देहली सेवाकेंद्रातील साधकांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांनी भावसत्संगात सांगितलेली काही सूत्रे
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका प्रसारसेवेतील साधकांसाठी प्रतिदिन सकाळी भावसत्संगातून मार्गदर्शन करतात. त्यामध्ये त्यांनी सांगितलेली काही सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘चांगल्या साधकाची लक्षणे कोणती ?’, याविषयी सद्गुरु काकांनी सांगितलेली सूत्रे
अ. जो साधक ईश्वरप्राप्तीसाठी रात्रंदिवस तळमळत आहे.
आ. जो माया आणि स्वेच्छा यांचा त्याग करण्यासाठी सिद्ध आहे.
इ. जो सर्वत्र ईश्वराला पाहून त्याची अनुभूती घेत आहे. जो स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न अगदी मनापासून करत आहे.
ई. ज्याने मनातून सर्व आसक्ती दूर करून सर्व काही सोडण्याचा निश्चय केला आहे.
उ. जो ईश्वरासाठी सर्वस्व सोडण्यासाठी सिद्ध आहे.
२. ईश्वराच्या अनुसंधानाविषयी सांगितलेली सूत्रे
अ. ‘आपण आपल्या अंतरातील ईश्वराला पुनःपुन्हा शोधणे’, हे अनुसंधान आहे.
आ. प्रेम आंधळेच असते. त्यात सर्व भावना किंवा व्यवहार यांचा त्याग केला जातो. ईश्वराच्या प्रीतीसाठी सगळे सोडले, तर आपली कधीच हानी होणार नाही.
इ. आपले सर्व अवयव ईश्वरप्राप्तीचे चिंतन करत असतील, तर हीच ध्यानावस्था आणि हेच ईश्वराचे अनुसंधान असते. प्रत्येक कृती ईश्वराशी जोडली, तर काही न सोडताच सहजध्यान किंवा सहजावस्था येते.
ई. केवळ ईश्वर किंवा गुरु यांचे स्मरण करणे पुरेसे नाही, तर ‘गुरुसेवा करतांना ती परिपूर्ण करणे’, हेसुद्धा एक प्रकारचे अनुसंधानच आहे.
३. आलंबन
३ अ. स्थूल आलंबन : मूर्ती, गुरूंचे छायाचित्र आणि समाधी, रामायण आणि महाभारत यांचे स्मरण, परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण, रामनाथी आश्रमाचे स्मरण करणे, गुरूंच्या कृपेचे स्मरण करणे इत्यादी स्थूल आलंबन होय.
३ आ. सूक्ष्म आलंबन : ‘साक्षात् नामरूपाने ईश्वरच माझ्यामध्ये आहे. प्रत्येक कर्म करतांना ‘ईश्वर कर्ता करविता आहे’, असा भाव मनात सतत ठेवला, तर ते सूक्ष्म आलंबन आहे. ‘माझ्या अंतरातील ईश्वर माझ्याकडे पहात आहे’, याची जाणीव सतत ठेवायची. ‘ईश्वरच हे प्रयत्न माझ्याकडून करवून घेत आहे. तोच माझा श्वास आहे, तोच माझे भोजन पचवतो’, हेही सूक्ष्म आलंबन होय.
३ इ. ‘मी ईश्वराच्या हातातील एक कठपुतळी असून माझे स्वभावदोष आणि अहं दूर करणारा ईश्वरच आहे’, याची जाणीव रहाणे, हे आलंबन असणे : आरंभी आपल्या मनात कर्तेपणा येतो; परंतु आपल्याला हे स्वीकारायचे आहे की, ‘हे सर्व चालवणारा ईश्वरच आहे. मी केवळ त्याच्या हातातील एक कठपुतळी आहे. माझे स्वभावदोष आणि अहं दूर करणारा ईश्वरच आहे’, याची जाणीव हेच आलंबन आहे. ‘कर्ता करविता मी नसून ईश्वरच आहे’, असे जाणवणे साधनेत पुष्कळ महत्त्वाचे आहे.
गुरुदेवांच्या अनंत कृपेमुळे मला सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांचे सान्निध्य लाभले. मला त्यांचा अनमोल सत्संग मिळत आहे. त्यासाठी मी परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु पिंगळेकाका यांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
– कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र, देहली. (३.७.२०२१)