जंत-गोचीड यांचा संसर्ग, कासेचे आजार, तसेच पिण्याच्या पाण्याची खालावलेली गुणवत्ता यांमुळे पशू-पक्ष्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. पशू-पक्ष्यांचे विविध वयोगट आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून वर्गीकृत गट यांनुसार होणाऱ्या आजारांची वर्गवारी येथे देत आहोत.

(भाग १)


प्रतिकात्मक छायाचित्र

१. दुभती जनावरे, शेतकामाची जनावरे आणि वासरे यांचे आजार

१ अ. जंतांचा संसर्ग : गोल, चपटे, पर्णाकृती, छिद्र कृमी असे विविध प्रकारचे जंत आढळून येतात.

लक्षणे : भूक मंदावणे, त्वचा कोरडी पडणे, केस राठ होणे, अशक्तपणा येणे

उपाय : पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर जंताचे औषध देणे, उदा. Piperazine, Abendazole, Fenbendazole, Ivermectin

१ आ. घटसर्प : हा Pasteurella multicida या जिवाणूपासून होणारा आजार आहे.

लक्षणे : ताप येणे, गळा, घसा, जीभ, टाळू यांना सूज येणे, घशातून घरघर आवाज येणे, श्वसनास अडथळा निर्माण होणे आणि हगवण अशी लक्षणे दिसतात. ४-५ दिवसांत जनावराचा मृत्यू होतो.

उपाय : आजारी जनावराला वेगळे करणे, ‘सल्फाडीमिडिन’ या औषधाच्या ४ ते ६ गोळ्या ३ दिवस देणे, टेरामायसिन, सल्फाडिमिडीन इंजेक्शन देणे.

श्री. बाबूराव कडूकर

१ इ. बुळकांडी : या रोगाला ‘जनावरातील प्लेग’ असे म्हटले जाते. ‘Paramyxoviris’ या विषाणूपासून हा रोग होतो. याचा वेगाने प्रसार होतो, तसेच या रोगातील मरतुकिचा दर अधिक आहे.

लक्षणे : ताप येणे, जीभ आणि हिरड्या यांवर फोड येणे, आतड्याच्या आतील आवरणाला सूज येणे, पातळ दुर्गंधीयुक्त जुलाब होणे, रक्ती जुलाब होणे, अंगावर लालसर तपकिरी रंगाचे चट्टे येणे.

उपाय : आजारी जनावराला वेगळे करणे, पशूवैद्याकडून त्वरित उपचार करून घेणे, लसीकरण करणे, शेण-मूत्र आदी घाण, तसेच मृत जनावराचे शव खोल खड्ड्यामध्ये जंतूनाशके टाकून पुरावे.

औषधोपचार : सल्फोनोमाइड्स प्रतिजैवके अधिक उपयोगी ठरतात. यावर विशेष असे उपाय नाहीत.

१ ई. फऱ्या : या आजारास ‘ब्लॅक लेग’ असे म्हणतात. हा Closteixium chauvoei या जिवाणूपासून होणारा, अत्यंत वेगाने पसरणारा आणि अत्यंत घातक असा आजार आहे.

लक्षणे : १०६ ते १०८ डिग्री फॅरेनहाईट इतका ताप येणे, भूक मंदावणे, हृदय-नाडीचे ठोके वाढणे, श्वसनास अडथळा येणे, लंगडणे, चरचर आवाज करणारी पाठ, खांदे आणि पार्श्वभाग यांवर सूज येणे. बाधित जनावर आडवे पडून रहाते आणि १२ ते ४८ घंट्यांमध्ये त्याचा मृत्यू होतो.

उपाय : बाधित जनावरावर तज्ञ पशूवैद्याकडून त्वरित उपचार करून घेणे. पेनिसिलीन, टेट्रॅशिलीन या प्रतिजैविक औषधांचा वापर करणे.

प्रतिबंध : बाधित जनावराचे अलगीकरण करणे, मृत जनावराचे शव खोल पुरणे किंवा जाळणे, पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर लसीकरण करणे.

१ उ. खांद येणे (योक गाल) : हा आजार शेतकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जनावरांमध्ये दिसून येतो.

लक्षणे : मानेवरील त्वचा लालसर होणे, त्वचेचे आवरण खरचटणे, सूज येणे, जंतूसंसर्गामुळे पू होणे, जखम होणे इत्यादी.

उपचार : विविध मलमे लावणे, जखम झाल्यास तिची स्वच्छता करणे आणि औषधांचा वापर करणे, बाधित जनावरांना पुरेशी विश्रांती देणे.

२. शेळ्या-मेंढ्यांचे आजार

पहिला पाऊस पडल्यानंतर आणि पुराचे पाणी पडलेले गवत खाण्यात आल्यामुळे शेळ्या-मेंढ्यांमध्ये साथीचे आजार पसरतात.

२ अ. जंतांचा संसर्ग : सर्वसाधारणपणे गोल, चपटे, छिद्र कृमी, पर्ण कृमी इत्यादी जंतांचे प्रकार दिसून येतात.

लक्षणे : करडे, मोठ्या शेळ्या-मेंढ्यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. उत्पादनामध्ये घट होते. त्यांच्यात अशक्तपणा आणि शारीरिक कृशता दिसून येते. हगवण, तसेच रक्तक्षय होतो. प्रजोत्पादनात घट होते.

उपाय : पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर जंतनिर्मूलन करणे.

२ आ. आंत्रविष (Wnterotoxemia) : हा आजार Clostridiumm perfringens या जिवाणूंमुळे होतो.

लक्षणे : पोटदुखी, वारंवार उठबस करणे, भूमीवर कोलांट्या उड्या मारणे, पोटावर लाथा मारणे, कधी कधी हगवण, पाठीचा कणा धनुष्याकृती करून बाधित जनावर उभे रहाते.

उपचार : या रोगामध्ये परिणामकारक उपचार दिसून येत नाहीत; परंतु तोंडावाटे प्रतिजैविके देणे काही वेळा हितावह ठरते.

प्रतिबंध : करडू ४ ते ६ आठवड्यांचे झाल्यानंतर लसीकरण करावे, ३ ते ६ आठवड्यांनी वर्धित मात्रा द्यावी. त्यानंतर प्रत्येकी ६ मासांचे लसीकरण करावे. गाभण शेळी-मेंढी यांना वेण्यापूर्वी लसीकरण केल्यास जन्माला येणाऱ्या करडांना या रोगापासून संरक्षण मिळते.

२ इ. घटसर्प : हा रोग Pasteurella multocida या जिवाणूमुळे होतो.

लक्षणे : गळा, मान, जीभ आणि टाळू यांवर सूज येते. ताप येतो, नाक आणि तोंड यांमधून पाणी गळते, श्वसनास त्रास होतो, श्वसन करतांना घरघर असा आवाज येतो. २४ ते ४८ घंट्यांमध्ये बाधित शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू होतो.

उपाय : बाधित जनावरांना वेगळे करणे, तज्ञ पशूवैद्याकडून उपचार करून घेणे, ‘सल्फा’ या औषधाच्या गोळ्या देणे.

प्रतिबंध : पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर लसीकरण करावे.

२ ई. फऱ्या : या आजाराला ‘ब्लॅक लेग’ असे म्हणतात. हा Closteixium chauvoei या जिवाणूपासून होणारा, अत्यंत वेगाने पसरणारा आणि अत्यंत घातक असा आजार आहे.

लक्षणे : अती ताप येणे (१०६ ते १०८ डिग्री फॅरेनहाईट ताप येणे), भूक मंदावणे, हृदय-नाडीचे ठोके वाढणे, श्वसनास अडथळा येणे, लंगडणे, पाठीतून चरचर आवाज येणे, खांदे आणि पार्श्वभाग यांवर सूज येणे, बाधित जनावर आडवे पडून रहाते आणि १२ ते ४८ घंट्यांमध्ये बाधित जनावराचा मृत्यू होतो.

उपाय : बाधित जनावरावर तज्ञ पशूवैद्याकडून त्वरित उपचार करून घेणे. पेनिसिलीन आणि टेट्रॅशिलीन या प्रतिजैविक औषधांचा वापर करणे.

प्रतिबंध : बाधित जनावराचे अलगीकरण करणे, मृत जनावराचे शव खोल पुरणे किंवा जाळणे, पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर लसीकरण करणे.

२ उ. खुरांचे आजार : पावसाळ्यात साठलेले पाणी आणि चिखल यांमुळे शेळ्या-मेंढ्यांमध्ये खुरांचे आजार दिसून येतात.

लक्षणे : खुरांमध्ये जखमा होणे, पू होणे, खुरांवरील काळे आवरण गळून पडणे, खुरांच्या मधील भाग सडणे, लंगडणे, भूक मंदावणे.

उपाय : वाढलेले खूर पावसाळ्यापूर्वी तासणे, कॉपर सल्फेटच्या ५ ते १० टक्के तीव्रतेच्या द्रावणामध्ये बाधित खूर बुडवून ठेवणे.

(क्रमश:)

– पशूवैद्यक बाबूराव कडूकर, पशूचिकित्सा विज्ञान आणि पशूसंवर्धन पदवीधर, डी.फार्म, एम्.बी.ए., निवृत्त पशूवैद्यकीय अधिकारी, गडहिंग्लज, कोल्हापूर (४.६.२०२२)

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/587006.html