गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांसाठी मूर्ती पर्यावरणपूरक शाडू मातीच्याच असाव्यात !
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आवाहन
पिंपरी (पुणे) – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या, नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्तीची निर्मिती करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
प्रसिद्धीपत्रकात मांडण्यात आलेली सूत्रे
१. महापालिकेच्या वतीने कार्यक्षेत्रामध्ये मूर्ती कारागीर, मूर्तीकार आणि उत्पादक यांना ‘पीओपी’पासून मूर्ती सिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मूर्ती सिद्ध करणे अथवा विक्री करणे यांसाठी महापालिकेकडे नोंदणी करावी. नोंदणी न केलेले कारागीर, मूर्तीकार, तसेच उत्पादक यांना महापालिका कार्यक्षेत्रात मूर्ती विक्री स्टॉलला अनुमती मिळणार नाही.
२. विनापरवाना अनधिकृतपणे मूर्ती विक्री करणारे दुकानदार, व्यावसायिक यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल.
३. मूर्ती सिद्ध करणारे अथवा विक्री करणारे कारागीर, तसेच उत्पादक यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतून अनुमती घ्यावी. परवान्याची एक प्रत दुकानाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.
संपादकीय भूमिका‘मूर्ती शाडू मातीची असावी’, असे धर्मशास्त्र सांगते. हिंदु धर्मशास्त्राचे आचरण केल्यास पर्यावरणाला कोणतीही हानी पोचत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेचा पर्यावरणपूरक, तसेच शाडू मातीच्या मूर्तीचा निर्णय निश्चितच अभिनंदनीय ! |