परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रथोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. परात्पर गुरु डॉ. आठवले रथात विराजमान झाल्यावर ‘स्वर्गलोकातून पुष्पवृष्टी होत आहे’, असे जाणवणे
‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी साधकांनी सिद्ध केलेल्या रथात परात्पर गुरु डॉ. आठवले विराजमान झाल्यावर ‘स्वर्गलोकातून पुष्पवृष्टी होत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा वातावरण आनंददायी वाटत होते.
२. रथोत्सवाला प्रारंभ झाल्यावर ‘काही देवता रथात, तर काही रथाच्या वर बसल्या आहेत’, असे दृश्य दिसणे
रामनाथी आश्रमातील रस्त्यावरून रथोत्सवाला प्रारंभ झाला. तिथून साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊली रथात बसून येत असतांना त्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना साधक उभे राहिले होते. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसत होते, ‘साक्षात् विष्णुलोकातून विष्णु, महालक्ष्मी आणि सर्व देवीदेवताही रथात बसल्या आहेत, तर काही देवता मार्गाच्या आजूबाजूला उभ्या आहेत आणि काही रथाच्या वर बसल्या आहेत. साक्षात् मारुतिरायाही रथाच्या वर आहे.’
३. रथ उतारावरून खाली येत असतांना ‘रथ आकाशातून पृथ्वीवर येत आहे’, असे वाटत होते. त्या वेळी साधकांच्या डोळ्यांत भाव जाणवत होता.
४. ‘वातावरण नारायणमय झाले आहे’, असे जाणवणे
२ दिवस पुष्कळ पाऊस चालू असल्याने वातावरण पावसाळी वाटत होते; परंतु रथोत्सवाच्या दिवशी सकाळी साक्षात् सूर्यनारायण आले. त्यामुळे साधकांना कृतज्ञता वाटली. त्यांनी कृतज्ञतापूर्वक सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. रथोत्सवाच्या सिद्धतेला आणखी उत्साहात प्रारंभ झाला. सूर्यनारायण, विष्णुनारायण आणि श्रीमन्नारायणही यांच्या अस्तित्वामुळे सर्वत्र ‘नारायण’ असल्याचे साधक अनुभवत होते. ‘वातावरण नारायणमय झाले आहे’, असे जाणवत होते.
५. पालखी जड असूनही ‘तिचे वजन खांद्यावर पडत नसून देव साधकांना हलकेच वर घेऊन जात आहे’, असे वाटणे
रथोत्सवाच्या वेळी पालखीमध्ये ‘श्रीराम शाळिग्राम’ ठेवला होता. ती पालखी खांद्यावर घेऊन आम्ही रथोत्सवात सहभागी झालो होतो. खरेतर त्या पालखीचे वजन ६० – ७० किलो होते; परंतु ‘देवाच्या कृपेने त्या पालखीचे वजन आमच्या खांद्यावर पडत नसून देव आम्हालाही हलकेच घेऊन जात आहे’, असेच मला वाटत होते.
६. साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शाळिग्रामाचे पूजन केल्यानंतर ‘शाळिग्रामामधील चैतन्यशक्ती पूर्ण पृथ्वीतलावर प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
७. ‘मार्गात असणाऱ्या मंदिरांतील देवता रथोत्सव पहात असून त्यांनी साधकांना आशीर्वाद दिले’, असे जाणवणे
‘रथोत्सवाच्या मार्गात असणाऱ्या मंदिरांतील देवता रथोत्सव पहात आहेत’, असे मला जाणवले. या वेळी साधकांनीश्री शांतादुर्गा देवीचा जयजयकार केला. रामनाथ देव, वाटेतील दत्ताच्या मंदिराच्या समोरून जातांना साधकांनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’, असा जयजयकार केला. नागेशी गावात गेल्यावर ‘नागेश’ देवाचा जयजयकार केला. ‘सर्व देवतांनी साधकांना आशीर्वाद दिले’, असे मला जाणवले.
वरील अनुभूती दिल्याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)
|