पुणे जिल्ह्यातील मेपर्यंत ९०४ बालके कुपोषणमुक्त करण्यात यश !
पुणे – कोरोनाच्या संसर्गामुळे पुणे जिल्ह्यातील जानेवारी २०२२ मध्ये कुपोषित बालकांची संख्या २ सहस्र ९६ वर गेली होती. ६ मासांपूर्वी म्हणजे जुलै २०२१ मध्ये हीच संख्या केवळ ६६० इतकी होती. जानेवारी २०२२ मध्ये एकूण कुपोषित बालकांमध्ये ४०४ बालके ही अतीतीव्र कुपोषित (सॅम), १ सहस्त्र ६९२ बालके ही तीव्र कुपोषित (मॅम) होती. त्यापैकी जानेवारी ते मे २०२२ पर्यंत ९०४ बालके ही कुपोषणमुक्त करण्यात यश मिळाले आहे. याकरता सकस आहार आणि योग्य औषधोपचार यांचा लाभ झाल्याचे दिसून येत आहे. हे महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून सांगितले आहे. (स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बालके कुपोषित असणे, दुर्दैवी आणि गंभीर आहे. प्रशासनाने ‘एकही बालक कुपोषित नको’, असे ध्येय घेणे अपेक्षित आहे. – संपादक)
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने कुपोषित बालकांचा शोध घेणे, त्याची कारणे शोधणे, त्यांना सकस आहार देणे, तसेच योग्य औषधोपचार करता यावेत यांसाठी गावपातळीवर ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन करणे आदी कार्ये करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.बी. गिरासे म्हणाले, ‘‘कुपोषित बालकांना ग्राम बाल केंद्रात भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातून अंदाजे ७० टक्के बालकांना कुपोषणमुक्त करण्यात यश मिळाले आहे.