धर्मावरील आघात परतवून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी त्याग करायला सिद्ध होऊया ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती
व्याख्यातून प्रेरणा घेऊन धर्मकार्य करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार !
रायगड, ५ जून (वार्ता.) – सद्यस्थितीत सुसंस्कृत समाज, ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी परिपूर्ण पिढी घडवायची असेल, तर धर्मशिक्षण, हिंदूसंघटन अन् साधना ही त्रिसूत्री अंगीकारावी लागेल. लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर, मंदिर सरकारीकरण यांसारख्या आघातांचे वादळ परतवून लावण्यासाठी त्यावरील अंतिम उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! त्यासाठी त्याग करण्यास सिद्ध होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळील वडवळ (मौजे कुसावडे) या गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच हिंदु राष्ट्र-जागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
धर्मप्रेमी श्री. शैलेश मरागजे यांनी यापूर्वी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेतून प्रेरणा घेऊन एकट्याने स्वतःच्या गावचे दायित्व घेऊन व्याख्यानाचे आयोजन केले होते. गावातील युवक सर्वश्री संकेत कदम, रवींद्र मरागजे, अक्षय मरागजे यांनी व्याख्यानासाठी प्रसार करून सर्व साहाय्य केले.
व्याख्यानाला माजी सरपंच श्री. विठ्ठल रामजी मोरे आणि श्री. जितूभाऊ सकपाळ, कोयना पुनर्वसन महाराष्ट्र समिती सेवा सरचिटणीस आणि शिवसेनेचे ग्रामपंचायत प्रमुख श्री. अनिल दगडू सावंत, माजी उपसरपंच अनिल मरागजे आणि विभागप्रमुख जगदीश मरागजे यांच्यासह वडवळ गावातील धर्मप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. या व्याख्यानातून प्रेरणा घेऊन ‘नियमितपणे धर्माचरणाच्या कृती करण्यासह धर्मकार्यासाठी प्रतिदिन एक घंटा तरी देऊ’, असा निर्धार उपस्थित धर्मप्रेमींनी केला. या व्याख्यानानंतर येथील गावात नियमितपणे धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी धर्मप्रेमींनी केली.