फाळणीसाठी जिनांइतकेच गांधी आणि नेहरू हेही उत्तरदायी ! – अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, सर्वाेच्च न्यायालय
१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…
सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी (बंगाल) यांनी ‘बंगालमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार’ या विषयावर मांडलेले विचार आणि तेथील हिंदूंची सद्यःस्थिती पुढे देत आहोत.
१. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बंगालचे महत्त्वपूर्ण योगदान !
मी मूळचा बंगालमधील आहे. या राज्यात स्वामी विवेकानंद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, नेताजी सुभाषचंद्र बोस, शरदचंद्र चटोपाध्याय आणि भारताच्या नवनिर्मितीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे रविंद्रनाथ ठाकूर (टागोर) यांच्यासारखे महान नेते अन् समाजसुधारक होऊन गेले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अखंड बंगालने महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांप्रमाणे १८ सहस्र स्वांतत्र्यसैनिकांची आहुती दिली आहे. दुर्दैवाने वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली. त्या वेळी आमच्या राज्याला मोठ्या प्रमाणात निर्वासितांच्या समस्येला तोंड द्यावे लागले. त्या काळात कोलकाता शहरात महमंद अली जिना आणि सुऱ्हावर्दी यांच्या गुंडांनी लक्षावधी हिंदूंची हत्या केली. आम्ही ते दिवस विसरू शकत नाही. काही वेळा लोक ‘भारताची फाळणी जिनांमुळे झाली’, असे म्हणतात; पण माझे वैयक्तिक मत आहे की, भारताच्या फाळणीचे दायित्व जिनांइतकेच गांधी आणि नेहरू यांचेही आहे. आता जगाला सत्य सांगण्याची वेळ आली आहे.
सुभाषचंद्र बोस यांचा गूढ मृत्यू झाला. वर्ष १९५३ मध्ये काश्मीरच्या कारागृहात असतांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे म्हटले जाते. डॉ. मुखर्जी हे ‘जनसंघा’चे संस्थापक होते. ‘भारतीय जनता पक्ष’ याच जनसंघाचे नवीन स्वरूप असून सध्या त्यांचेच सरकार केंद्रात आहे.
२. फाळणीच्या वेळी बांगलादेशमध्ये २० टक्के असलेली हिंदूंची लोकसंख्या केवळ ६ टक्के उरणे
माझ्या मते, भारतातील हिंदुत्वासाठी लढणाऱ्या संघटना, विविध राज्यांतील अल्पसंख्यांक हिंदूंच्या हितरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्ते या सर्वांना एकत्र आणण्यासाठी हिंदु जनजागृती समिती योग्य व्यासपीठ आहे. फाळणीच्या वेळी बांगलादेशमध्ये २० टक्के हिंदु होते. आता त्यांची संख्या अल्प होऊन केवळ ६ टक्के राहिली आहे. बांगलादेशमधील स्थिती भयावह आहे. भारताच्या साहाय्यानेच बांगलादेश स्वतंत्र झाला, हे सर्वश्रुत आहे. ‘सध्या बांगलादेशमधील शेख हसीना यांचे शासन सर्वधर्मसमभाव आणि हिंदु समर्थक आहे’, असे आपल्याला वाटू शकते; पण ते संपूर्णतः चूक आहे.
३. बांगलादेशात होत असलेला अल्पसंख्यांक हिंदूंचा छळ थांबवण्यासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारला खडसावणे आवश्यक !
मी ढाका येथे काही दिवस असतांना ‘बांगलादेशाचे प्रथम राष्ट्राध्यक्ष मुजीबूर रहमान हे भारताचे समर्थक असून सर्वधर्मसमभाव मानणारे आहेत’, असे मला वाटत होते; मात्र बांगलादेशात वास्तव्यास असतांना माझा भ्रमनिरास झाला. बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर ‘मुजीबूर रहमान यांनी दक्षिणेश्वरी मंदिराच्या जवळ असलेले कालीबरी हे कालिमातेचे मंदिर उद्ध्वस्त केले’, अशी माहिती मला मिळाली. अशी कित्येक मंदिरे नष्ट करण्यात आली आहेत. काही आठवड्यांपूर्वी येथील एका ज्येष्ठ हिंदु नेत्याला कारागृहात टाकण्यात आले. त्यानंतर तेथे त्या नेत्याची क्रूर हत्या करण्यात आल्याची बातमी समजली. गेली कित्येक वर्षे अशा दुर्दैवी घटना घडतच आहेत. या व्यासपिठावरून अशा घटनांना वाचा फोडली जावी, अशी माझी अपेक्षा आहे. भारत सरकारने बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंचा छळ थांबवण्याविषयी त्यांच्या सरकारला खडसावले पाहिजे, तसेच भारतातील सर्व हिंदूनी स्वतःचे धर्मकर्तव्य म्हणून संघटितपणे बांगलादेशातील हिंदूंच्या पाठीशी उभे रहायला हवे.
४. बांगलादेशाला जोडलेला संपूर्ण सीमावर्ती प्रदेश हा आतंकवाद, गोतस्करी, बनावट भारतीय चलन आदी देशविघातक कृत्यांसाठी सुरक्षित स्थान बनणे
वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली. फाळणीनंतर बंगालची सत्ता काँग्रेस पक्षाकडे होती. त्यांच्या राजवटीत वर्ष १९६० च्या दशकात बंगालमध्ये नक्षलवादी आणि इतर चळवळी यांनी जोर धरला. वर्ष १९६० पासूनच या राज्याला घुसखोरीची समस्या भेडसावत आहे. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर तेथील हिंदु समाज बंगालमध्ये येत आहे, तसेच बांगलादेशातून मुसलमानही मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहेत. या मुसलमान घुसखोरांमुळे भारत-बांगलादेशाच्या सीमेवर असलेल्या ९ जिल्ह्यांतील धर्मनिहाय लोकसंख्येचे गणित पालटले आहे. प्रत्यक्षात सर्व आतंकवादी आणि त्यांच्या संघटना, तसेच देशविघातक कृत्ये करणाऱ्या संघटना यांना सीमा भागातील मदरशांमध्ये आश्रय मिळतो. या परिसरातील सीमा सुरक्षा दल आणि केंद्र सरकारची तथाकथित सक्षम ‘एजन्सी’ यांचे नियंत्रण अत्यंत ढिसाळ आहे. माझ्या मते, बांगलादेशाच्या सीमेचा संपूर्ण परिसर हा आतंकवाद, गोतस्करी, बनावट चलनी नोटा आणि इतर विविध देशविघातक कृत्यांसाठी सुरक्षित स्थान बनले आहे. त्यामुळे ‘या समस्येवर केंद्र आणि राज्य शासनांनी कठोर पावले उचलून या राष्ट्रविघातक कारवायांचा बीमोड करायला हवा’, असे मला वाटते.
५. भारत – बांगलादेश सीमेवरील ८ सहस्र खेड्यांमध्ये एकही हिंदु नसणे
भारत – बांगलादेश सीमेवरील भारतातील राज्यांतील हिंदूंची स्थिती अत्यंत दयनीय आहे. या सीमेवरील ८ सहस्र खेड्यांमध्ये एकही हिंदु धर्मीय नाही. या सर्व खेड्यांमध्ये बांगलादेशातून घुसखोरी करून बंगालमध्ये आलेल्या मुसलमानांचे वर्चस्व आहे. विविध राजकीय पक्षांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे त्यांना मतदानपत्र, शिधापत्रिका आणि इतर वैध कागदपत्रे मिळाली आहेत. अशा प्रकारची घुसखोरी थांबवण्यासाठी भारताच्या प्रत्येक नागरिकाने आणि बुद्धीवंताने सर्वाेच्च न्यायालयात ‘बंगालमध्ये आसामप्रमाणे ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया’ लागू करावा’, अशी याचिका प्रविष्ट करायला हवी.
संपादकीय भुमिकाभारत-बांगलादेश सीमेवरील गावे घुसखोरांसाठी नंदनवन होणे, हे गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! |