एका मासात दोषी अधिकार्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी
५० लाख रुपये खर्च करूनही विजयदुर्गची दुरवस्था कायम !
कणकवली (सिंधुदुर्ग), ६ जून (वार्ता.) – सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात स्वराज्यासाठी लढाया लढलेला, अनेक परकीय आक्रमणे अत्यंत यशस्वीरित्या परतवून लावणारा आणि मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासातील सोनेरी पान असणारा विजयदुर्ग पुरातत्व विभागाच्या अनास्थेमुळे अत्यंत दयनीय स्थितीत आहे. या संदर्भात हिंदु विधीज्ञ परिषदेला माहितीच्या अधिकारात अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे. विजयदुर्गच्या डागडुजीसाठी वर्ष २०१४ ते २०२१ या ७ वर्षांच्या कालावधीत एकूण ५० लाख १६ सहस्र रुपये खर्च करण्यात आले; मात्र गडाच्या आतमध्ये सर्वत्र वाढलेली झाडी-झुडपे, अनेक वर्षे अस्वच्छ असणार्या पाण्याच्या टाक्या आणि विहिरी, मोडकळीस आलेले अतिथीगृहाचे बांधकाम, प्रसाधनगृहाची दुरवस्था यांमुळे परिसर अत्यंत अस्वच्छ आहे. एवढा खर्च करूनही विजयदुर्गची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे ‘या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे’, असे म्हणण्यास वाव आहे. या प्रकरणात दोषी असणार्या अधिकार्यांवर एका मासात कारवाई करावी, अन्यथा आम्ही मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथील ‘सुमनराज ट्रेड सेंटर’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ‘केंद्रीय पर्यटन मंत्र्यांपर्यंत हा विषय पोचवून दोषी अधिकार्यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या सौ. कावेरी राणे उपस्थित होत्या.
विजयदुर्ग येथील दुर्गप्रेमी श्री. राजू परुळेकर यांनीही पत्रकार परिषदेत विजयदुर्गच्या दुरवस्थेविषयी सद्यःस्थिती कथन केली. पत्रकार परिषदेला दैनिक प्रहार, दैनिक तरुण भारत, दैनिक पुढारी, झी २४ तास, कोकणसाद लाईव्ह आदी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. घनवट पुढे म्हणाले की,
१. विजयदुर्गच्या दुःस्थितीविषयी हिंदु विधिज्ञ परिषदेने ‘किल्ले संवर्धन समिती’च्या समितीला पत्र लिहिले होते; परंतु या समितीनेही काही केल्याचे समोर आले नाही. एकूणच केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्यातील प्रशासन या दोघांचीही यासंदर्भात अनास्थाच समोर येते. प्रत्येक मासाला लाखो रुपयांचे वेतन घेणारे पुरातत्व विभागाचे अधिकारी नेमके काय करतात ? असा प्रश्न उपस्थित होतो. मराठी साम्राज्याचा अमूल्य ठेवा असणारा हा दुर्ग पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे लयास जाण्याच्या मार्गावर आहे.
२. त्यामुळे विजयदुर्गाची निगा न राखता डागडुजी आणि अन्य कामे यांसाठीच्या निधीचा अपहार करणार्या पुरातत्त्व विभागाच्या उत्तरदायी अधिकार्यांवर कारवाई करावी, तसेच तातडीने विजयदुर्गचे संवर्धन करून त्याचे पावित्र्य जपावे.
पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांना गड-दुर्गांविषयी जराही आस्था नाही ! – अधिवक्त्या कावेरी राणे
हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी माहितीच्या अधिकारातून या दुर्गविषयी माहिती मिळवली. यात असे दिसून आले की, प्रत्येक मासात विजयदुर्गच्या डागडुजीसाठी १ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च होऊनही विजयदुर्गची ही दुरवस्था का ? पुरातत्व विभागाने हा निधी नेमका कुठे खर्च केला ? हिंदु विधीज्ञ परिषदेने वर्ष २००० पासूनचा पहाणी अहवाल मागितला असतांनाही केवळ एकाच वर्षीचा अहवाल देण्यात आला. २० वर्षांत एकदाच विजयदुर्गची पहाणी करणार्या पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांना गड-दुर्गांविषयी जराही आस्था नाही, हेच यातून दिसून येते. (अशा अधिकार्यांना जनतेच्या पैशांतून का म्हणून पोसायचे ? सरकारने त्यांना तात्काळ घरचा दाखवला पाहिजे ! – संपादक) ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पिठ खातंय’, असा भोंगळ कारभार असणार्या पुरातत्व विभागाकडून ‘गड-दुर्गांचे जतन केले जाईल’, याची काय अपेक्षा ठेवणार ?
हे पण वाचा –
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्गाविषयी पुरातत्व विभागाची अनास्था !
संपादकीय भूमिका
|