सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी शिकवलेल्या सूत्रांमुळे साधकाला आलेल्या विविध अनुभूती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्या वाढदिवसाच्या वेळी आलेल्या अनुभूती

१ अ. समर्पणाचे महत्त्व : सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता अर्पण करणारे एक चलत्चित्र (व्हिडिओ) बनवायची सेवा मला मिळाली होती. प्रत्यक्षात ते चलत्चित्र (व्हिडिओ) सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांना पाठवले आणि देहली सेवाकेंद्रातील सर्व साधकांसह ते पाहिले, तेव्हा माझी भावजागृती झाली. जो भाव आणि कृतज्ञता चलत्चित्र (व्हिडिओ) बनवतांना अनुभवू शकलो नाही, ते सर्व सद्गुरुचरणी चलत्चित्र (व्हिडिओ) अर्पण केल्यावर मला अनुभवयाला मिळाले.

श्री. श्रीराम लुकतुके

१ आ. गुरुतत्त्व एकच असल्याची अनुभूती भगवंताने देणे : ही अनुभूती सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांना सांगितल्यावर सद्गुरु काका मला म्हणाले, ‘‘यातून अर्पण करण्याचे महत्त्व लक्षात आले ना ! अर्पण केले की, आपले काही रहात नाही. सर्व कर्तेपणाही अर्पण होतो.’’ नंतर काही घंट्यांत श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंशी माझे बोलणे झाले. तेव्हा त्यांनीसुद्धा हेच सूत्र पूर्णतः त्याच शब्दांत मला सांगितले. तेव्हा गुरुतत्त्व एकच असल्याची अनुभूती भगवंताने मला दिली.

१ इ. सामान्य व्यक्ती आणि संत यांच्या वाढदिवसात जाणवलेला भेद : या प्रसंगात अजून एक सूत्र शिकायला मिळाले. ‘सामान्य व्यक्तीचा वाढदिवस असतो, तेव्हा केवळ ती व्यक्ती आनंदी होते (सुख अनुभवते); पण संतांचा वाढदिवस, म्हणजे संपूर्ण समष्टीला आनंद आणि कृतज्ञता अनुभवण्याची संधी असते.

२. मनात नकारात्मक विचार येतांना प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती यांत सकारात्मक राहून त्यात भगवंताला अनुभवायला शिकवणारी गुरुमाऊली !

गेल्या काही आठवड्यांमध्ये अचानक ‘माझ्या कुटुंबातील कोणा सदस्याचा अपघात झाला आहे किंवा काही बरे वाईट झाले आहे, उदा. मृत्यू झाला आहे’, असे विचार माझ्या मनात येत होते. तेव्हा देवानेच मला जाणीव करून दिली, ‘प्रत्येक जण आपले भाग्य आणि प्रारब्ध घेऊन येतो. मी विचार आणि चिंता करून काही होणार नाही.’ त्या वेळी ‘हे विचार अनिष्ट शक्ती माझे मन विचलित करण्यासाठी माझ्या मनात घालत असतील, तर त्यांना महत्त्व द्यायला नको’, या सद्गुरु काकांच्या शिकवणीचे स्मरण व्हायचे. त्यामुळे या विचारांचा मनावर काही परिणाम होत नव्हता. ‘भगवंताने दिलेल्या दृष्टीमुळे एक प्रकारे मनही सक्षम होत आहे’, असा अनुभव मला येत आहे. प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती यांत सकारात्मक राहून त्यात भगवंताला अनुभवायला शिकवणाऱ्या गुरुमाऊलींच्या चरणी
कोटीशः कृतज्ञता !

३. वाईट शक्तींच्या त्रासाच्या निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय, म्हणजे आपत्काळात परात्पर गुरुदेवांनी सर्व साधकांना दिलेली संजीवनीच !

साधिकेला वाईट शक्तींचा त्रास होत असतांना सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी सांगितल्यानुसार तिने आज्ञाचक्रावर रिकाम्या खोक्याचा उपाय केल्यावर अर्ध्या मिनिटात तिचा त्रास उणावणे : एकदा आश्रमातील एका साधिकेला वाईट शक्तींचा तीव्र त्रास होत होता. नामजपादी उपाय करूनही तिचा त्रास न्यून होत नव्हता. ज्या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांना कळवले, तेव्हा सद्गुरु काकांनी साधिकेला एका लहान रिकाम्या खोक्याने उपाय करण्यास सांगितले. त्यानंतर अर्ध्या मिनिटात साधिकेला बरे वाटले. त्या वेळी उपस्थित आम्हा सर्वच साधकांना संतांच्या सामर्थ्याची आणि ‘प्रत्येक गोष्ट संतांना सांगणे किती आवश्यक आहे ?’, याची जाणीव झाली.‘वाईट शक्तींच्या त्रासाच्या निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय, म्हणजे आपत्काळात परात्पर गुरुदेवांनी आम्हा सर्व साधकांना दिलेली संजीवनीच आहे’, याची अनुभूती सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांमुळे आम्हाला घेता आली.

– श्री. श्रीराम लुकतुके, देहली (९.८.२०२१)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक