अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचा ठाणे येथे मोर्चा !
ठाणे, ६ जून (वार्ता.) – महाराष्ट्रातील आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा ही मरणपंथाला आली आहे. अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांमुळे दुर्गम भागातील नागरिकांना त्यांचे प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा बंद करा आणि आदिवासी बांधवांना त्यांच्या पारंपरिक पद्धतीने म्हणजेच मांत्रिकांकडून उपचार करून घेण्याची अनुमती द्यावी, तसेच आरोग्य सेवा देण्यात शासन कुचकामी ठरल्याने आधुनिक वैद्यांच्या जागी मांत्रिकांची नियुक्ती करावी, अशी उपरोधिक मागणी करत श्रमजीवी संघटनेच्या सहस्रो कार्यकर्त्यांनी ६ जून यादिवशी येथील साकेत मैदान ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने मोर्चा काढला. या मोर्च्यात ठाणे, पालघर, वसई, भिवंडी या ठिकाणाहून आलेले नागरिक यात सहभागी झाले होते.
शासकीय आरोग्य संस्था या अपूर्ण सोयीसुविधा आणि अपुरे मनुष्यबळ यांमुळे खितपत पडल्याचा दावा श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची त्वरित भरती करावी. कुपोषित बालक, तसेच गरोदर महिला यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध करून द्यावा. सर्व रुग्णालयांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि विजेची सुविधा असावी. यांसह अन्य मागण्या श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.