अंबरनाथ (जिल्हा ठाणे) तालुक्यातील कुशिवली धरण भूसंपादनात झाला कोट्यवधींचा घोटाळा !
आतापर्यंत ४३ आरोपींना अटक
ठाणे, ८ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील प्रस्तावित कुशिवली धरणाच्या भूसंपादनात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात आतापर्यंत ४३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या अंबरनाथ पंचायत समितीच्या माजी सभापतींचे पती प्रवीण भोईर यांनाही अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शासकीय मोठे अधिकारी असल्याची शक्यता अन्वेषण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (सरकारचे एकतरी क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त आहे का ? – संपादक)
अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावात धरण बांधले जाणार आहे, त्यासाठी भूमी संपादन करतांना मूळ जागा मालक असलेल्या शेतकऱ्यांच्या जागी अन्य व्यक्ती उभी करून कोट्यवधींचा भूमीचा मोबदला परस्पर लाटण्यात आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी ५ वेगवेगळे गुन्हे उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाणे येथे नोंद झाले असून आरोपींची संख्या आणखी वाढणार आहे. या प्रकरणात निवृत्त नायब तहसीलदार मोहन किस्मतराव यांनाही १० दिवसांपूर्वी अटक केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील काही राजकीय नेत्यांचाही यात सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या ४३ आरोपींना उल्हासनगरच्या न्यायालयात उपस्थित केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.