विश्वकल्याणाचा व्यापक संकल्प आणि संपूर्ण विश्वावर निरपेक्ष प्रीती करणारे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीतून अनुभवलेले भावक्षण !
‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या सहस्रचंद्रदर्शन विधीचे औचित्य साधून तुमची प्रथम भेट, भावभेट आणि दर्शनरूपी स्मरण हेच त्रिदल मानून तुमच्या चरणी अर्पण करते. ‘गुरुदेवा, सच्चिदानंद परब्रह्मस्वरूपा आणि परमकृपाळू ईश्वरा, या निर्गुडीच्या पानाचे (बेलाचे पान उपलब्ध नसते, तेव्हा शिवाला बिल्वदलाच्या ठिकाणी निर्गुडीचे पान अर्पण करतात.) बिल्वदल मानून स्वीकार करावा’, अशी भावपूर्ण प्रार्थना !
४ जून २०२२ या दिवशी आपण सौ. शालिनी प्रकाश मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध माध्यमांतून दिलेली भावभेट याविषयी पाहिले. आज उर्वरित भाग पाहूया.
(भाग ३)
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/585313.html
३. परात्पर गुरु डॉक्टरच सर्वस्व असून तेच सूक्ष्मरूपातून कार्य करत असल्याची जाणीव होणे
माता रामो, मत्पिता रामचन्द्रः ।
स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ।
अर्थ : राम माझी आई, राम माझा पिता, राम माझा धनी, राम माझा सखा आहे.
प्रभु श्रीरामचंद्र माझे सर्वस्व आहे. या अखिल ब्रह्मांडात केवळ तेच आहेत. दुसरे काहीच नाही. केवळ त्यांचेच अस्तित्व आम्ही (साधक) अनुभवतो. आमच्यासाठी प्रभु श्रीरामचंद्रस्वरूप असलेले परात्पर गुरु डॉक्टर राजराजेश्वर होते आणि आम्ही अयोद्धेचे प्रजाजन होतो. आम्ही सनातन रामराज्यातच होतो आणि पुनःपुन्हा भरत भेट (परात्पर गुरु डॉक्टर आणि साधक यांची भेट) होत असे. परात्पर गुरु डॉक्टर आत्मरूपाने नित्य माझ्या देहात असून सूक्ष्मरूपात राहून तेच माझ्याकडून सर्व कार्य करवून घेत आहेत. ‘तेच कर्ता आहेत’, ही जाणीवही तेच मला करून देत असतात. त्यांच्याच कृपेने ही जाणीव माझ्या मनात होते. या अखिल ब्रह्मांडात केवळ तेच (परात्पर गुरु डॉक्टर) माझे सर्वस्व असून मी केवळ त्यांचेच अस्तित्व अनुभवत असते.
४. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा ।
४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांची दिव्य भेट : वर्ष २०२० ते २०२१ हा काळ कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदी आणि अलगीकरणाचा ठरला. त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होत नव्हती. मुखपट्टी (मास्क) आणि सामाजिक अंतर यांमुळे भेटीचे समाधान मिळत नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरही रुग्णाईत असतात आणि त्यांची भेट अशक्यच होती. तेव्हा माझ्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टर कसे आहेत ? ते बोलू शकतात का ? त्यांच्याविषयी कुणाला विचारायचे ? त्यांच्याविषयी कोण सांगेल ?’, असे विचार यायचे. सार्याच साधकांना त्यांच्या भेटीची तळमळ लागून मन कासावीस झाले होते. साधकांच्या अंतःकरणातील व्याकुळता आणि मनाचे आक्रंदन त्या परमात्म्याला कळले अन् त्यांनी आपले दर्शन घडवले. पुंडलिका भेटी परब्रह्म आले ! गुरुकृपा झाली आणि सर्वच साधकांना त्यांनी दिव्य भावदर्शन दिले.
५. परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीच्या वेळी मनात आलेले विचार आणि जिवाची झालेली स्थिती
अ. ‘ते सूर्य, तर मी त्याचे किरण. ते सागर, तर मी लाटा. ते वारा, तर मी त्याची झुळूक. ते आकाश, तर मी छोटी पोकळी. ते ब्रह्मांड, तर मी पिंड, म्हणजेच त्यांचाच अंश किंवा तुकडा आहे’, असे विचार मनात येत होते. त्या वेळी माझे मन भावविभोर आणि सकारात्मक होते.
आ. कधीतरी एक दिवस मी त्यांच्याच कृपेने त्या परमात्म्याच्या चरणी विलीन होईन. ‘मी-तू पणाची बोळवण’ होऊन आमच्यातील द्वैताचे विसर्जन होईल आणि मला ईश्वरप्राप्ती होईल. मी नाही आणि तूही नाही. मग कोण कुणाला भेटणार ? हा मनुष्यजन्म ‘ही अद्वैताची अनुभूती घेण्यासाठीच आहे’, असा विचार मनात येऊन माझे मन त्याच भावविश्वात होते.
‘परात्पर गुरु डॉक्टर, अविश्रांत श्रम आणि अविरत उद्यम (कृतीशीलता) करून सामान्य जिवांच्या अंतःकरणात फुलवलेली ही सहस्रो भावफुले मी तुमच्या पावन चरणी अर्पण करते आणि आनंदाच्या आणि चैतन्याच्या सहस्रो ज्योतींनी तुम्हाला ओवाळते. चालेल ना गुरुराया ?’
– गुरुचरणी शरणागत,
सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२२)
(समाप्त)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |