रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात !
अलिबाग – छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा राज्याभिषेक दिन सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडला. युवराज संभाजी राजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्रोच्चारांच्या जयघोषात जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. मेघडंबरीतील शिवपुतळ्याला मुद्राभिषेक करण्यात आला. युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी युवराज्ञी संयोगिताराजे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि आमदार आदी मान्यवर उपस्थित होते.
होळीचा माळ, बाजारपेठ, तसेच राजदरबार येथे शिवभक्तांची गर्दी जमली होती. सकाळी ध्वजपूजनाने सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी राजसदरेकडे निघाली. या वेळी महाराजांचा जयजयकार आणि ढोलताशांच्या निनादाने आसमंत दुमदुमून निघाला. सहस्रो शिवभक्त हातात भगवे झेंडे घेऊन गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष करत होते. होळीच्या माळावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या सोहळ्यात ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहिरांचा…स्वराज्याच्या इतिहासाचा’ आणि ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य पालखी सोहळ्यानंतर श्रीजगदीश्वराचे दर्शन घेऊन सोहळ्याची सांगता झाली.
रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी कार्यक्रमाची रूपरेषा, गडावर जाण्याचे-उतरण्याचे प्रमुख मार्ग, रहाण्याची सोय, वैद्यकीय सेवा, अन्नछत्र, स्वच्छतागृहे, महिलांसाठी करण्यात आलेली स्वतंत्र व्यवस्था, गडाच्या पायथ्याला असलेली वाहनतळे, पायथ्याचे अन्नछत्र यांची सर्व माहिती, नकाशे ‘क्यू.आर्.कोड’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते.