पुढील वर्षापासून ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठ येथे उभारली जाईल ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र नव्या पिढीसमोर दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे असावे, यासाठी शिवस्वराज्यदिन साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुढील वर्षापासून ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापिठात उभारली जाईल आणि प्रतिवर्षी एका गडावर विद्यार्थ्यांसह हा सोहळा शासनाच्या वतीने साजरा केला जाईल. यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एस्.एस्.पी.एम्. विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शिवस्वराज्यदिन कार्यक्रमात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालयातही हा दिन साजरा करण्याला मान्यता दिली आहे. श्री. सामंत यांच्या हस्ते ५१ फूट उंच ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात आली.
ते पुढे म्हणाले, ‘‘शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून महाराष्ट्राला दिशा दिली. अशा राजांच्या प्रती आदराची भावना व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयात ‘शिवशक राजदंड स्वराज्य ध्वज’ लावल्यास महाराजांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळेल. त्यांची रणनीती, नम्रतेचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा आणि त्यांचे चरित्र्य राज्यातील जनतेसमोर यायला हवे.’’