पुणे येथील पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल आणि मद्याची दुकाने बंद ठेवणार !
पुणे – यंदाच्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून संबंधित कामे अंतिम टप्प्यात आहेत. पालखी तळासह इतर सुविधांची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याविषयी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. या सोहळ्याच्या कालावधीत पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट आणि मद्याची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने खाद्य अन् पेय पदार्थांची पडताळणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील रुग्णालयातील १० टक्के खाटा पालखी सोहळ्याच्या कालावधीत आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
अतिरिक्त ‘मोबाईल टॉवर’ उभारण्याचे नियोजन आहे. पालखी मार्गावर प्रस्थानाच्या वेळी ठराविक मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आणि दोन्ही महापालिकांच्या वतीने स्त्रीरोग तज्ञांची सुविधा, महिलांसाठी ५ कि.मी. अंतरावर स्वच्छतागृह, पाणीपुरवठ्यासाठी विशेष नियोजन, ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती, २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरती वैद्यकीय पथके आणि १०८ रुग्णवाहिका यांद्वारे आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहेत.